आलापल्ली वनविभागातील किरण पाटील यांचा समावेश
गडचिरोली/प्रतिनिधी:
वनसेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वनसंरक्षणाच्या प्रभावी कामाबद्दल तसेच वनसेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी राज्यातील विविध वनवृत्तातील २३ कर्मचाऱ्यांना सुवर्ण व रजत पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात १२ वनाधिकाऱ्यांना सुवर्णपदक तर ११ वनाधिकारी व कर्मचाऱ्यांना रजत पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात गडचिरोली वनवृत्तात येणाऱ्या आलापल्ली वनविभागात वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून सेवा देणारे किरण पाटील यांचा समावेश आहे.
महसूल व वनविभागाच्या वतीने वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धनाचे काम प्रभावीपणे करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्याकरिता व त्यांना उत्कृष्ट कार्याबद्दल प्रोत्साहन देण्याकरिता राज्यस्तरावरून पुरस्कार व बक्षीस देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील २३ वनाधिकारी व कर्मचाऱ्यांना सुवर्ण व रजत पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. .
यामध्ये यवतमाळ व ठाणेे वनवृत्तातील साहाय्यक वनसंरक्षक एन. एन. जगताप व सचिन कंद यांना अनुक्रमे सुवर्ण व रजत पुरस्कार जाहीर झाला आहे. कोल्हापूर वनवृत्तातील विभागीय वनाधिकारी डॉ. शैलेंद्रकुमार जाधव यांना सुवर्णपदक, वनक्षेत्रपाल नागपूर व गडचिरोली वनवृत्तातील अनुक्रमे एन. आर. गावंडे व किरण पाटील यांना सुवर्ण तर पुणे वनवृत्तातील प्रताप कांबळे व योगेश महाजन यांना रजत पुरस्कार जाहीर झाला आहे. वनपालांमध्ये गडचिरोली व अमरावती वनवृत्तातील अनुक्रमेविशाल सालकर व विजय बारब्दे यांना सुवर्ण तर गडचिरोली, ठाणे व अमरावती येथील अनुक्रमे रामचंद्र तोकला, शरण देशपांडे व जी. एस. सावळे यांना रजत पुरस्कार जाहीर झाला आहे. वनरक्षकांमध्ये नागपूर, औरंगाबाद, अमरावती वनवृत्तातील अनुक्रमे नीलेश तवले, शिवसांब घोडके,आकाश सारडा व फिरोजखान अन्वरखान यांना सुवर्णपदक तर अमरावती, गडचिरोली व नाशिक येथील अनुक्रमे एन. बी, अहिरराव, कैलास चौधरी, सत्यपाल श्रीरामे, छाया बैरागी यांना रजत पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.