ग्रामायण सेवागाथामध्ये दीपस्तंभचे राजेंद्र चौरागडे
नागपूर- निस्वार्थ सेवा कार्य म्हणजे असंख्य जनतेच्या जीवनात अंधारात उमललेले प्रकाश किरणच... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून अशीच अनेक किरणे बाहेर पडलेली आहेत . त्यातलेच एक आहेत श्री राजेंद्र दिलीराम चौरागडे. गेली पस्तीस वर्ष विविध सेवा कार्यात कार्यरत असलेले राजेंद्र आज ग्रामायणची २७ वी सेवागाथा सादर करीत होते. श्री चौरागडे यांचा परिचय सौ आरती खेडकर यांनी करून दिला.
आपल्या सेवा कार्य विषयी माहिती देताना श्री. राजेंद्र चौरागडे म्हणाले, माझ्यावर झालेल्या संघ संस्काराप्रमाणे आपण आपल्या जीवनात समाजाचे काही देणे लागतो, हे मनावर बिंबवले गेले. आणि त्याप्रमाणे आपण केवळ स्वतःसाठी नाही इतरांच्या जीवनातील त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न करून त्यांना जीवन सुसह्य करण्याचा सदैव प्रयत्न केला पाहिजे, हे मनामध्ये ठरविले.
प्रारंभी मी माधव नेत्रपेढी मध्ये श्री बोकारे, श्री श्रीपादजी दाणी यांच्यासोबत काम करीत होतो. जवळजवळ पाच हजार व्यक्तींना नेत्रदानासाठी प्रोत्साहित करून अनेकांना दृष्टी देण्यास माध्यम ठरलो. दृष्टी दान करून त्यांना जीवन दृष्टी देण्याचेच काम केले. माधव पेढी नंतर लता मंगेशकर इस्पितळात कार्य करताना दीपस्तंभ नावाची नेत्र संस्था सुरू केली.
सुभाष नगर कामगार वस्तीत राहतांना आमदारांच्या लहान मुलांच्या शिक्षण संस्काराचा प्रश्न समोर आला. आई वडील कामाला गेल्यानंतर मुलांचे संस्कार शिक्षण होऊ शकत नव्हते. अशावेळी या वस्तीत संस्कार वर्गास घेण्यास सुरुवात केली. शिशुवर्ग आणि प्राथमिक शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतु शाळा सुरू करण्यात यासाठी लागणारा खर्च करण्याची माझी आर्थिक स्थिती नव्हती. ही आर्थिक निकड भागविण्यासाठी नागरिकांकडून रद्दी गोळा करण्यास सुरुवात केली. रद्दी ची पाकिटे बनवून ते दुकानांमधून विकून त्यातल्या पैशात घरी बसणाऱ्या कामगार स्त्रियांना रोजगारही देता देता आला. सुमारे 80 महिलांना रोजगार उपलब्ध झाला. शिवाय वाचलेल्या पैशातून शिशुवर्ग आणि शाळेत शिकणाऱ्या मुलाना शाळेची वह्या पुस्तके उपलब्ध करून देण्यात आले. एकूणच ही व्यवस्था संघाचे स्वयंसेवक संजयजी जोशी यांच्या सहकार्याने ही पुढे सुरू राहिली.
२० विद्यार्थ्यांनी सुरु झालेल्या शाळेत १८० विद्यार्थी येऊ लागले. हे सर्व विद्यार्थ्यांच्या आणि शाळेच्या नीटनेटकेपणा आणि उत्कट शिक्षण व्यवस्थेमुळे झाले. मात्र कोरोना काळात प्रशिक्षण संस्था जवळजवळ ठप्प पडली. रद्दी गोळा करणे आणि पाकिटे बनवणे हेच काय ते थोड्या अधिक प्रमाणात सुरू राहिले. रद्दी गोळा करण्याची कल्पना जितेंद्र उपागंन्लावार यांनी दिली होती. शाळेतून बारावीपर्यंत पोचलेल्या मुलांना हाताला काहीतरी काम मिळावे म्हणून मोबाईल प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यात काहींनी स्वतःची दुकाने सुरू केली तर काही घरी बसून मोबाईल दुरुस्तीचे काम करीत आहे. हा एक अतिशय सकारात्मक भाग होता भाग आहे.
यानंतर नागरिकांना शासनाच्या उपयुक्त ठरणाऱ्या योजना त्यांच्या पर्यंत पोहचवण्याचे कार्य सुरू करण्यात आले. आयुष्यमान योजना, घरकुल योजना, आधार कार्ड पॅन कार्ड, अटल पेन्शन योजना अशा अनेक योजनांची माहिती नागरिकांना देऊन त्यांचा सहभाग त्यात वाढविण्याचे कार्य आम्ही केले. ते आजही सुरू आहे. अनेक नागरिकांना त्याचा लाभ मिळाला, मिळतो आहे. कोरोनाकाळात अन्नपुरवठा योजना, होतकरू विद्यार्थांना वह्या पुस्तके आदी कार्य अजूनही सुरू आहेत. श्री राजेंद्र चौरागडे यांचे सेवाकार्य पाहता अनेकांना ते प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.