Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जानेवारी १०, २०२०

..आणि नाटकाच्या सादरीकरणाचं कारणंच संपलं! #zadipatti



पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमी आणि तिथे सादर होणारी हजारो नाटके हा महाराष्ट्रातील नाट्यरसिक, प्रसारमाध्यमे आणि कला समीक्षकांसाठी नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. नाटकाच्या पाच महिन्याच्या सिजनमध्ये करोडो रुपयांची उलाढाल होत असल्याच्या बातम्या वारंवार वाचून अनेकांच्या भुवया उंचावणे अत्यंत स्वाभाविक आहे. पण अलीकडे ह्या श्रीमंतीला उतरती कळा लागली की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कधी न्हवे ती यावर्षी झाडीपट्टीच्या नाटकांची संख्या रोडावली आहे चिंताजनक आहे.झाडीपट्टीत कार्यरत ग्रुप एकेका सिजनमध्ये पन्नास, शंभर, सव्वाशे,दीडशे नाट्यप्रयोग सादर करतो. मात्र यावर्षी काही बोटावर मोजण्याइतपत ग्रुप सोडले तर नाटकांवर मंदी आल्याचे चित्र दिसत आहे. याची वेगवेगळी कारणे नाट्य निर्माते सांगतांना दिसतात. कुणी थंडीचे कारण सांगतो तर कुणी ओला दुष्काळ पडल्याने ही मंदी आल्याचे सांगतो. तर कलाकारांच्या मानधनात भरमसाट वाढ झाल्याने नाटकाची प्रोडक्शन कास्ट वाढली परिणामतः नाटकाचे भाव वधारले अश्याही बातम्या काही वर्तमानपत्रातून झडकल्या आहेत. ही कारणे नाकारता येतं नाहीत .मात्र मुख्य कारण वेगळंच आहे असं मला वाटतं.
ज्या एका विशिष्ट परंपरेतून झाडीपट्टीच्या नाटकांचा जन्म झाला ते कारणंच काही वर्षात संपुस्टात आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असू शकते.
शेकडो वर्षांपासून झाडीपट्टीच्या जंगलव्याप्त प्रदेशात बैलांच्या जंगी पटाचे आयोजन करण्याची परंपरा होती. झाडीपट्टीतील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा ही चारही जिल्हे धानशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची जिल्हे म्हणून ओळखल्या जातात.
ऑक्टोबर - नोव्हेम्बर मध्ये धानपिक घरी आल्यानंतर बैलांना शेतीची कामे नसतात. त्यामुळे बैलांची विशेष काळजी घेऊन त्याला धावण्याच्या स्पर्धेसाठी तयार केल्या जात असे.त्या स्पर्धेला 'बैलाचे जंगी शंकरपट' असे संबोधल्या जात होते. गावाबाहेर खूप मोठ्या पटांगणावर दोन ट्रॅक (ट्रॅक ला 'दान' हे पारंपारिक नाव आहे) तयार करून त्या दोन ट्रॅक वरून दोन प्रतिस्पर्धी बैलजोड्या धावण्यासाठी सज्ज राहायच्या. आणि ही स्पर्धा बघण्यासाठी ट्रॅक च्या दोन्ही बाजूनी हजारोच्या संख्येने प्रेक्षक उभे राहत.
बैल जोडयांना पूर्ण जोशात चिअरअप करण्याचे काम हे प्रेक्षक करीत. प्रेक्षकांच्या परिघानंतर जत्रेत असावीत तश्या दुकानांची आणि हॉटेलची रेलचेल असायची. त्यामुळे पंचक्रोशीतून बालगोपालांपासून स्त्री पुरुषांपर्यंत जवळजवळ दहा पंधरा हजाराहून अधिक लोक ही स्पर्धात्मक जत्रा अनुभवण्यासाठी एकत्र येत असत. हॉटलवाले, फुगेवाले, चक्रीवाले, मनेरीवाले, खेळणीवाले, बांगळ्यावाले यांच्या दुकानांनी ही जत्रा भरगच्च आणि रंगीबेरंगी व्हायची. याच बैलांच्या शंकर पटाचा आस्वाद घ्यायला आलेल्या सुंदर मुलींना बघून रीतसर वधू-वर परीक्षण व्हायचे, त्यानंतर दोन कुटुंबात सोयरीक करण्याची एक परंपरा सुद्धा होती. त्यानिमित्त दुपारच्या शंकरपटानंतर घरोघरी पाहुणे असायचे.
