Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर १६, २०२१

कामतगुड्यातील 11 आदिवासींना जीवदान




यशामागे लोकमत आणि भूषणकुमार

महाराष्ट्रात नक्षलवाद संपल्यात जमा. थोडा फार शिल्लक दिसते. गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया झाडीपट्टीत. प्रामुख्याने आंध्र, छत्तिसगड राज्याला लागून असलेल्या सिमा भागात. 1998 - 2000 मध्ये नक्षली प्रभाव शिंगेवर होता. कुठेही घटना घडली की दलबलासह पोलिस दाखल होत. कामतगुडा तेव्हा चर्चेत आला. तिथं एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ती व्यक्ती आंध्रतील. अति दारु प्याला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. कदाचित विषारी दारूचा बळी असू शकते. गावकऱ्यांनी अत्यसंस्कार उरकला. त्यात एक नातेवाईक मृतकाचा भाऊ आला होता. त्याने गावकऱ्यावर खूनाचा आळ घेतला. 12 नोव्हेंबर-1998 रोजी र्पो़लिसांच्या हालचाली वाढल्या. पोलिस दाखल झाले. नक्षली क्षेत्र असल्याने शिपाई बंदूकधारी असत. कामतगुडा छोटसं आदिवासी गाव. अकरा घरांची वस्ती. तिथं 10 नोव्हेंबर-1998 ला घटना घडली. त्या घटनेचे तब्बल 23 वर्षानंतर स्मरण झाले. त्याचे कारण सध्या गाजत असलेले 'जय भीम ' चित्रपट .त्यात चित्रीत आदिवासींवरील अत्याचाराची कहाणी. त्या कथानकाप्रमाणे चित्तथरारक कथानक कामतगुड्यात घडलं. लोकमत आणि एक सज्जन पोलिस अधिकारी नसता. तर 11 आदिवासींना जन्मठेपेची शिक्षा झाली असती. ती न झाल्रयाने अकरा घरांची बावीस घरं झाली . सध्या दिसत असलेला हंसता-खेळता कामतगुडा दिसला नसता. काय काय वाईट घडलं असतं. त्यांची कल्पना करवित नाही. त्या आदिवासींची मुलें कदाचित बदल्याच्या भावनेतून पेटली असती. नक्षलवाद्यांचा शिरकाव झाला असता. बदल्यातून हिंसाचार वाढला असता. त्याचे पडसाद उमटले असते. ते सर्व टळलं. त्याचे एकमेव कारण त्या आदिवासींसोबत लोकमत उभा राहिला. त्याला सज्जन अधिकाऱ्यांची साथ मिळाली. त्यातून कायद्यावरचा विश्वास वाढला. कायद्याच्या लढाईत थोडा विलंब लागला. अखेर निकाल निरअपराध आदिवासींच्या बाजूने लागला. 30 डिसेंबर-2002 रोजी निर्दोष मुक्तता झाली. अकरा आदिवासींना जीवदान मिळाले. न्यायाच्या डोळ्यावर पट्टी आहे. तरी न्यायव्यवस्था आंधळी नाही. त्याचे कामतगुड्या शिवाय दुसरे मोठे उदाहरण नसेल.अशिक्षित आदिवासींनी कायद्यावर विश्वास दाखविला. त्याचे फळ कामतगुड्यातील वर्तमान खूशयालित झळकतं. तिथं प्राथनिक शाळा आली. उपचार केंद्र आलं. वीज आली.आता गावातील रस्ते पक्के व्हावेत. गावाचा पुर्णत: कायापालट व्हावा. सरकारच्या सर्व योजना गावात याव्यात असं अनेकांना वाटतं. कायद्यावर विश्वास ठेवा.' देर है पर अंधेर नही ' असं बोललं जातं. त्याची प्रचिती कामतगुड्यातून आली. संविधान प्रेमी, सरकार व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा.अशा प्रेरणादायी घटना लोकशाही बळकट करण्यास हातभार लावणाऱ्या ठराव्यात. त्या संघर्षशील गावकऱ्यांचा सन्मान व्हावा. अशा घटनांचा प्रचार व प्रसार व्हावा.


