रेल्वेच्या डब्यात भरते विद्यार्थ्यांची शाळा
मायणी / ता.खटाव जि.सातारा
- रेल्वेच्या डब्यात शाळा भरते हे ऐकून थोडे आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे. एका शाळेच्या इमारतीचे रूपांतर प्रतिकात्मक रेल्वेत करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील साकुड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांनी मिळून ही किमया साध्य केली आहे. यामुळे शाळेचे रुपडे पालटले आहे. शिवाय झुकझुक गाडीचा अनुभव मिळत असल्याने मुलांचा शाळेकडे ओढा वाढला असून, आनंदी वातावरणात मुले आता शिक्षणाचे धडे घेत आहेत.
धुरांच्या रेषा करत धावणारी रेल्वेगाडी बच्चे कंपनीसाठी खरे तर आवडती सफारी आणि अशा रेल्वेत बसून जर मुलांना शिक्षणाचा अनुभव मिळाला तर बच्चे कंपनी रोज शाळेला आल्याशिवाय राहणार नाहीत. याच संकल्पनेतून बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील साकुडमध्ये रेल्वे शाळेची कल्पना सत्यात उतरवण्यात आली आहे. शाळेच्या उपक्रमशील शिक्षकांनी कलात्मक पद्धतीने शाळेच्या इमारतीला रेल्वेच्या रूपात साकारले आहे. रेल्वेच्या इंजिना पासून डब्बे अशी कलाकृती या इमारतीवर साकारले आहेत. शाळेच्या खोल्यांना हुबेहूब डब्यांचे रूप प्राप्त करून देण्यात आल्याने थेट रेल्वेत आल्याचा भास होतो. यामुळे आता शाळेकडे मुलांचा ओढा वाढला आहे.
प्रतिकात्मक रेल्वेची शाळा दाखवताना मुख्याध्यापक व विद्यार्थी .
|
अंबाजोगाई तालुक्यात असलेल्या या भागात साकुडे हे एक छोटेसे गाव आहे. अशा ठिकाणी एका वस्तीवर असणाऱ्या मराठी शाळेत मुलांच्या पटसंख्येचा मोठा प्रश्न होता. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळेची अवस्था तशी दयनीय होती. मात्र काही महिन्यापूर्वी दाखल झालेल्या मुख्याध्यापकांनी ही परिस्थिती बदलायचा निर्धार केला. मुलांना शाळेबद्द्ल आकर्षण निर्माण व्हावे आणि शाळेकडे ओढा वाढावा यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आणि काही शिक्षकांना सोबत घेऊन पालकांच्या आणि गावकऱ्यांच्या समोर शाळेला एक नवे रूप देण्याचा संकल्प मांडला. विशेषतः मुख्याध्यापक हे स्वतः चित्रकार आहेत . त्यांनी स्वतः कलाकृती साकारली आहे.
मुलांना नेहमीच कुतुहूल राहिलेल्या रेल्वेचे रूप प्राप्त करून देण्याचा निर्धार करण्यात आला. मात्र यामध्ये सगळ्यात मोठा अडसर होता तो निधीचा. पण सर्वांचे प्रयत्न सुरू झाले आणि या सगळ्यावर मात करत लोकसहभागातून शिक्षकांनी केलेला निर्धार एक्स्प्रेसच्या रुपात सत्यात उतरला. यासाठी शाळेचे शिक्षकांना साथ लाभली ती शिक्षकांसह गावकऱ्यांची. त्यांनी मिळून काही दिवसांमध्ये सुट्टीच्या काळात रेल्वेची कलाकृती शाळेच्या इमारतीवर साकारली .