शिवनेरी किल्ल्यावर वणवा
जुन्नर /आनंद कांबळे
छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर शुक्रवारी (दि. २६) दुपारी साडेबाराच्या सुमारास पूर्वभागात लागलेल्या वनव्याने रौद्ररूप धारण केले होते. वाऱ्याची दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे असल्यामुळे ही आग किल्ल्याच्या पश्चिमेकडे म्हणजे मागील बाजूस पसरत गेली.
या वनव्यामध्ये हजारो झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून वन्यजीव व वनसंपदेचे मोठे नुकसान झाले आहे. कुणी माथेफिरूने ही आग लावल्याची प्राथमिक माहिती आहे. वन विभागाचे २५ ते ३० कर्मचारी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी दिली. दुपारी चार वाजेपर्यंत ही आग किल्ल्याच्या कडेलोट परिसरापर्यंत पोचली होती आणि या भागात असलेल्या तीव्र उतारामुळे कर्मचाऱ्यांना तेथे जाऊन आग विझविण्यासाठी मोठ्या अडचणींना सामना करावा लागत होता.
जुन्नर तालुक्यातील चावंड, लेण्याद्री डोंगर रांग, तुळजाई लेणी परिसर, पारुंडे परिसरातील डोंगर आदी विविध ठिकाणी वणव्याच्या घटना सुरूच आहेत. मात्र या आगी लावणाऱ्या माथेफिरू किंवा मद्यपींविरोधात कोणतीही कठीण कारवाई झालेली नाही. या समाजकंटकांना शोधणे अवघड असून कोणाला या वनव्याबाबत माहिती असल्यास त्यांनी वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळणार असून त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.