दोन आठवणी कायम स्मरणात..!

चंद्रपूर जिल्ह्यात लोकमतचा खप सर्वाधिक होता. हा योगायोग होता. मी लोकमतचा 1998 ते 2000 पर्यंत जिल्हा प्रतिनिधी होतो. या काळात शेकडो लोकांना न्याय दिल्याच्या अनेक घटना आहेत. त्यापैकी कायम आठवणीत राहिल्या. त्या दोन ठळक घटना. एक कामतगुड्यातील 11 आदिवासींना जीवदान देण्याची. ती रोमांचक घटना होती. ती आठवली की पत्रकारिता सार्थकी लागल्याचे समाधान मिळतं. याशिवाय अनेकांवरील नक्षलीचा ठपका. अन् त्या आरोपातील संशयतींचीअटक टाळण्याचं रसभरीत किस्सेही आठवतात. दुसरी महत्वाची घटना विदर्भस्तरीय युवा महोत्सवाचं आयोजन होय. सरकारी संस्थांच्या सहभागाविणा केवळ लोकमतच्या जोरावर चंद्रपुरात पहिल्यादा विदर्भस्तरीय युवा महोत्सव घेता आलं. ते कमालीचे यशस्वी झालं. हजारावर युवक-युवती त्यात सहभागी झाल्या. आमगाव ते खामगावपर्यंतची मुलें होती. त्यांच्या मनातील नक्षली भीती दूर झाली. अनेक गैरसमजही दूर झाले. हे एक यशचं होतं. ही आयुष्यातील समाधानाची मोठी पुंजी. त्या युवा महोत्सवात भाग घेणारे युवक आता विविध माध्यमात पत्रकार म्हणून वावरताना दिसतात. या दोन घटना सदैव स्मरणात आहेत. त्यातून अन्यायाला वाचा फोडण्याची प्रेरणा मिळत राहते.

अन् कामतगुडा प्रकरण कळलं

जिल्ह्याच्या ठिकाणी पत्रकारितेची संधी हा योगायोग होता.अडीच वर्ष चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी व कार्यालय प्रमुख म्हणून काम केलं. त्या निमित्ताने जिल्ह्यात दौरेही करावे लागत. एकदा अशाच जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना उडती खबर मिळाली. कामतगुड्यात खूनाच्या खोट्या आरोपाखाली आदिवासींना अटक करण्यात आली. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे. याबाबत कोणी बोलण्यास तयार नाही. प्रंचड दहशत आहे. केवळ गावकरी बोलले. तरच माहिती मिळेल. गावात जाणे अवघड. रस्ते माहित नाही. शिवाय नक्षली क्षेत्र. राजुऱ्याचे तालुका प्रतिनिधी आनंद भेंडें यांच्याशी चर्चा केली. धोकादायक क्षेत्र आहे. त्या भागातील काही लोकांना सोबत घ्यावे लागेल. त्याशिवाय जाणे अशक्य आहे. आदिवासी कार्यकर्ती मिनाक्षी गेडाम , भारीतील शाळेचे मुख्याद्यापक सुगनाकर भेंडे यांच्याकडे संपर्क केला असता. त्यांनी चर्चा असल्याचे सांगितले. चौकशीनंतर मिनाक्षी यांनी घटना सत्य असल्याचे सांगितले. त्या माडिया आदिवासी. त्यांना त्या काळात ' आदिवासींची सोनिया गांधी म्हणतं. रंग गोरा,चेहरा सोनिया गांधी यांच्याशी मिळता-जुळता . या कारणाने कॉंग्रेस जण त्यांना उपरोक्त नावाने ओळखत. तत्कालिन खा. नरेश पुगलिया यांच्या त्या कार्यकर्त्या होत्या. माणिकगड पहाडातील नागार्जून प्रयोगशाळा बघावयाची होती. त्यासाठी आदिवासी कर्मचाऱ्यांचे नेते यशवंत नेताम चंद्रपूरवरून सोबत आले होते. पहाडावर जावयाचं तर सोबत वन कर्मचारी असावा. यासाठी त्यांचा वन कर्मचाऱ्यांसोबत संपर्क सुरु होता. दरम्यान कामतगुडा प्रकरण कळलं. या घटनेची माहिती नेताम यांनी दिली. ते सक्रीय सामाजिक कार्यकर्ते. या वृत्ताने ते अस्वस्थ झाले. बातमी मोठी होती. पत्रकारिता स्वस्त बसू देत नव्हती. आता प्राथमिकता बदलली होती. अगोदर बातमी बेत ठरला. बाकी सर्व स्थगित. त्यानंतर पुन्हा ती प्रयोगशाळा बघण्याचा योग आलाच नाही. ती संधी हुकल्याची खंत कायम आहे.

