विदर्भ उपजिविका मंच व वनहक्क नेटवर्क यांनी मानले खासदार सुप्रिया सुळे यांचे आभार
संजीव बडोले/ नवेगावबांध
नवेगावबांध :-Covid-19 या कोरोनाव्हायरस च्या प्रादुर्भावामुळे उपाय योजनेचा एक भाग म्हणून 21 मार्च पासून देशात व राज्यात संचारबंदी व लॉकडावून लागू करण्यात आले. या पार्श्वभूमीवर वन व वनेत्तर क्षेत्रातून मोह फुले व तेंदूपत्ता संकलन व विक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती. वन व वनेत्तर क्षेत्रातून तेंदूपाने, मोह फुले व इतर वन उपज गोळा करून विक्रीची परवानगी मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न केल्या बद्दल विदर्भ उपजीविका मंच व महाराष्ट्र राज्य वन हक्क नेटवर्क यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे जाहीर आभार मानले आहे. त्याबरोबरच विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार के. सी. पाडवी व अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले आहे.
महाराष्ट्रातील भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा पूर्व विदर्भ व खानदेशातील अनेक जिल्ह्यातील आदिवासी व इतर वनवासी नागरिक मार्च ते जून या काळात मोह फुले व तेंदूपत्ता गोळा करून त्याची विक्री करतात. हे त्यांचे उपजीविकेचे प्रमुख साधन मानले जाते यात भूमिहीन व महिलांना आर्थिक लाभ मिळतो. सामुहिक वन हक्क प्राप्त गावांच्या अनेक ग्रामसभा तेंदूपाने संग्रह करून थेट विक्री करतात. कोरोणा विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे हे काम प्रभावित होऊन, अनेक गरीब नागरिकांची रोजीरोटी बुडाली होती. त्याचा ग्रामीण अर्थकारणावर दूरगामी परिणाम होण्याचा संभव असतो. शेती इतकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त वनउपज विकण्यास परवानगी आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर ,गडचिरोली, नागपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा हे जिल्हे व राज्यातील इतर जिल्ह्यातील 4.5 लाख कुटुंब तेंदूपत्ता संकलनाचे काम करतात. याचा आर्थिक लाभ 9 ते 12 लाख लोकांना होतो. जवळ पास 200 कोटी रुपयांचा लाभ नागरिकांना होत असतो. यावर्षी कोरोनाव्हायरस या संसर्गजन्य रोगामुळे होणारी कामे बंद करण्यात आली होती. त्यामुळे रोजगार जाण्याची भीती या नागरिक निर्माण झाली होती. या कोरोना संक्रमण काळात रोगाचा संसर्ग होणार नाही. याची काळजी घेऊन तेंदूपाने व मोह फुले संग्रह करू द्यावे. अशी अनेक गावातील नागरिकांनी मागणी केली होती. ज्याप्रमाणे शेती व इतर पूरक कामांना या लॉक डाऊन मधून परवानगी देण्यात आली. त्याचप्रमाणे वनउपज संग्रह करण्यास परवानगी देण्यात यावी. अशी मागणी, विदर्भ उपजीविका मंचचे पदाधिकारी प्रसिद्ध पर्यावरण वादी व सामूहिक वनहक्क क्षेत्रात कार्यरत दिलीप गोडे ,पूर्णिमा उपाध्याय ,डॉ. किशोर मोघे, वासुदेव कुळमेथे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन केली होती. दिलीप गोडे, त्यांचे सहकारी व सोबत ग्रामसभेचे पदाधिकारी यांनी हा प्रश्न शासनाकडे मांडला.मंत्री व अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. याचा परिणाम राज्य शासनाने मागणी मंजूर केली. राज्याच्या मुख्य सचिवांनी दिनांक 15 एप्रिल ला आदेश काढून राज्यातील वन व वनेत्तर क्षेत्रातून तेंदू पाने व इतर वनउपज गोळा करून विक्रीची परवानगी दिली आहे. याचा लाभ गरजू आदिवासी, गैर आदिवासी, अनेक गरीब व भूमिहीन नागरिकांना होणार आहे. त्यामुळे वनहक्क गावातील ग्रामसभा त्यांचे महासंघ यांना तेंदु पाने गोळा करून त्याची विक्री करणे शक्य झाले आहे. अशा प्रकारची परवानगी केंद्र शासनाच्या गृह विभागाच्या सचिवांनी दिली आहे. हे एका आदेशाद्वारे जाहीर केले आहे. या महत्त्वाच्या निर्णयामुळे, हे सर्व गरीब नागरिक यांचा रोजगार कोरोना व्हायरसच्या लॉकडाउनमुळे प्रभावित झाला होता. त्या सर्व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यातून प्राप्त होणाऱ्या आर्थिक उत्पन्नाचा वापर येणाऱ्या पावसाळ्यात शेती व उपजिविके करिता केला जातो. त्यामुळे शेती लागवडीकरता आर्थिक फायदा या प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातून गरीब शेतकऱ्यांना मिळणार आहे. ही परवानगी मिळवून देण्यास खासदार सुप्रिया सुळे यांनी सहकार्य केले. याबद्दल त्यांचे विदर्भ उपजीविका मंच व व महाराष्ट्र राज्य वनहक्क नेटवर्क यांनी आभार मानले आहे.