Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑक्टोबर २९, २०२०

‘प्लॅटेनियम’ दर्जाच्या मेट्रो भवनला चिमुकल्यांची भेट



पर्यावरणपूरक वास्तू बघून आनंदली 'विमला आश्रम घरकुल'ची मुले

नागपूर- नागपूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरलेली नागपूर मेट्रो आता पर्यटनाच्या दिशेने नागरिकांना खुणावत आहे. ऐतिहासीक धम्मक्रांतीची साक्ष देणाऱ्या दीक्षाभूमीजवळील ‘मेट्रो भवन’ प्रशासकीय कार्यालय तर पर्यटनाचे केंद्रच ठरत आहे. अनेकांसाठी आकर्षण आणि कुतुहल ठरलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि पर्यावरणपूरक ‘मेट्रो भवन’ वास्तू पाहण्यासाठी नुकतीच बच्चे कंपनीने हजेरी लावली. सामाजिक जाणीवेतून मेट्रो प्रशासनाद्वारे नागपूरच्या उदय नगर भागातील आम्रपाली उत्कर्ष संघाच्या 'विमला आश्रम घरकुल' च्या मुलांना ‘मेट्रो भवन’ पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

‘मेट्रो भवन’ला नुकतेच इंडियन ग्रीन बिल्डींग कौन्सिल (आयजीबीसी) तर्फे ‘प्लॅटेनियम’ दर्जा देत सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले आहे. मेट्रो भवनची संपूर्ण इमारत ही पर्यावरणपूरक आहे. विशेष म्हणजे येथील छतावर २७३ किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल लावण्यात आले असून त्यातून वर्षाला ३.७५ लाख घटक ऊर्जा निर्माण केली जाते. या संपूर्ण इमारतीच्या एकूण आवश्यकतेपैकी ३० टक्के ऊर्जा सौर प्रणालीद्वारे मिळते. या प्रणालीमुळे सुमारे २० टक्के ऊर्जेची बचत होते. ऊर्जेसह पाणी बचतीसाठीही मेट्रोभवन चे महत्व अधोरेखीत होते. सांडपाण्याचा पुनर्वापर बायोडायजेस्टर पद्धतीने केला जात आहे. सांडपाण्यावर प्रक्रियाकरून तेच पाणी परत मेट्रोभवन परिसरात लावलेल्या झाडांकरीता वापरले जात आहे. रेन वाटर हार्वेस्टिंग प्रणालीमुळे परिसरात पडणा-या पावसाच्या पाण्याचा शंभर टक्के पुनर्वापर केला जातो. याशिवाय मेट्रो भवन परिसरात जैविक खतही निर्मिती केली जाते.

या संपूर्ण विशेष पर्यावरणपूरक प्रकल्पांची माहिती 'विमला आश्रम घरकुल'च्या चिमुकल्यांना मेट्रो प्रशासनातील अधिका-यांनी समजवून सांगितली. याशिवाय त्यांच्या मनातील शंका, प्रश्नांचेही उत्तर देत त्यांचे समाधान केले. यानंतर चिमुकल्यांनी मेट्रोची सफर करीत मेट्रो स्टेशनवरील महत्वाच्या सेल्फी पॉईंटवर फोटो काढून आनंद लुटला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.