*सशस्त्र पोलिस दाखल

या घटनेच्या अगोदर पंधरा दिवसात. लहान मुलांसह सहा-सात जण दगावले. या मृत्यूंमागे जादूटोणा असावा हा संशय होता. रामू सोयाम तेलगंणातून आलेला. संशयातून त्याच्यासोबत गावकऱ्यांचे एकदोनदा खटके उडाले. एक दिवस तो दारूच्या नशेत आला. कदाचित विषारी दारू प्याला असावा. त्यात त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यूच गावकऱ्यांच्या मानेनरचा टागता फास बनला होता.त्या घटनेचा तपास सुरु झाला. तपासासाठी पोलिस गावात आले. त्यांना बघून गावकरी चिडीचूप झाले. झोपड्यांची दारं बंद करून घरात बसले. या दृश्याने संशय आणखी बळावला. नक्षलवाद्यांनी मारलं की गावकऱ्यांनी प्रश्न उभा ठाकला. एक गोष्ट नक्की आहे. यात गावकऱ्यांचा हात आहे. हा पोलिसांनी निष्कर्ष काढला. पोलिस बळाचा वापर सुरु झाला. मग चित्रपटात बघता. तसा घटनाक्रम रंगला. दारं तोडून पोलिस घरात घुसले. पुरुषांना ओढत बाहेर काढले. विरोध करणाऱ्या बायका, लेकरांना झोडपलं. आदिवासी मदतीसाठी टाहो फोडत राहिले. त्यांच्या हाकेला वो देणारा कोणी नव्हता. घनदाट जंगल आणि अंधार होता. वृध्द व मुलांना बाजूला केले. आदिवासी तरुणांचे हात बांधले. गाडीत कोंबले. ठाण्यात नेले. एफआरआय लिहिला. गुन्हा कबूल करण्यास भाग पाडले.अंगठे लावले. किती मार खाणार..! अखेर खोट्या गुन्ह्याची कबूली दिली. जाळण्यात आले. त्या ठिकानाचा पंचनामा करण्यात आला. राखेतील हाडे जमा केली. ती तपासासाठी नागपुरच्या प्रयोग शाळेत पाठवण्यात आली. भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 201, 143, 147, 149, 349, 342, 323, 297 गुन्हे दाखल करण्यात आले. राजुऱ्यातील तालुका मँजिस्टेड समोर हजर केले. राजूऱ्यातील तालुका न्यायालयात कागदपत्र तयार झाले. सर्व खूनाचे आरोपी ठरले. दुसऱ्या दिवशी चंद्रपूरच्या ठाण्यात काढली. तेथून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने चंद्रपूरच्या कारागृहात रवानगी केली.

