खाण पर्यटनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
चंद्रपूर/प्रतिनिधी:
नैसर्गिक साधन संपत्ती तसेच ऐतिहासिक गोष्टीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात पर्यटकांना ताडोबा अभयारण्य सोबतच खान पर्यटनाचा आनंद घेता यावा. याकरिता जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 13 नोव्हेंबर 2019 रोजी बैठक पार पडली.
चंद्रपूर जिल्हा नैसर्गिक साधन संपत्ती, जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्य, तसेच ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. याव्यतिरिक्त चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणी विपूल प्रमाणात आहे. या खाणींमध्ये सुरू असलेल्या कामाचे कुतूहल प्रत्येक नागरिकाला तसेच पर्यटकाला असते. खाणीमध्ये सुरू असलेले काम जाणून घेण्याची जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्या सहकार्याने पावले उचलली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पर्यटकाला प्रत्यक्ष खाणीला भेट देऊन खाण पर्यटनाचा आनंद घेता यावा. याकरिता नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ तसेच वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांचे प्रतिनिधी व इको प्रो चे संस्थापक बंडू धोत्रे प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीमध्ये खान पर्यटनात मध्ये पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने सविस्तर नियोजन करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. तसेच वेस्टन कोलफिल्ड लिमिटेडने खाण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून वापरता येणाऱ्या कोळसा खाणी शोधाव्यात व त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवावा. तसेच महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ, वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांचा संयुक्तिक सामंजस्य करार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहेत.