दिल्लीमध्ये विविध शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च पदस्थ राहुन जन्मभूमी, मातृभूमी आणि कर्मभूमीविषयी तितकाच ओढा ठेवणारे; राष्ट्रीय स्तरावर मोठं करिअर घडवण्यासाठी अनेक संधी प्राप्त होऊन सुद्धा आपल्या जन्मभूमीचे ऋण फिडायचं आहे, हा विचार मनाशी बाळगून अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा प्रभार स्वीकारत केवळ तीन महिन्यातच विद्यापीठाचा चेहरा मोहरा बदलून आदर्श कुलगुरू कसा असला पाहिजे, आदर्श शिक्षक कसा असला पाहिजे याचा आदर्श वस्तूपाठ घालून देणारे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे अल्पावधीतच 'व्हिजन मॅन' म्हणून अमरावतीकरांच्या काळजावर मोठी छाप सोडून गेलेत. विकासाची दूरदृष्टी असणार हे व्यक्तिमत्व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या इतिहासात क्रांती घडवणार होत, याची कुणालाही शंका नव्हती. मात्र (शनिवारी, 28 जानेवारी) अचानक एका दुर्धर आजारामुळे त्यांचं निधन झाल्याने शैक्षणिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.
Dr. Dilip Malkhede |
कर्तव्य पथदर्शी, तितकाच कर्मयोगी, कर्तव्यावर अपार श्रद्धा असणारा निष्ठावंत, प्रज्ञावंत, मोठी दूरदृष्टी असणार तितकच जमिनीवर राहून काम करण्याची जिद्द, सामान्यातल्या सामान्य माणसाला हवहवस वाटणारे व्यक्तिमत्व म्हणजे अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिलीप मालखेडे. कुलगुरू म्हटल्यावर मोठा लावाजमा. अशा उच्चपदस्थ व्यक्तीपर्यंत पोहोचणेही कठीण मात्र अवघ्या दोनच महिन्यात विद्यापीठाच्या चंदेरी दालनातून बाहेर पडत पाचही जिल्ह्यातील दुर्गम भागात फिरून तळागाळातील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात कसा येईल याची ब्ल्यू प्रिंट डॉ.दिलीप मालखेडे यांनी डोळ्यात तेल घालून तयार केली होती. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या पाचही जिल्ह्यात विस्तारलेले आहे. शेतकरी आत्महत्यांसाठी प्रसिद्ध असणारा यवतमाळ जिल्हा सुद्धा विद्यापीठाचा भाग आहे. तर विकासापासून वंचित असलेला बुलढाणा जिल्हा हा सुद्धा विद्यापीठाच्या अखत्यारित येतो. कुपोषणासाठी कु-प्रसिद्ध असणारे मेळघाट सुद्धा अमरावतीतच आहे. याची पूर्ण माहिती असणाऱ्या डॉ. मालखेडे यांनी मेळघाटातल्या विद्यार्थ्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तीन दिवसांचा मेळघाट दौरा काढून तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पाचही जिल्हे त्यांनी पायाला भिंगरी लागल्यासारखा प्रवास केला. विद्यापीठ ते मंत्रालय, सामान्य विद्यार्थी ते आंतरराष्ट्रीय संस्था यामध्ये निर्माण झालेली समन्वयाची गॅप काढून त्यांच्याकरिता थेट सुविधा करणार हे व्यक्तिमत्व होतं. पाचही जिल्ह्यातील विविध भागातून विद्यार्थी विद्यापीठाच्या कामानिमित्त विद्यापीठ मुख्यालयात येत असतात. त्यांचे कामे प्रलंबित राहिले तर त्यांना बाहेर निवासासाठी आसरा शोधावा लागतो. ही बाब लक्षात घेता केवळ एक रुपयांमध्ये विद्यापीठात निवासाची सोय त्यांनी करून दिली होती. अलीकडेच केंद्र सरकारने नवे शैक्षणिक धोरण जाहीर केले. या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्याधीष्टीत विद्यार्थी कसा निर्माण होईल, त्याला रोजगाराची दालन कशी खुली होतील यावर सविस्तरपणे भूमिका विशद केली आहे. नव्या शैक्षणिक धोरणाची अमरावती विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी परिश्रम घेऊन अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या पाचही जिल्ह्यामध्ये कार्यशाळा आयोजित करून हे धोरण शिक्षक व विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचेल यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या विकासाचा आणि प्रगतीचा आलेख उंचावत असताना काळाला ते खपत नव्हतं. विद्यापीठाचा प्रभार स्वीकारल्यानंतर त्यांना कर्करोग असल्याचे निदान झाले. पुण्याच्या एका रुग्णालयात त्यांनी काही दिवस उपचार सुद्धा घेतले. उपचार घेतल्यानंतर ते पुन्हा विद्यापीठात परतले. आणि तितक्याच ताकदिने ते कामाला लागले. झोप पुरेशी न होणे, कामाचा व्याप वाढने यामुळे डॉक्टरांनी त्यांना आरामाची गरज आहे असल्याचे वारंवार सांगितले. तरीसुद्धा त्यांनी विद्यापीठाचे काम प्रामाणिकपणे सुरू ठेवले. सामान्य विद्यार्थ्याकरिता त्यांनी त्यांचे दालान नेहमी करता खुले ठेवले. त्यांच्या नेतृत्वात अमरावती विद्यापीठाचा प्रगतीचा आलेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तारत असताना आज सकाळी त्यांच्या निधनाचे आलेले वृत्त हे तीव्र वेदना देणारे आहे. विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून वृत्तांकन करताना त्यांच्याशी दररोज विविध विषयांवर संवाद व्हायचा. या काळात मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. अगदीच कुलगुरू असल्यामुळे प्रोटोकॉल सुद्धा असतो. मात्र हा प्रोटोकॉल बाजूला ठेवून कुठल्याही बाबींवर बेधडकपणे भाष्य करणार हे व्यक्तिमत्व मला व्यक्तिशः खूप भावतो. कुलगुरू नियुक्तीचे पुणे कनेक्शन असे एक वृत्त मी त्यावेळी दिले होते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित व डॉ.दिलीप मालखेडे यांचा उल्लेख असल्याने मोठी खळबळ उडाली होती. या वृत्तानंतर डॉ. मालखेडे यांनी फोन करून सविस्तर खुलासा केला होता. त्यावर बोलताना ते म्हणाले असे कुठलेही पुणे कनेक्शन नाही. मी मजूरी करून इथपर्यंतचा प्रवास केला आहे. यातूनच सर्वोच्च असणाऱ्या कुलगुरू पदापर्यंत किती सामान्यातला सामान्य माणूस पोहोचलेला आहे हे ठळकपणे पाहायला मिळेल. त्यांच्या अकाली निधनाने अमरावती विद्यापीठाची मोठी हानी झालेली आहे. शैक्षणिक वर्तुळात निर्माण झालेली ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. दूरदृष्टी असणाऱ्या व्हिजन मॅनला भावपूर्ण श्रद्धांजली.. तुम्ही कायम स्मरणात राहाल.
- शुभम बायस्कार, अमरावती
मो.७८८८००१९३६