प्रहार' करते नागरिकांवर सैनिकी गुणांचे संस्कार - ग्रामायण ज्ञानगाथा मध्ये शिवाली देशपांडे
Shivali Deshpande in Gramayan Gyanagatha
नागपूर- भारताला आदर्श राष्ट्र बनवण्यासाठी नागरिकांवर सैनिकी गुणांचे संस्कार करण्याचे काम 'प्रहार समाजजागृती संस्था' करते, अशी माहिती संस्थेच्या संचालक फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांनी ग्रामायणच्या संस्थागाथा मध्ये 'संस्था परिचय' करून देताना दिली. शिवाली या प्रहारचे संस्थापक कर्नल कै. सुनील देशपांडे यांच्या कन्या आहेत. शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून शिवाली यांनी उद्बोधन आरंभ केले.
कै. सुनील देशपांडे यांनी १९६५ आणि १९७१ च्या भारत - पाकिस्तान युद्धात भाग घेतला होता. नाना पाटेकर यांच्या 'प्रहार' या सैनिकी जीवनावर आधारित चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी सुनील देशपांडे यांचा नाना पाटेकर यांच्याशी संबंध आला. सैनिकी जीवनाचा अभ्यास करण्यासाठी नाना पाटेकर १९९० ला काही दिवस बेळगावच्या सैनिक कॅम्पमध्ये राहिलेत. यावेळी नाना पाटेकर यांच्यासोबत झालेल्या चर्चांमधून सुनील देशपांडे यांना जाणवले की समाजातील वाईट वृतींचा सामना करण्यासाठी देशाच्या नागरिकांमध्ये सैनिकी गुणांचा संस्कार करणे आवश्यक आहे. त्यानंतर सुनील देशपांडे यांनी लष्करातून निवृत्ती घेऊन १९९४ ला 'प्रहार'ची स्थापना केली, अशी माहिती शिवाली यांनी दिली.
प्रहारतर्फे नागपूरला सी. पी. अँड बेरार येथे 'प्रहार मिलिट्री शाळा, खामला येथे बालवाडी ते वर्ग ४ पर्यंत शाळा आणि उमरेड रॉड येथे १ ली १० वी पर्यंतची शाळा चालवली जाते. प्रहार डिफेन्स अकॅडमीतर्फे 'हिरो ऑफ द नेशन' उपक्रमात 'परमवीरचक्र' आणि 'अशोकचक्र' प्राप्त सैनिक किंवा त्यांच्या परिवारांच्या सदस्याचा सत्कार करण्यात येतो. नागरिकांना सैनिकी जीवनाचा परिचय व्हावा, त्यांच्यावर शिस्त, निर्भयता, राष्ट्रप्रेम, समाजसेवा आणि जागरूकता या गुणांचे संस्कार व्हावेत म्हणून प्रहारतर्फे साहसी खेळ, हिमालय आणि सातपुड्यात ट्रॅकिंग, प्रशिक्षण शिबिर असे उपक्रम राबवले जातात.
सामाजिक उपक्रमात संत गजानन महाराज सेवाकेंद्र चालवले जाते. स्वछता, वृक्षारोपण मोहीम राबवली जाते. वृद्धाश्रम चालवला जातो. सुदामा ज्या मार्गाने श्रीकृष्णाला भेटायला गेले होते त्यामार्गावर गुजरातमध्ये पोरबंदर ते द्वारका पदयात्रा काढली जाते, अशी माहिती त्यांनी दिली.
स्वातंत्र्यानंतर जे युद्ध झालेत त्यात आमच्या सैनिकांनी युद्धाच्या सर्वोत्तम गुणांचे प्रदर्शन केले. भारताच्या लष्कराच्या या गौरवशाली कामगिरीची माहिती नागरिकांना व्हावी म्हणून याचा इतिहासात समावेश व्हावा, अशी सूचना शिवाली यांनी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय आणि आभार प्रदर्शन मंजूषा रागीट यांनी केले.
Shivali Deshpande in Gramayan Gyanagatha