ओडीसातून ऑक्सिजन टँकरच्या पुरवठ्याला सुरुवात
शुक्रवारला जिल्ह्यासाठी 106 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा
ऑक्सिजनच्या वापरासाठी चार सदस्यीय समितीची नेमणूक
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ग्रामीण भागातील लसीकरणाचा आढावा
नरखेड ,कुही ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे कार्यादेश जारी
इंदोऱ्याच्या आंबेडकर रुग्णालयात 12 तारखेला ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन
नागपूर दि ७ : नागपूर महानगर व ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी पुढील संभाव्य लाटेला लक्षात घेता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून ('एसडीआरएफ ') 100 कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने सादर केला आहे. उद्या उर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत कोविड उपायोजना संदर्भातील गेल्या आठवडाभराच्या उपलब्धतेचा आढावा घेणार आहे. दरम्यान ओडीसा राज्यातून शुक्रवारी रात्रीपर्यंत चार टॅंकर ऑक्सिजन नागपूर शहरात पोहचणार आहे.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनात आगामी काळातील कोविड परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 'एसडीआरएफ ' मधून शंभर कोटी रुपयांचे अतिरिक्त मागणी केली आहे. औषधे ऑक्सिजन खरेदी यंत्रसामुग्रीची खरेदी व वैद्यकीय उपाय योजनासाठी या निधीचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध औद्योगिक संस्था यांच्याकडे सामाजिक दायित्व निधीची मागणी देखील जिल्हा प्रशासनाने केली आहे. आतापर्यंत केवळ वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडकडून 11.88 कोटी प्राप्त झाले आहे. सामाजिक संस्थांकडून मोठ्या प्रमाणात मदतीची जिल्हा प्रशासनाने अपेक्षा व्यक्त केली आहे. सध्या कोरोना रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा आवश्यक असून तो नियंत्रित व समतोल असावा, यासाठी चार सदस्यीय समितीचे गठण करण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात व निरीक्षणात ऑक्सिजनचे वितरण होणार आहे.
जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लान्टची निर्मिती करण्याबाबतच्या पालकमंत्र्यांच्या सूचनेला पहिला प्रतिसाद नरखेड व कुही तालुक्यात मिळाला असून या ठिकाणच्या ऑक्सिजन प्लांट निर्मितीचे कार्यारंभ देण्यात आले आहेत. इंदोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र या ठिकाणी देखील ऑक्सिजन प्लांटची निर्मिती केली जाणार असून १२ तारखेला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
आज सायंकाळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.यामध्ये लसीकरण वाढविण्यासोबतच चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्याबाबतचे निर्देश त्यांनी दिले आहेत. जिल्ह्यात सध्या बेड वाटप व खाजगी हॉस्पिटलमधील बेडचे वाटप या संदर्भातील नियोजन करण्यात आले असून ग्रामीण भागातील रुग्णांना देखील याची सुविधा मिळेल या दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
रेमडेसिवीर इंजेक्शन
जिल्ह्यात आज एकूण 4 हजार 136 रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध झाले. शहरातील 157 तर ग्रामीणमधील 49 शासकीय व खाजगी रुग्णालयांना रेमडेसिवीरचे वाटप करण्यात आले.
रेमडेसिवीरच्या वितरणात पारदर्शकता असून वितरणाचा तक्ता http://nagpur.gov.in/notice/allotement-of-remdesivir-to-covid-hospitals/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ऑक्सिजन पुरवठा
जिल्हयात अखंड ऑक्सिजन पुरवठा सुरू आहे. त्यामध्ये 7 मे रोजी जिल्ह्यात 111 मेट्रीक टन ऑक्सिजन प्राप्त झाला. भिलाई येथून व शहरातील ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या प्लांटमधून आज 111 मेट्रीक टन ऑक्सिजन प्राप्त झाला.
आज 76 मेट्रीक टनची गरज होती 41 मेट्रीक टन ऑक्सिजनचे वितरण झाले आहे. ऑक्सिजन फिलींग सेंटरवरून ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. जिल्ह्यातील जगदंबा, भरतीया, आदित्य, आसी, रुक्मिणी या ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या प्लांटमधून 138 मेट्रीक टनाची क्षमता आहे. त्यापैकी मेयो, मेडीकल, शालीनीताई मेघे, लता मंगेशकर हॉस्पीटल, ॲलेक्सीस हॉस्पीटल, अवंती, क्रिम्स, ऑरेंजसिटी, शुअर टेक, वोक्हार्ट, आशा हॉस्पीटल कामठी, 71 मेट्रीक टनची गरज असतांना 70 मेट्रीक टन ऑक्सिजन वितरीत करण्यात आला आहे.
