चंद्रपूर/प्रतिनिधी:
राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज मांडण्यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडला. यावेळी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. पुढील दोन ते तीन महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याने लोकप्रिय घोषणा होतील अशी शक्यता आधीच व्यक्त केली जात होती. याआधी लोकसभा निवडणुकीपूर्वी २७ फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने अर्थसंकल्प मांडला होता.
या अर्थसंकल्पामध्ये चंद्रपूर जिल्हात कृषी शिक्षणाची मुहूर्त वेळ रोवण्यासाठी शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याची पुन्हा एकदा घोषणा करण्यात आली.
महाराष्ट्रातील खेळाडूसोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंनी 2024 च्या ऑलम्पिक मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे, हे उद्दिष्ट ठेवून जिल्हा क्रीडासंकुलासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील नवीन महाविद्यालयांच्या विशेष सुविधांकरिता तीनशे कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले असून या महाविद्यालयाच्या आधुनिकीकरणाचा करिता तसेच विद्यार्थ्यांना व रुग्णांकरिता विशेष सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्ह्याला विशेष निधी प्राप्त होईल.
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत राज्यातील वयोवृद्ध नागरिकांना प्रति महिना 600 रुपये एवढी मदत मिळत होती. यात अर्थमंत्र्यांनी वाढ करत वयोवृद्ध नागरिकांना प्रति महिना १ हजार रुपये मदत मिळणार आहे. या घोषणेचा फायदा जिल्ह्यातील वयोवृद्ध नागरिकांना मिळणार आहे.
वर्धा गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी घोषित असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अर्थमंत्र्यांनी 50 कोटींची तरतूद केलेली आहे.
राज्यातील आश्रमशाळांच्या विकासाकरिता आर्थिक तरतूद केलेली असून याचा लाभ जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी शिकत असणा-या आश्रमशाळांना सुद्धा होणार आहे.
नामांकित शाळा योजना महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येत असून यासाठी अर्थमंत्र्यांनी 550 कोटीची आर्थिक तरतूद केलेली आहे. यामुळे जिल्ह्यातील आठ नामांकित शाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल.
तसेच आदिवासी घरकुल योजना साठी दहा हजार पाचशे पाच कोटी रुपयांची तरतूद केली असून जिल्ह्यातील आदिवासींना हक्काचे घर मिळण्यास सुलभ होणार आहे.
सूक्ष्म सिंचनासाठी अर्थमंत्र्यांनी 350 कोटी तसेच कृषी सिंचनासाठी सहाशे कोटी दुष्काळ निवारणासाठी 4563 कोटीची तरतूद केली असून याचा फायदा जिल्ह्याला सुद्धा होणार आहे.
आतापर्यंत 140 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात आले असून भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारा गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प येत्या डिसेंबर 2021 पर्यंत पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. याकरिता अर्थमंत्र्यांनी राज्यातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 2720 कोटीची तरतूद केलेली आहे.
शेतकऱ्यांसाठी असलेली गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत दुरुस्तीत करण्यात आली असून आता शेतकऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी 210 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील चार लाख शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळेल.