Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जानेवारी १४, २०२३

साहेब ! आम्ही ओळखीचेही नसताना तुम्ही देवासारखे धावून आलात !



*हृदयाला छिद्र असलेला चिमुकला पारसने पत्रातून मानले सुधीर मुनगंटीवार यांचे आभार..*

चंद्रपूर : राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारण करणारे लोकप्रतिनिधी बोटावर मोजण्याइतकेच. जागृत नेत्यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेमुळे जीवनदान मिळते. अशीच संवेदनशीलता दाखवलीय राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी. त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे हृदयाला छिद्र असलेल्या एका चिमुकल्याला जीवनदान मिळाले. या चिमुकल्याने पत्र लिहून मदत करणारे सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.

पारस कमलाकर निमगडे असे या चिमुकल्याचे नाव. आठव्या वर्गात शिकणारा पारस गोंडपीपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील रहिवासी आहे. पारस एक दिवस भोवळ येऊन कोसळला. वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर त्याच्या हृदयाला छिद्र असल्याचे समोर आले. डॉक्टरांनी तातडीने हृदयावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला पालकांना दिला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, शस्त्रक्रियेसाठी दीड लाख रुपये कुठून जमवायचे, या प्रश्नाने कमलाकर निमगडे व त्यांच्या परिवाराच्या समोर यक्ष प्रश्न उभा ठाकला.

पारसच्या पालकांनी ही बाब गावाचे उपसरपंच सुरेंद्र धाबर्डे आणि अमर बोडलावार यांना सांगितली. त्यानंतर निमगडे परिवारासह मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरातील जनसंपर्क कार्यालयात दाखल झाले. ना. मुनगंटीवार यांना ही बाब कळताच त्यांनी सहकाऱ्यांना सांगून पारसची शासकीय इस्पितळातून वैद्यकीय तपासणी करून घेतली. तपासणीनंतर, सावंगी मेघे येथील रुग्णालयात पारसवर शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. पारसवर शस्त्रक्रिया पूर्ण होईस्तोवर मंत्री सुधीर मुनगंटीवार जातीने याकडे लक्ष ठेवून होते. शस्त्रक्रियेनंतर पारसची प्रकृती ठणठणीत झाली आहे.

संकटकाळी देवासारखे धावून आलेल्या सुधीर मुनगंटीवार यांचे पारसने एक भावनिक पत्र लिहून आभार मानले. 'साहेब, आम्ही ओळखीचेही नसताना तुम्ही देवासारखे आमच्यासाठी धावून आलात. त्याबद्दल खूप खूप आभार. . ', अशा शब्दात पारसने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पारसचे पत्र वाचल्यानंतर अनेकांचे समाधान व डोळे आनंदाश्रूंनी पाणावले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.