- चंद्रपूर लोकसभेसाठी 64.66 टक्के मतदान
- वणीमध्ये सर्वाधिक 71.81 तर चंद्रपूरमध्ये सर्वात कमी 53.10 टक्के
- 23 मे रोजी एमआयडीसमध्ये वखार महामंडळात मतमोजणी
चंद्रपूर, दि.11 एप्रिल – लोकसभा निवडणुकीसाठी काल 11 एप्रिल रोजी चंद्रपूर-वणी-आर्णी या मतदार संघामध्ये झालेल्या निवडणुकीत विदर्भात चंद्रपूर जिल्हयात सर्वाधिक तापमान असतांना देखील 64.66 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान वणी विधानसभा क्षेत्रात झाले. तर सर्वात कमी मतदान चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात झाले. रात्री उशीरापासून इव्हीएम मशीन संच एमआयडीसीमधील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामामध्ये पोहचविण्यात आले होते. आज दुपारी उमेदवारांच्या उपस्थितीत व निरीक्षकांच्या देखरेखीखाली गोदामामध्ये इव्हीएम मशीन संच सीलबंद करण्यात आले. काल रात्री सर्वसंबंधीत विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयात जमा करण्यात आलेल्या इव्हीएम मशीन संच (इव्हीएम, व्हीव्हीपॅट, कंट्रोल युनिट) आज सर्व ठिकाणावरुन चंद्रपूर येथील एमआयडीसी परिसरातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाममध्ये विधानसभा मतदार संघनिहाय ठेवण्यात आल्या आहेत. याच ठिकाणी 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. तोपर्यंत हा संच सुरक्षित राहावा, यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला जबाबदारी देण्यात आली असून सहाय्यक उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वात या दलाचे जवान आता या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. हा परिसर पूर्णत: सीलबंद करण्यात आला असून पसिरातील तगडा बंदोबंस्त लावण्यात आला आहे.
निरीक्षक दिपांकर सिन्हा, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, निवडणूक उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर, चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाड, बल्लारपूरचे महादेव खेडकर, वरोराचे सुभाष शिंदे, वणीचे शरद जावळे, आणीच्या उपविभागीय अधिकारी एस.भुवनेश्वरी तथा वेगवेगळया विभागाचे नोडल अधिकारी यांच्या उपस्थित व लोकसभेसाठी उभे असणारे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत इव्हीएम संच सीलबंद कण्यात आला. तत्पूर्वी जमा करण्यात आलेल्या इव्हीएम संच व सीलबंद करण्याच्या व्यवस्थेत उमेदवार त्यांच्या प्रतिनिधींना साक्षी ठेवण्यात आले.
चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी काल सकाळी 7 ते सायं.6 पर्यंत 64.66 टक्के मतदान झाले. 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत ही टक्केवारी अधिक आहे. गेल्या 2014 च्या निवडणुकीत 63.25 टक्के मतदान झाले होते. यावर्षी एक टक्क्यापेक्षा अधिक मतदान झाले असून विदर्भात काल झालेल्या नागपूर, वर्धा, यवतमाळ या तीन लोकसभा मतदार संघापेक्षा ही टक्केवारी अधिक आहे. यावर्षी सर्वाधिक मतदान वणी विधानसभा क्षेत्रात झाले असून टक्केवारी 71.81 होती. तर त्यानंतर राजूरा मतदार संघात 69.61, आर्णी मतदान संघात 69.52, बल्लारपूर मतदार संघात 64.16, वरोरा मतदार संघात 63.35 तर सर्वाधिक कमी मतदान चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात झाले आहे. ही टक्केवारी केवळ 53.10 टक्के आहे.
यासोबतच 13 उमेदवारांचे भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये सीलबंद झाले आहे. चंद्रपूर लोकसभा चंद्रपूर जिल्ह्यात 13 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये भाजपचे हंसराज अहीर, कॉग्रेसचे सुरेश धानोरकर, बहुजन समाज पार्टीचे सुशील वासनिक, बहुजन मुक्ती पार्टीचे डॉ.गौतम गणपत नगराळे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे दशरथ पांडुरंग मडावी, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नामदेव माणिकराव शेडमाके, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे नितेश आनंदराव डोंगरे, प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाचे मधुकर विठ्ठल निस्ताने, वंचित बहुजन आघाडीचे ॲड. राजेंद्र श्रीरामजी महाडोळे, अपक्ष उमेदवार अरविंद नानाजी राऊत, नामदेव केशव किनाके, मिलिंद प्रल्हाद दहिवले, राजेंद्र कृष्णराव हजारे यांचा समावेश आहे.