रात्री पोहोचणार चार टँकर
ओडिसा राज्यातील भुवनेश्वर नजीकच्या अंगूल येथील स्टील प्लांट मधून नागपूरसाठी ऑक्सिजन पुरवठा होणार आहे. नागपूरला शुक्रवारी रात्री बारापर्यंत टँकरचा पुरवठा होणार आहे याशिवाय काल गुरुवारी पाठविण्यात आलेले चार टँकर शनिवारी रात्री पोहोचणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
प्रवासासाठी ई पास गरजेचा
ब्रेक द चेन अंतर्गत राज्यातर्गंत व आंतरराज्यीय प्रवासासाठी प्रवास करावयाचा असल्यास ई-पास गरजेची आहे.त्याव्दारेच प्रवास करता येईल.प्रवासासाठी ई पास covid19.mhpolice.in/या वेबसाईटवरून काढता येईल. 22 एप्रिल म्हणजे निर्बध लागल्यापासून अन्य जिल्हयातून नागपूर जिल्हयात बसव्दारे प्रवासी आले नाहीत.
शासनाच्या सूचनेनुसार जिल्हयात अंमलबजावणी सुरू आहे .त्यामध्ये राज्य शासन किंवा स्थानिक प्रशासनाच्या मालकीच्या सार्वजनिक बसेसमध्ये क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी प्रवास करू शकतील. मात्र त्यासाठी त्यांना ई-पास लागेल.बसव्दारे प्रवास करणारे प्रवासी ज्या-ज्या ठिकाणी उतरतील, त्या-त्या ठिकाणी सर्व प्रवाशांचे स्टॅम्पिंग करून त्यांना 14 दिवसांसाठी गृहविलगीकरण केले जाईल. थर्मल स्कॅनरचा उपयोग करण्यात येईल आणि लक्षणे आढळल्यास त्यांना कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयात पाठविले जाईल अश्या सूचना उप प्रादेशिक अधिकारी विनोद जाधव यांनी सांगितले.
महत्वाचे संपर्क क्रमांक
कोरोना बाधितांना त्वरीत उपचार मिळावेत म्हणून नागपूर महानगरपालिकेव्दारे सेंट्रल कंण्ट्रोल रूमची निर्मिती करण्यात आली आहे.त्याचे संपर्क क्रमांक *बेडसाठी* 0712-2567021, व्हॉटसअप -7770011537 व 7770011472 हे आहेत तर ऑक्सिजन व *औषधासाठी* 0712-2551866, व्हॉटसअप 7770011974, *रूग्णवाहिकेसाठी* 0712-2551417,9096159472 हे क्रमांक आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील
ऑक्सिजन नियंत्रण कक्षाचा क्रमांक 0712- 2562668 हा आहे.
देयक तक्रार निवारणासाठी समिती
मा. उच्च न्यायालय खंडपीठ, नागपूर यांनी सुमोटो याचिकेनुसार कोविडच्या अनुषंगाने निवृत्त न्यायाधीश श्री. गिलानी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत केलेली आहे. ही समिती मध्यवर्ती नियंत्रण कक्षाने दिलेल्या निर्देशानंतरही रुग्णास बेड उपलब्ध करून न देणे, रुग्णालयाने आकारलेले बिल न देणे, बिलासंदर्भातील तक्रारीच्या अनुषंगाने काम पाहणार आहे. या समितीचे सचिव उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे असतील.
ज्या रुग्णांना तक्रारी असतील त्यांनी collectornagpur2021@gmail.com या ई-मेल आयडीवर अथवा व्हाट्स ॲप नं 8879686222 वर आपली तक्रार दाखल करणे आवश्यक आहे.
तक्रार दाखल करतांना, तक्रार कर्त्याचे नाव, पत्ता, मेल आयडी, फोन नं. त्यांचे रुग्णाशी असलेले नाते, रुग्णाचे नाव, वय, कोणत्या रुग्णालयात दाखल आहे/होता रुग्णालयात दाखल केल्याचा दिनांक, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याचा दिनांक व थोडक्यात तक्रारीचे स्वरुप इत्यादी माहिती देणे बंधनकारक आहे.