Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल ०९, २०१५

202 गावात कामांना जोमाने सुरुवात

जिल्हा जलयुक्त शिवार अभियान
- अभिषेक कृष्णा यांची माहिती

नागपूर, दि.9 :   नागपूर जिल्हयात जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत 202 गावांमध्ये सर्वांसाठी    पाणी-टंचाईमुक्त महाराष्ट्र-2019 अंतर्गत टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी अभियानाची कामे जोमात सुरु झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी आज दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात झालेल्या जिल्हा जलयुक्त शिवार अभियान समितीच्या बैठकीत दिली. या समितीचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष आहेत. यावेळी नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजीराव जोंधळे, अशासकीय सदस्य ॲड. प्रकाश शालिकराम टेकाडे, सुधाकर मेंघर, तज्ञ सदस्य कृष्णकुमार मराठे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अर्चना कडू व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
आज झालेल्या बैठकीत गाव आराखडे, कामांचा स्थळदर्शक नकाशा, नियोजन व सद्यस्थिती, कामांचे सविस्तर अंदाजपत्रक, निविदाबाबतची सविस्तर स्थिती, निधी उपलब्धता, कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व, तसेच प्रचार व प्रसारासाठी आय.ई.सी. मोबाईल व्हॅन येत्या 14 एप्रिल पासून सुरु करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत 313 गावे निवडण्यात आली आहे. या 313 गावांचे ग्रामपंचायतनिहाय आराखडे तसेच तालुका व जिल्हानिहाय आराखडे तयार करुन पुढील आठवडयात सादर करण्याचे निर्देश अभिषेक कृष्णा यांनी आज दिले. 313 ही गावातील कामांची माहिती पुस्तिका येत्या आठवड्याभरात तयार करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
सिध्दीविनायक ट्रस्टतर्फे अभियानासाठी एक कोटी रुपये
सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मुंबईच्या सिध्दीविनायक ट्रस्टतर्फे एक कोटी रुपयांचा निधी जलयुक्त शिवार अभियानासाठी प्राप्त झाला आहे. सद्या हिंगणा तालुक्यात आर्ट ऑफ लिव्हिंग या सामाजिक संस्थतर्फे किन्हीधानोली या गावात काम सुरु असून अजून 24 गावांमध्ये या संस्थेतर्फे काम सुरु करण्यात येणार आहे. तसेच या समितीचे तज्ञ सदस्य कृष्णकुमार मराठे यांनी काटोल तालुक्यात एका गावांमध्ये अभियानाचे काम सुरु केले आहे. त्यांनासुध्दा उपविभागीय स्तरावरील समितीतर्फे मदत देण्यात येणार असल्‍याचे बैठकीत सांगण्यात आले.
उमरेड, भिवापूर, कुही या तालुक्यात अभियानाची कामे जोमाने सुरु असून जिल्हयातील इतरही तालुक्यात या कामांना वेग आलेला आहे. जलयुक्त शिवार अभियानातील 313 गावांपैकी विदर्भ सघन सिंचन योजनेअंतर्गत 100 गावे, आरआयडीएफ अंतर्गत 7 गावे, ए.पा.व्य.का.अंतर्गत 95 गावे, लाभक्षेत्रातील 8 गावे, कोरडवाहू प्रकल्पात 10 गावे, अतिशोषित पाणलोटातील 48 गावे व 45 टंचाईग्रस्त गावे अशी वर्गवारी करण्यात आली असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.