Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट ०७, २०२३

डॉक्टरच्या घरी दरोडा घालणारे हे पाच पत्रकार आहेत तरी कोण? वाचा त्यांची कुंडली! journalist

डॉक्टरच्या घरी दरोडा घालणारे हे पाच पत्रकार आहेत तरी कोण? वाचा त्यांची कुंडली!



आरमोरी (जि. गडचिरोली) येथे महिला डॉक्टरला बनावट डिग्री असल्याची बातमी करून अशी धमकी देऊन नंतर ब्लॅकमेल खंडणी आणि दरोडा घालणाऱ्या पाच पत्रकारांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त सर्व प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पत्रकार जगतामध्ये मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे या घटनेत सहभागी असलेले पाचही पत्रकार हे नागपुरातील असून अनेक राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात हातात कॅमेरा, बुम घेऊन दिसणाऱ्या या पत्रकारांचा खरा चेहरा उघड झाला आहे. अमित प्रभाकर वांद्रे (वय ३२), सदाशिव कुंभारे (४२), विनय विजय देशभ्रतार (२७), रोशन भयालाल बरमासे (३६), सुनील मधुकर बोरकर (४६, सर्व रा. नागपूर) अशी आरोपींची नावे आहेत.

आधी खासगी दवाखान्यात व नंतर थेट घरात घुसून तुमची वैद्यकीय व्यवसायाची पदवी बनावट आहे, तुमची बातमी टीव्हीत दाखवून बदनामी करू, अशी धमकी देत एक लाख रुपये बळजबरीने घेतले, त्यानंतर लाखांच्या ४ खंडणीसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या नागपूरच्या ५ पत्रकारांना ४ ऑगस्टला पोलिसांनी जेरबंद केले. आरमोरी येथे ही घटना घडली.

डॉ. सोनाली अमोल धात्रक (३८, रा. आरमोरी) असे तक्रारदाराचे नाव आहे. डॉ. सोनाली यांचे शहरातच खासगी क्लिनिक असून, त्यांचे पती डॉ. अमोल धात्रक उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहेत. डॉ. सोनाली यांच्या फिर्यादीनुसार, ३ ऑगस्टला त्या खासगी क्लिनिकमध्ये होत्या. तेव्हा त्यांच्याकडे दोन अनोखळी तरुण आले. त्यांनी नागपूरच्या वृत्तवाहिनीतून आल्याचे सांगून तुमची पदवी बनावट आहे, असे म्हणत अरेरावी केली. डॉ. सोनाली यांनी पदवी दाखविल्यावर ते निघून गेले. आपल्या निवासस्थानी पोहोचल्या. तेव्हा पाठीमागून एकजण आला व रुग्णालयात पदवीचा फोटो घ्यायचा राहिला, असे सांगून मोबाइलमध्ये पदवीचे फोटो घेऊन निघून गेला. त्यानंतर रात्री सव्वानऊ वाजता डॉक्टर दाम्पत्य घरी होते. यावेळी क्लिनिकमधील दोघांसह अन्य तीन लाख रुपये ते घेऊन गेले.

अमित प्रभाकर वांद्रे (वय ३२), सदाशिव कुंभारे (४२), विनय विजय देशभ्रतार (२७), रोशन भयालाल बरमासे (३६), सुनील मधुकर बोरकर (४६, सर्व रा. नागपूर) असे एकूण पाचजण घरी आले. त्यांनी सोनाली यांना धक्का देत खाली पाडले. तुमची पदवी बनावट आहे. तुमची बदनामी करू, टीव्हीत बातमी दाखवू, असे म्हणत मोबाइल हिसकावले, त्यानंतर पाच लाखांची मागणी केली. सोनाली यांच्या पर्समध्ये ठेवलेले एक लाख रुपये घेऊन गेले.

दुसया दिवशी डॉ. अमोल यांना उपजिल्हा रुग्णालयात जाऊन एकाने पैशाची तजवीज करा, असे म्हणून धमकावले. त्यानंतर व्हॉटस्अॅप कॉल करून उर्वरित चार लाख रुपयांसाठी तगादा सुरू केला. कोठे वाच्यता केल्यास परिणाम भोगावे लागतील, नागपूर उपसंचालकांकडे उभे करू, बदनामी करू, असे धमकावले. त्यामुळे डॉ. धात्रक दाम्पत्य हादरुन दिनेश गेले. अखेर धाडस करीत डॉ. सोनाली यांनी आरमोरी ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून खंडणी, दरोडा या कलमान्वये पाचजणांवर गुन्हा नोंदविला.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. आरमोरी पोलिसांच्या मदतीला गुन्हे शाखेचे पथक पाठविले. या पथकाने नागपूरमध्ये अटकसत्र राबवून १२ तासांत पाचजणांना अटक केली. गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त केली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी व आरमोरी ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. ५ ऑगस्टला आरोपींना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी दिली.

कोण आहे हा पत्रकार
यात अटक करण्यात आलेला अमित वांधरे हा नागपुरातील नवोदित पत्रकार आहे. त्याने धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारितेची पदवी केली आहे. UCN न्यूज चैनल मधून त्याने पत्रकारितेची सुरुवात केली. त्यानंतर तो मागील काही वर्षांपासून नागपूर समाचार 24 नावाने स्वतःचे युट्युब चॅनेल चालत आहे. विशेष करून गुन्हेगारी जगतातील बातम्या करणे हा त्याचा आवडीचा विषय आहे. मागील वर्षी एका तरुणीला लग्नाचे आम्हीच देऊन शारीरिक संबंध ठेवल्याचा प्रकार उघड झाला होता. सदर तरुणीच्या तक्रारीवरून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली होती. काही दिवस तो कारागृहात देखील राहिला आहे.

इतर चार जण थेट पत्रकारितेशी संबधित नाहीत. पण, यातील एकजण कॅमेरामन आणि इतर तोतये आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.