त्याकाळात प्रवासाची प्रगत साधने नसल्याने पाहुण्यांचा मुक्काम ठरलेलाच. घरोघरी आलेल्या ह्या सर्व पाहुण्यांच्या रात्रीच्या मनोरंजनासाठी नाटकाचे आयोजन केले जायचे. हे नाटक सादरीकरणामागचे खरे कारण होते. पटासाठी जमलेल्या गर्दीच्या स्वरूपानुसार नाटकांची संख्या पण ठरत असे. एका शंकरपटानिमित्त एकाच रात्री कुठे दोन तर कुठे आठ दहा नाटकाचे आयोजन केले जात असायचे. त्यामुळे नाटकाच्या निमित्तानं वेगवेगळे व्यवसाय करणाऱ्या व त्या व्यवसायावरच उपजीविका करणाऱ्या छोट्या उद्योजकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सहज सुटत असे. नाट्यनिर्मात्यांचे प्रयोग अधिक होतं असल्याने प्रत्यक्ष पडद्यावरचे व पडद्यामागील कलाकारांचे सुगीचे दिवस होते. मुंबईपासून ते चंद्रपूर पर्यंतच्या सर्वच कलाकारांना सन्मानजनक आर्थिक मदत ह्या नाटकातून होत होती. नाट्यकलावन्त, लेखक, संगीतकार, गायक, वादक, नृत्यांगना, नेपथ्यकार, नृत्याविष्कार समूह यांचा चांगला व्यवसाय या निमित्त व्हायचा. झाडीपट्टीने या सर्व कलावंतांचे पालकत्व स्वीकारले होते असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल.
मात्र अलीकडेच मायपाप सरकारने ह्या *पारंपारिक शंकरपटावर बंदी घातल्याने नाटक सादर करण्याचे मूळ कारणंच संपले* आणि हळूहळू काही वर्षातच नाटकांच्या सादरीकरणावर त्याचे विपरीत परिणाम दिसायला सुरुवात झाली. शहरात थंड हवेच्या चेंबरमध्ये बसून प्राण्याच्या बचावासाठी संघर्ष करणाऱ्या प्राणीबचाव संघटनांनी बैलांच्या स्पर्धेवर बंदी घालण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. कारण काय तर मुक्या जनावरांची स्पर्धा लावून माणूस त्यांच्यावर अत्याचार करतो म्हणे.
त्याच जनावरांना कसायाकरवी कापायला नेत असताना मात्र ह्या तथाकथित प्राणी प्रेमींनी कधी तीव्र आंदोलने केली नाहीत. सरकारला धारेवर धरल्याचे ऐकिवात नाही. मात्र पटांमध्ये धावणाऱ्या बैलांवर जीवघेणा अत्याचार होतं असल्याचा जावईशोध त्यांना लगेच लागला.
उद्या तर शेतात काम करण्याचे श्रम बैलांकडून करवून घेणे हा सुद्धा गुन्हा ठरला तर फार आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
शंकरपटाच्या शर्यतीसाठी तयार करण्यात आलेल्या बैलांची शेतकऱ्यांकडून किती काळजी घेतली जाते याची या सरकारी अधिकारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना खरं तर कल्पना नसावी. ह्या बैलांच्या खाण्यापिण्यापासून तर त्याच्या वैदयकीय उपचारापासूनची सारी विशेष सुविधा शेतकरी ह्या जनावरांना पुरवतो. त्याला शेतीच्या कामांपासून सूट दिलेली असते. अशा बैलांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जाते. एवढंच नाही तर अत्तराच्या सुगंधी बोळ्याने त्याचे शरीर नियमित पुसले जाते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याला न्यायचे तर मेटॅडोअर सारख्या वाहाणाचा उपयोग केला जातो. त्या बैलाच्या सेवेसाठी पूर्णवेळ एक गडीमाणुस असतो. तरीही शेतकरी बैलांवर अत्याचार करतात अशी बोंब ह्या संघटना मारतात आणि सरकार त्यावर विश्वास पण ठेवतं.
       खरं तर काही अटी आणि शर्थी लागू करून ह्या स्पर्धांना मान्यता द्यायला हरकत न्हवती. मात्र तसे झाले नाही. आश्चर्य म्हणजे पोलीस प्रशासन या बाबतीत कमालीचे प्रामाणिक आहे. प्रशासनाचे इतके कर्तव्यदक्ष असणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोस्ट आहे. पण या निमित्ताने एक प्रश्न सहज डोक्यात येतो. तो असा की, बैलांच्या शर्यती सुरू होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेणाऱ्या प्रशासनाला झाडीपट्टीतील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे याचे स्मरण आहे का?
बंदी असतानाही दारूचा महापूर या दोन जिल्ह्यांमध्ये वाहातो तसाच पटांवर बंदी असतानाही पट संस्कृतीचा महापूर ह्या चार जिल्यांमध्ये वाहायला लागला तर 
किमान महाराष्ट्राची शंभर वर्षांहून अधिक वर्षांची झाडीपट्टीची नाट्यपरंपरा पुन्हा भरभराटीस येईल. नाटयव्यवसायाशी जुळलेल्या सर्वच घटकांच्या हाताला काम मिळेल. फक्त दारू प्रमाणे बैलाच्या शर्यतीकडे थोडसं दुर्लक्ष करायची गरज आहे. बस...

सहज एक प्रश्न पडला म्हणून...
जेष्ठ नाट्यकलावंत सदानंद बोरकर यांनी लिहलेली फेसबूक पोस्ट 




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.