*ती काळरात्र होती۔۔۔۔۔۔!*

10 नोव्हेंबर-1998 ची ती काळीकुट्ट रात्र. सायंकाळी सहा ते सात वाजताच्या सुमारास रामू सोयाम मृत्यू पावला. गावकऱ्यांनी 11मार्च रोजी अंत्यविधी उरकला. अग्नी देण्यात आली. या घटनेची चुकीची माहिती तीन दिवसांनी पोलिसांपर्यंत पोहचली. प्रेत जाळण्याची चुक गावकऱ्यांना भोवली. पुरावे नष्ट करण्यात आले. या आरोपाखाली आणखी काही कलमं लागली. त्या दिवसापासून गावकऱ्यांची छळ कहाणी सुरु झाली. हा यातनांचा प्रवास कमी अधिक तीन वर्ष चालला. या घटनेनंतर मृतक परिवाराने कामतगुडा सोडला. ते कायमचे तेलगंणात गेले. त्यांचे खोटे बयाण इकडे गावकरी भोगत राहिले. घरातील कर्तेच कस्टडीत गेले. घरात उरली छोटी मुलं आणि महिला. महिलांनी कधी गावाचा उंबरठा ओलाडला नाही. त्यांनी चंद्रपुरात जावून आपल्या लोकांना सोडविणे शक्यच नाही. त्यांची बाजू मांडणारा कोणी नाही. त्यांना जिथे जिथे नेले. त्या सर्व यंत्रणा आंधळ्या, बहिऱ्या निघाल्या. डोळे बंद करून दोषी ठरवित गेल्या. त्यांचा कोणी वालीच उरला नव्हता. अतिशय केविलवाणी अवस्था होती. आता सुटका नाही. जन्मठेप होणार. या भीतीने सारे हवालदील होते. कुटूंबिय काहीच करणार नाही. हे त्यांनाही ठावूक होते. लोकमतने त्या अन्याय विरोधात पहिला आवाज उठविला. त्या आवाजाला तत्कालिन पोलिस अधिक्षक भूषणकुमार उपाध्यय यांनी ओ दिला. ते मानवता जपणारे. कोणावर अन्याय होणार नाही. हे कटाक्षाने पाळणारे. त्यांची लोकमतला साथ मिळाली. तेथून मानवतेचा लढा सुरु झाला. पोलिस अधिकारी सकारात्मक असल्याने लढा सोपा झाला. पाठपुराव्यातून मार्ग निघाला. कोर्टात केस म्हणून वृत्तांवर मर्यादा.तरी पाठपुरावा कायम होता. अखेर सहा महिन्यानी ते अकरा आदिवासी बाहेर निघाले. सुटकेची पहिली लढाई जिंकली. सहा महिन्यानंतर त्यांना मोकळा श्वास घेता आला.15 दिवस पोलिस कस्टडीत आणि सहा महिने कारागृहात काढले.10 मार्च-1999 रोजी सायंकाळी जामीनावर सुटले. 11 मार्च-1999 रोजी पहाटे 3۔30 वाजताच्या सुमारास गावात पोहचले. हा थरारक प्रवास पुढे बघू.

*तारिख पर तारिख....!*

बेल मिळाली. झेंगट संपल नव्हतं. प्रकरण निस्तारण्यात तीन वर्ष गेले. तब्बल तीन वर्ष गरिब आदिवासींना आर्थिक झळ सोसावी लागली. दर महिन्याला पेशी असे. तिला हजर राहावे लागे. पेशी पुढे ढकलली. वकिलच हजर नव्हता. अशी कारणं दिली जात.आदिवासी अशिक्षित . त्यांना इथलं काही कळत नव्हतं. केवळ एवढेच माहित होतं. तारखेवर हजर राहणं. नाहीतर एकतर्फी निकाल लागेल. निकाल विरोधात जाणं म्हणजे जन्मठेप. फाशीची शिक्षा. ते कायद्याला घाबरणारे . तारखेवर नियमित हजर राहत. कामतगुडा ते चंद्रपूर 90 किलोमीटरचा प्रवास. हा खर्च जवळपास तीन वर्ष सोसावा लागला. मोलमजुरी करून जुळवलेला पैसा कोर्टकचेरित जात होता. तीन वर्ष तंगीत तेरावा महिना भोगत राहिले. अखेर हे प्रकरण 2002 मध्ये मिटलं. तत्पुर्वी भोगाव्या लागलेल्या यातनांनी आजही अंगावर काटे उभे राहतात.

(अपूर्ण)
-भूपेंद्र गणवीर
....................BG...................

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.