चंद्रपूर,दि.9 एप्रिल : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने चंद्रपूर लोकसभा मतदार संघात 11 एप्रिल (गुरुवार) मतदानाची तारीख आहे. मतदानाच्यादिवशी जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघाच्या काही गावांमध्ये आठवडी बाजाराचा दिवस आहे. परंतू यादिवशी मतदान प्रक्रियेत कोणतीही बाधा पोहोचूनये म्हणून संबंधित गावांतील आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहे. त्यासंबंधीचे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील 70- राजूरा, 71- चंद्रपूर, 72- बल्लारपूर, 73- ब्रह्मपूरी, 74- चिमूर व 75- वरोरा या 6 विधानसभा मतदार क्षेत्रात एकूण 2131 मतदान केंद्रावर 11 एप्रिलला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीच्या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा तसेच मतदान शांततेत पार पडावे या दृष्टिकोनातूनच्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आठवडी बाजार भरविण्यात येतात अशा ठिकाणचे आठवडी बाजारबंद ठेवण्यास आणि ते अन्य दिवशी भरविण्याचे आदेश देण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात 11 एप्रिल रोजी मतदानासाठी सुट्टी असेल. ही सुट्टी कामासाठी आपल्या लोकसभा मतदार संघाच्या क्षेत्राबाहेर असतील अशाकर्मचाऱ्यांनाही लागू असेल. राज्य व केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम तसेच अकृषी, कृषी आणि अन्य विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, शिक्षण संस्था आदींनाही ही अधिसूचना लागू राहील.