आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन
चंद्रपूर, दि.11 मार्च- मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी नवी दिल्ली येथे काल 7 टप्यामध्ये लोकसभा निवडणूक होणार असल्याचे जाहीर केले आहे. चंद्रपूर मतदार संघात या घोषणेनुसार 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.
चंद्रपूर जिल्हयासाठीचा निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आला आहे. आवेदनपत्र भरण्याची सुरुवात 18 मार्च पासून सुरु होईल. आवेदनपत्र भरण्याची अंतिम तिथी 25 मार्च आहे. आवेदनपत्राची छाननी 26 मार्चला होईल. आवेदनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख 28 मार्च 2019 आहे. उमेदवारांच्या अंतिम यादीची घोषणा 29 मार्च रोजी करण्यात येईल. प्रचाराची अंतिम तारीख 9 एप्रिल आहे. तर मतदान 11 एप्रिल रोजी होऊन मतमोजनी 23 मे रोजी होणार आहे.
जिल्ह्यामध्ये राजूरा, चंद्रपूर ,बल्लारपूर, ब्रह्मपूरी, चिमूर, वरोरा या सहा विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. मात्र चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी या दोन विधान मतदारसंघांचा समावेश असून राजूरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, वणी, आर्णी अशा 6 विधानसभा क्षेत्रांना मिळून हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे.
31 जानेवारी 2019 रोजी अंतिम प्रसिध्द केलेल्या यादीनुसार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांमध्ये 18 लक्ष 89 हजार 897 मतदारांपैकी 17 लक्ष 90 हजार 181 मतदारांकडे निवडणूक फोटो ओळखपत्रे उपलब्ध आहेत. ही टक्केवारी 94.72 टक्के आहे. 2014 मध्ये मतदारांची संख्या 17 लक्ष 52 हजार 615 ती आता 18 लक्ष 89 हजार 897 झाली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना 70 लक्ष रुपयांची खर्च मर्यादा आहे. याशिवाय या निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असणा-या उमेदवारांची माहिती देखील जाहीर केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाचे 10,764 कर्मचारी कार्यरत आहे. या निवडणुकीसाठी लोकसभा मतदारसंघांमध्ये राजूरा (358), चंद्रपूर (385) बल्लारपूर ( 364) वरोरा (332) वणी (322) आर्णी (364) असे एकूण 2125 मतदार केंद्राचा समावेश आहे. जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी निवडणुकीची घोषणा झाल्याच्या तारखेपासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याच्या तारखेपर्यंत उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
शासकीय वाहने किंवा कर्मचारी -अधिकारी वर्ग किंवा यंत्रणा यांचा निवडणूक प्रचार विषयक कामासाठी वापर करण्यात येऊ नये. शासकीय वाहनांचा कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वापर करू नये. तसेच या काळामध्ये शासकीय कोषागाराच्या खर्चाने कोणतीही जाहिरात देऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
आचारसंहिता अंमलात आल्यामुळे उद्घाटन, भूमिपूजन आदी बाबींवरही निर्बंध घालण्यात आले असून मतदारांना प्रभावित करणाऱ्या कोणत्याही राजकीय घोषणा केल्यास कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.
जाहीर सभांमध्ये किंवा राजकीय कार्यक्रमांमध्ये मतदारांना आर्थिक किंवा अन्य प्रकारच्या प्रलोभनांना जाहीर करणे निर्बंधित असून मतदारांना जातीय किंवा धर्माच्या नावावर मते मागण्यासंदर्भात ही शासकीय यंत्रणेने करडी नजर ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
निवडणूक प्रचार काळामध्ये निवडणूक साहित्य लावण्यासाठी किंवा संदेश प्रक्षेपित करण्यासाठी धार्मिक स्थळांचा वापर केला जाणार नाही. याची काळजी घेण्याचे,आवाहन देखील करण्यात आले आहे.
खासगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर कोणाच्याही परवानगीशिवाय फलक लावणे. पक्षाचे झेंडे लावणे हा देखील आचारसंहितेचा भंग ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
लाऊडस्पीकर वरील प्रचाराच्या संदर्भात सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत प्रचार करता येणार आहे. मात्र परवानगीशिवाय हा प्रचार करता येणार नाही. या कालावधीचा उल्लंघन झाल्यास आचारसंहितेचा भंग म्हणून कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
या निवडणुकीमध्ये सोशल मीडियावरील जाहिरातीदेखील निर्बंधित करण्यात आल्या असून सर्व उमेदवारांना सोशल मीडिया अकाऊंटची माहिती देणे बंधनकारक आहे. सोशल मिडियावर कोणत्याही जाहिराती दिली जाणार नाही, याची काळजी घेणे देखील उमेदवारांची जबाबदारी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी यावेळी आदर्श आचारसंहितेचे पालन करताना जिल्ह्यामध्ये कुठलीही अनुचित घटना घडणार नाही, यासाठी सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन केले. या सोबतच निवडणूक वेबसाईटवर असणारी माहिती व वेळोवेळी निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या आदेशाची अंमलबजावणी प्रत्येकाने करण्याबाबत निर्देश दिले. यावेळी निवडणूक आयोगातर्फे ॲप देखील सुरू करण्यात आले असून निवडणुकीच्या काळामध्ये सामान्य जनतेला देखील निष्पक्ष निवडणूक होण्यासाठी नवे व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. याबाबतचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. या ॲप वरील कोणत्याही आक्षेपाला 100 मिनिटाच्या आत समाधानकारक उत्तर द्यायचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यामध्ये मतदारांना असणाऱ्या अडीअडचणी व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एक टोल फ्री हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आलेला आहे. 1950 या टोल फ्री क्रमांकावर कोणत्याही मोबाईल वरून व लँडलाईन वरून दूरध्वनी करून आपली नावे मतदार यादीत आहे अथवा नाही व अन्य माहिती कार्यालयीन वेळेमध्ये दिली जाणार आहे. कोणत्याही अडचणी संदर्भात जिल्ह्यातील मतदारांनी 1950 या हेल्पलाइन क्रमांकाचा वापर करावा असे आवाहन देखील जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
देशात 7 टप्यामध्ये निवडणूक होणार
भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केल्यामुळे जिल्हयामध्ये तात्काळ प्रभावानुसार 10 मार्चपासूनच आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. देशात 7 टप्यामध्ये निवडणूक होणार असल्याचे जाहीर केले आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल व 6, 12 व 19 मे अशा 7 टप्यात ही निवडणूक होत आहे. महाराष्ट्रात 4 टप्प्यात एप्रिल महिन्यातच निवडणूक होणार आहे. यामध्ये 11 एप्रिल रोजी 7 जागांसाठी, 18 एप्रिल रोजी 10 जागांसाठी, 23 एप्रिल रोजी 14 जागांसाठी , 29 एप्रिल रोजी 17 जागांसाठी अशा एकूण 48 जागांसाठी निवडणूक होणार आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 7 टप्यात होणाऱ्या या निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे.