व्दादशीवार दाम्पत्यांचे सत्का
चंद्रपूर : समाजात लोकोपयोगी कार्य करणाऱ्या अनेक संस्था व व्यक्तींना चंद्रपुरातील द्वादशीवार दाम्पत्यांनी आपली संपत्ती अकल्पितपणे वाटून दिली. त्यांनी या निर्लेप सत्कार्याची वाच्यता आणि कधी प्रसिद्धीही केली नाही. या सेवाभावाचे मूल्य मोठे आहे. त्यामुळे जया व्दादशीवार यांच्या अनंत आठवणी सदैव स्मरणात राहणार आहेत, असे मत आनंदवनचे सरचिटणीस विकास आमटे यांनी व्यक्त केले.
रविवारी २० मार्च २०२२ रोजी सायंकाळी ६.३० वाजता चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात लेखिका व समीक्षक डॉ. जया द्वादशीवार यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त इंदोर येथील सुप्रसिद्ध गायिका कलापिनी कोमकली यांच्या शास्त्रीय गाण्यांचा कार्यक्रमाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रा. सुरेश द्वादशीवार, डॉ. बाबा पोळ, डॉ. शरद सालफडे, डॉ. रजनी हजारे, ॲड. बाबासाहेब वासाडे व शहरातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.
शास्त्रीय संगिताला सुरूवात होण्यापूर्वी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी आनंदवनचे सरचिटणीस विकास आमटे यांच्या हस्ते गायिका कलापिनी कोमकली यांना महावस्त्र पैठणी साडी देऊन सत्कार करण्यात आला. तर पुष्पा नागरकर यांनी डॉ . जया व्दादशीवार व प्रा. सुरेश द्वादशीवार लिखीत दोन पुस्तके भेटस्वरूप प्रदान केली. जया व्दादशीवार यांच्या धाकट्या भगिनी उमा धनकर यांनी डॉ. विकास आमटे यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार केला. गायिका कलापिनी कोमकली यांनी आनं दवनशी जुळलेल्या नात्यांची आठवण करताना म्हणाल्या, १२ ते १३ वर्षांची असताना मी वडील कुमार गंधर्व यांच्यासोबत आनंदवनात आले होते. त्यावेळी बाबा आमटे यांनी सहज एक प्रश्न विचारला, की तु गीत गातेस का, यावर होय असे उत्तर दिले. त्यांनतर पहिल्यांदाच आनंदवनातून एका गीत गायनाने माझ्या गायनाला प्रारंभ झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कलापिनी कोमकली यांनी आपल्या सुमधूर आवाजाने उपस्थित श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. सुरेल व सुमधूर आवाजाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. आयोजनासाठी डॉ. कन्ना मडावी, नंदू नागरकर, जयश्री कापसे-गावंडे, पुष्पा नागरकर आदींनी सहकार्य केले. ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे यांनी कार्यक्रम आयोजनामागची भूमिका विशद केली. कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व रसिक उपस्थित होते.
शास्त्रीय बंदिशींनी रसिक मंत्रमुग्ध
शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांनी पुरिया धनश्रीपासून गायनाला सुरू केली. त्यानंतर मधुवंती राग सादर करून मैफलीत रंगत आणली. ही बंदिश सादर करताना वसंतराव देशपांडे व आपले वडिल कुमार गंधर्व यांच्याशी जुळलेल्या आठवणी त्यांनी कथन केल्या. वसंतरावांनी विचारलेल् या प्रश्नाला कुमार गंधर्वांनी पत्राद्वारे दिलेले उत्तर म्हणजे हे गाणे असल्याचा उल्लेखही केला. होळी-रंगपंचमीवर आधारीत मै आऊ तोरे मंदरवा हे बं दिशही रसिकांना तृप्त करून गेली. नर्मदा रंग से भरी, खेलेगा कृष्ण मुरारी या शास्त्रीय गाण्यानंतर भा. रा. तांबे यांनी लिहिलेल्या भैरवी रागातील भजनाने मैफलीची सांगता केली.