मराठ्यांचा भगवा झेंडा लाल किल्ल्यावर फडकला होता का?
१ फेब्रुवारी २०२१
सोशल मीडियावर प्रश्न विचारला जात आहे की जर मराठा शासकांनी अटकेपार झेंडे रोवले होते तर त्यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झेंडा फडकवला की नाही?
1788 मध्ये मराठ्यांचा भगवा झेंडा लाल किल्ल्यावर होता इतकंच नाही तर महादजी शिंदे हे दिल्लीच्या मुघल बादशाहचे संरक्षणकर्ते बनले होते. त्यामुळे लाल किल्ल्यावर मुघलांचा आणि मराठ्यांचा झेंडा काही काळ फडकत असल्याचंही सांगितलं जातं.
एखाद्या ठिकाणी ध्वज फडकवणे याला संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्या ठिकाणी ज्याचा ध्वज असतो त्याची ती सत्ता किंवा जागा असते असा त्याचा अर्थ असतो.
मराठ्यांचा भगवा ध्वज लाल किल्ल्यावर फडकला पण तो सार्वभौमत्व दाखवण्यासाठी नव्हता तर मुघलांसोबत असलेली मित्रत्वाचे नाते दाखवण्यासाठी होता, असं इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत सांगतात.
पण या निमित्ताने पुन्हा एक प्रश्न मनात येतो तो म्हणजे 18 व्या शतकात मराठे प्रभावशाली होते तर त्यांनी दिल्लीवर आपला दावा का सांगितला नाही?
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा 65 वर्षांचा मुलगा बहादुरशहा जफरच्या हाती दिल्लीची सत्ता आली. त्याने शाहू महाराज आणि ताराबाई यांच्यापैकी कुणीच्याही गादीला मान्यता नव्हती दिली. इतकेच नव्हे तर बहादुरशहाने मराठ्यांना चौथाईचे अधिकार दिले नव्हते फक्त देशमुखीचेच अधिकार दिले होते.
बाळाजी विश्वनाथ हे शाहू महाराजांचे पेशवे बनले आणि 1711 मध्ये त्यांनी मुघलांकडून चौथाई आणि सरदेशमुखीचे अधिकार मिळवून घेतले. दक्षिण राज्य करायचे असेल तर दोन्ही राजघराण्यांना नाराज करता येणार नाही असे जाणून बहादुरशहाने शाहू महाराजांना झुकते माप दिले.
त्याबदल्यात शाहू महाराजांनी दिल्लीच्या संरक्षणासाठी सैन्य सज्ज ठेवायचे असा करार झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 39 वर्षानंतर मुघल आणि मराठ्यांमध्ये असलेला संघर्ष थांबला होता.मराठ्यांनी दिल्लीवर सत्ता का काबिज केली नाही?
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत या प्रश्नाचे उत्तर असे देतात की "छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई यांच्यानंतर दिल्लीला न जुमानणारे राजेच झाले नाहीत. दिल्लीच्या गादीबद्दल असलेल्या आदरातून थेट दिल्लीवर राज्य करावं ही इच्छाच त्यांच्यात निर्माण झाली नसल्याचं दिसतं.
"आधी सदाशिवराव भाऊ पेशवे आणि महादजी शिंदे इतके शक्तिशाली होते की ते सहज मराठ्यांचं सार्वभौमत्व जाहीर करू शकले असते पण दिल्लीच्या तख्ताबद्दल असलेल्या आदरामुळे ते करू शकले नसावे," असं मत इंद्रजीत सावंत मांडतात.
'मराठ्यांची तलवार तळपली, पण ध्वज तेजाने फडफडला नाही' मराठ्यांचं दिल्ली, आग्रा आणि अलीगड मधील वर्चस्व 1818 साली संपुष्टात आले, जेव्हा इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला.
"मराठ्यांनी एकदाही मुघल शासकांचा पूर्णपणे बिमोड करण्याचा ना विचार केला, ना प्रयत्न केला. मराठे नेहमीच त्यांचे संरक्षक आणि कारभारी बनून राहिले