Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल ०९, २०१९

प्रचार संपला ; 11 एप्रिलला मतदान

  • पोलींग पार्टी  10 एप्रिलला होणार रवाना
  • उन्हापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय योजना
  • नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

चंद्रपूर दि.9 एप्रिल :
चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 11 एप्रिलला मतदान होणार आहे. प्रशासनाचे 15 हजार कर्मचारी या पूर्ण प्रक्रियेत सहभागी झाले असून उद्या सकाळी मतदान पथक रवाना होणार आहे. 13 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. तथापि, जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात असलेल्या उष्णतेच्या लाटेचा फटका बसू नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याची व्यवस्था प्रशासनामार्फत केली जाणार आहे. नागरिकांनी उन्हापासून संरक्षण करीत 11 एप्रिलच्या मतदानामध्ये मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी जिल्हयातील नागरिकांना केले आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण 19 लाख 4 हजार 32 सर्वसाधारण मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 9 लाख 84 हजार 381, महिला मतदारांची संख्या 9 लाख 19 हजार 628 व तृतीयपंथी 20 आहेत. दिव्यांग मतदार 6 हजार 269 यामध्ये अंध मतदारांची संख्या 896 आहे. चंद्रपूर मतदार संघातील 52 मतदान केंद्र संवेदनशील असून या ठिकाणी आवश्यक उपाय योजना करण्यात आल्या आहेत.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील मतदान करण्यासाठी एकूण 2193 मतदान केंद्रे आहेत. या मतदान केंद्रनिहाय ई.व्ही.एम मशीन बसविण्यात येणार असून अतिरीक्त राखीव इ.व्ही.एम मशीन सुध्दा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. या इ.व्ही.एम मशीन सोबत कंट्रोल युनिट 2569, बॅलेट युनिट 2576 आणि व्हीव्हीपॅट 2554 असे 3 युनिट प्रत्येक मतदान केंद्रावरअसणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रथमच व्हिव्हिपॅट वापरण्यात येणार असल्याने मतदारांमध्ये व्हिव्हिपॅट विषयी उत्सुकता असणार आहे.

मतदान केंद्रावर इ.व्ही.एम मशीन सुरळीत चालावी तसेच इ.व्ही.एम मशीनवर मतपत्रिका चिटकवून या मशीन मतदानासाठी तयार करुन हे सर्व काम प्रशासनातील अधिकारी, कर्मचा-यांनी पूर्ण केले असून आज दिनांक 10 एप्रिल 2019 रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलींग पार्टी (मतदानासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचे पथक ) रवाना होणार आहे. ही पोलींग पार्टी रवाना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली असून या सुरक्षेतच जिल्हृयातील मतदान केंद्रावर पोलींग पार्टी पोहचणार आहे.

कलम 144 लागू
जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आज सायंकाळी 6 वाजता प्रचार संपल्यानंतर फौजदार प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अंतर्गत 9 ते 12 एप्रिल पर्यंत 144 कलम लागू केली आहे. यामुळे या काळात सार्वजनिक सभा व पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर निर्बंध घातले आहेत. तसेच 11 एप्रिल रोजी खाजगी वाहनांवर देखील बंदी घातली आहे. मतदारांना मतदान केंद्रावर वाहून नेण्याच्या प्रथेला पायबंद घालण्यासाठी खासगी टॅक्सी, कार, ट्रक, ॲटोरिक्षा, मिनीबस, स्टेशन वॅन, स्कुटर आदी प्रकारच्या सर्व वाहनांवर निर्बंध घालण्यात आले आहे. तथापि, यातून ॲम्बुलन्स, दुध गाडया, टँकर व निवडणूक कर्मचा-यांच्या, पोलीसांच्या वाहनांना वगळण्यात आले आहे.

जिल्हयात गेल्या काही दिवसापासून उष्णतेची लाट असून यापासून नागरिकांनी स्वत: बचाव करत आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मतदान केंद्रावर पुरेशा सावलीत मतदान करता येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय पिण्याचे पाणी, निवडणुकीच्या साहीत्यापासून तर मतदान केंद्रावरील रॅम्प, विद्युत व्यवस्था, शेड, मेडीकल किट, व्हीलचेअर या सर्व सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी दिवस रात्र काम करीत असून ही सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

पुढील 48 तास घ्या खबरदारी
निवडणूक प्रचार कालावधी मतदान संपण्याच्या 48 तास आधी म्हणजेच 9 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता प्रचाराचा कालावधी समाप्त झाल्यानंतर कोणतीही सभा किंवा मिरवणूक घेता येणार नाही. निवडणूक प्रचार मतदान केंद्रापासून 100मिटर अंतराच्या आत निवडणूकीचा प्रचार करणे हा निवडणूक कायद्यान्वये गून्हा आहे. तसे करणाऱ्यास कोणत्याही व्यक्तीस पोलीसांकडून बिना वॉरंट शिवाय अटक होऊ शकेल आणि त्या व्यक्तीवर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम,1951 चे कलम 130अन्वये खटला भरला जाऊ शकेल.

त्याचप्रमाणे ‍ निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना मतदान केंद्रापासून 200 मिटर अंतराच्या आत मंडप उभारता येणार नाही. तसेच मतदान केंद्रापासून 200 मिटर अंतरापलीकडे मतदारांना अनौपचारिक ओळखपत्र वाटण्याच्या कामासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींना व कार्यकर्त्यांना वापरता यावे म्हणून याकरिता उमेदवारांना एक टेबल व दोन खुर्च्या ठेवता येईल. ऊन व पावसापासून संरक्षण म्हणून छत्री किंवा ताडपत्री टाकावी परंतू या टेबल भोवती गर्दी जमा होऊ देऊ नये याची खबरदारी बाळगावी. मतदान केंद्राच्या 200 मिटरच्या आत रुग्णालय, शैक्षणिक संस्थेच्या परिसरात किंवा धार्मिक ठिकाण असलेल्या परिसरात अतिक्रमण करून असे कोणतेही कार्यालय उभारता येणार नाही. निवडणूक मतदान चालू असताना गैरवर्तन करणाऱ्या किंवा कायदेशीर सुचनांचे पालन न करणाऱ्या व्यक्तीला नियुक्त पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा प्राधिकृत अधिकारी मतदान केंद्रातून घालवून देतील.

या सर्व सूचनांचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य राहील, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.