Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च ०७, २०२३

ती हरली नाही, लढली संकटांशी आणि जिंकली आयुष्याची लढाई | Jagtik mahila din Vishesh International Women's Day

Jagtik mahila din Vishesh International Women's Day
गीता सुरेश डांगे 

वयाच्या सोळाव्या वर्षी तिचे लग्न झाले. त्यानंतर तीन मुली आणि एक मुलगा अशी चार अपत्ये जन्मला आली. घरची परिस्थिती खूप हालाखीची होती. घरामध्ये अठराविश्वे दारिद्र्य असतानाही ती कधीही मागे हटली नाही. कुणाच्या पुढे हात पसरले नाही. अशातच पतीचे अकाली निधन झाले. तरीही ती खचली नाही. मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून ती मिळेल ते काम करू लागली. आज तिची एक मुलगी पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. लहान मुलाची नुकतीच अग्निवीर म्हणून भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे आणि लहान मुलगी चंद्रपूर पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीमध्ये पास होऊन लेखी परीक्षेसाठी पात्र ठरली आहे. ही यशोगाथा आहे बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावातील श्रीमती गीता सुरेश डांगे (Geeta Suresh Dange) या कर्तबगार माऊलीची. 


एका अठराविश्वे दारिद्रय असलेल्या कुटुंबामध्ये या माऊलीचे १९९५ साली रा. सालोरी तह वरोरा जि. चंद्रपूर येथील सुरेश चरणदास डांगे यांच्याशी लग्न झाले. त्यानंतर संसारवेलीवर सोनू, निता, प्रीती या तीन मुली आणि कुणाल नावाचा एक मुलगा जन्माला आला. घरची आर्थिक स्थिती अत्यंत हालाखीची असताना सुद्धा कोणतीही तक्रार न करता मिळेल ते काम करत ही माऊली जिद्दीने संसार करत होती. पण अचानक २००५ मध्ये पतीचे निधन झाले. त्यावेळी सोनू आठ वर्षाची, निता सहा वर्षाची, प्रीती चार वर्षाची आणि कुणाल दोन वर्षाचा होता. पण तरीही ती डगमगली नाही. मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना घडविण्याचे स्वप्न तिने त्यावेळी बघितले. (womens day quotes)

घरातील कर्ता पुरुष गेल्याने समाजातील काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांकडून मानसिक छळ सुरू झाला. घरावर दगडगोटे फेकून मारणे, नको नको दे बोलणे, टिंगल करणे असे निंदनीय प्रकार तिथे सुरू झाले. त्यामुळे ती माऊली माहेरी म्हणजे विसापूर येथे आली. आपल्या देवानंद झोडे या लहान भावाच्या मदतीने विसापूर येथे ती स्थायिक झाली. तीन मुली, एक मुलगा आणि ती असा पाच लोकांचा संसार विसापूर मध्ये सुरू झाला. मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून ती मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करू लागली. कधी दुसऱ्याच्या शेतामध्ये तर कधी सिमेंट, गिठ्ठीच्या कामाला ती जायची. पुढे बाहेर गावी जाऊन भाजीपाला विकण्याचा व्यवसाय तिने सुरू केला. एक दिवस अचानक काही गुंड लोकांनी तिच्या डोळ्यामध्ये तिखट फेकले आणि तिच्याकडे असलेले सर्व पैसे घेऊन पळून गेले. या प्रसंगानंतर या माऊलीने विसापूर गावामध्येच भाजीपाला विकण्याचा निर्णय घेतला. (international women's day)

आयुष्याच्या प्रवासात अनेक संकटे आली तरीही ही माऊली डगमगली नाही. वडिलांची उणीव तिने कधीही आपल्या मुलांना भासू दिली नाही. मुलांना चांगल्या शिक्षणासोबत चांगले संस्कार दिले. २०१६ मध्ये मोठी मुलगी सोनु हीचे लग्न थाटामाटात केले. जावई एस टी महामंडळमध्ये नोकरीला आहेत. त्यानंतर दुसरी मुलगी निता हीची २०१८ साली पोलीस विभागामध्ये पोलीस शिपाई म्हणून निवड झाली. ती आता चंद्रपूर जिल्हातील गडचांदुर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. त्यानंतर मुलगा कुणाल याची नुकतीच डिसेंबर २०२२ मध्ये भारतीय सैन्य दलात अग्नीविर म्हणून निवड झाली आहे आणि तो आता देशसेवेसाठी सज्ज झाला आहे. लहान मुलगी प्रीती ही सुरू असलेल्या चंद्रपूर पोलीस भरतीमध्ये शारीरिक चाचणीमध्ये उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेसाठी पात्र ठरली आहे. (mahila din)

या माऊलीने आपल्या चारही मुलांना शिकविले आणि चांगल्या पदावर विराजमान केले. आपली मुले मोठ्या पदावर पोहचली तरीही अगदी साधेपणाने ती आपले जीवन जगत आहे. माझी लहान मुलगी प्रीती ही जोपर्यत नोकरीवर लागत नाही तोपर्यंत मी माझा भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करत राहील अशी ही माऊली मोठ्या स्वाभिमानाने सांगते. परिस्थिती माणसाला खचवू शकते, हतबल करू शकते पण संघर्ष करण्याची हिंमत असेल तर माणसाला परिस्थिती कधीच संपवू शकत नाही याचे जिवंत उदाहरण आणि आदर्श म्हणजे श्रीमती गीता डांगे ही माऊली. अशा या कर्तबगार माऊलीच्या मातृत्वाला, कर्तुत्वाला, नेतृत्वाला, त्यागाला, कष्टाला आणि समर्पणाला आमचा मानाचा सलाम...national women's day

- सुरज पी. दहागावकर
  चंद्रपूर
 मो. न. ८६९८६१५८४८
८ मार्चला महिला दिन का साजरा केला जातो?
क्लारा झेटकीन या महिलेने 1910 साली जागतिक महिला दिनाची सुरुवात केली. या दिवसाचा उगम कामगार चळवळीतून झाला. याचं बीज रोवलं गेलं ते 1908 साली जेव्हा 15 हजार महिलांनी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर मोर्चा काढला. कामाचे कमी तास, चांगला पगार आणि मतदानाचा अधिकार अशा त्यांच्या मागण्या होत्या.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.