Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे ०८, २०१९

पाणीटंचाई निवारणासाठी 91 कोटी 49 लक्ष रुपये


  • विभागातील खर्चाचा कृती आराखडा - डॉ. संजीव कुमार
  •  3 हजार 800 गावांसाठी 7 हजार 746 उपाययोजना
  •  आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करणार

नागपूर दि. 8 : पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या विभागातील गावांमध्ये पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु असून सर्वाधिक टंचाई असलेल्या नागपूर, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातील 155 गांवातील 180 खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिले आहे.

नागपूर विभागात 3 हजार 865 गांवे व 192 वाड्यात पाणी टंचाई आराखरड्यांतर्गत तीन टप्प्यात विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या व जुलै अखेरपर्यंत टंचाई निर्माण होणाऱ्या गावांसाठी 7 हजार 746 जिल्हानिहाय उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून या उपाययोजनांद्वारे 91 कोटी 49 लाख 97 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

पाणीटंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत नवीन विंधन विहिंरीवर, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ योजना, टँकरद्वारे अथवा बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे तसेच खाजगी विहिरींचे अधिग्रहण करणे, प्रगतीपथावरील नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण करणे आदी नऊ उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे.

पाणीटंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरावरुन तातडीने अंमलबजावणी करावयाच्या 1 हजार 991 गावातील 2 हजार 644 उपाययोजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 840 गावातील 1 हजार 015 उपाययोजना प्रगतीपथावर असून 256 गावातील 492 उपाययोजना पूर्ण झाल्या असल्याची माहिती यावेळी डॉ. संजीव कुमार यांनी दिली.

दुष्काळाची तीव्रता असलेल्या गावांमध्ये विभागातील गंभीर व मध्यम स्वरुपाच्या तालुक्यांमध्ये 10 तालुक्यांचा समावेश असून काटोल, कळमेश्वर हे तालुके गंभीर स्वरुपात तर नरखेड, आष्टी, कारंजा, ब्रम्हपुरी, नागभीड, राजुरा व सिंदेवाही या सात तालुक्यांचा समावेश आहे. तसेच 45 मंडळामध्ये दुष्काळ घोषित करुन सवलती लागू केल्या आहेत. पुढील दोन महिने पिण्याच्या पाण्याची तीव्रता लक्षात घेता नागपूर जिल्ह्यात 116, वर्धा 50 व चंद्रपूर जिल्ह्यात 5 टँकर लावण्याची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांनी नियोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या आहेत.

टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना स्थानिकस्तरावर ग्रामपंचायतीमार्फत पाणी निरजंतूकीकरणाची कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी यांनी ग्रामस्तरावर आवश्यक उपाययोजना कराव्यात. पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असलेल्या प्रकल्पामधून पिण्यासाठी पाणी सोडण्यात यावे. तसेच भंडारा जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पातून, लाखांदूर तालुक्यातून 29 गावांसाठी 4 दलघमी व बावनथडी प्रकल्पातून तुमसर तालुक्यातील 13 गावांसाठी 3 दलघमी पाणी टप्प्याटप्प्याने सोडण्यात यावे. पाणीटंचाई असलेल्या सर्व गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची खंडित वीज जोडण्या पूर्ववत करणे तसेच पाणीटंचाई कालावधीत पाणीपुरवठा योजनांची देयके अदा करण्यात यावीत. निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याप्रमाणे पाणीपुरवठा विभागातर्फे तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देशही यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.