गांधी कुटी, बुद्ध मूर्तीसह सेल्फीसाठी तरुणाईची रिघ
नागपूर- राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरासह संपूर्ण विदर्भातील महत्वाकांक्षी नागपूर मेट्रो प्रकल्प पूर्णत्वाकडे आला आहे. अल्पावधीत नागपूर शहराचे रूपडे पालटवणारा हा प्रकल्प आता त्याच्या सुंदर आणि आकर्षक स्थानकांसाठी चर्चीला जात आहे. नागपूर मेट्रो प्रकल्प एक पर्यटन स्थळ म्हणूनही विकसीत होत असल्याचे दिसून येत आहे.
ऑरेंज आणि ॲक्वा या दोन्ही मार्गावरील प्रत्येकी ८ अशी एकूण १६ स्टेशन नागरिकांच्या प्रवासी सेवेसाठी सज्ज झाली आहेत. विशेष म्हणजे ही केवळ स्थानकच नसून शहरातील आकर्षक स्थळे झालेली आहेत. नवीन सेल्फी पॉईंट म्हणून तरुणाई या स्थानकांकडे पाहत आहे. अंबाझरी तलावाच्या काठावरील स्वामी विवेकानंद स्मारकालगतचे सुभाषनगर मेट्रो स्टेशन, एअरपोर्ट स्टेशनवरील बापू कुटी, न्यू एअरपोर्ट स्टेशनवरील गौतम बुद्धांची मूर्ती या ठिकाणी सेल्फीकरीता तरुणाची रिघ दिसून येते. विशेष म्हणजे, नागपूर मेट्रोतर्फे या सेल्फींना फेसबुकवर प्रसिद्धी देउन त्यातील निवडक विजेत्यांना पारितोषिकही दिले जात आहेत. त्यामुळे सुरक्षित मेट्रो प्रवासासह बक्षीसही जिंकता येत असल्याने नागपूर शहरासह विदर्भातील अनेकांची पावले मेट्रो स्टेशनकडे वळताहेत.