Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जानेवारी ०९, २०२०

वीज कर्मचाऱ्यांनी स्पर्धेच्या युगात स्वत:मध्ये बदल करून सांघिक भावना जोपासावी:चंद्रकांत थोटवे

ऊर्जामंत्र्यांनी दिल्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा, लवकरच करणार खापरखेडा दौरा 
३० व्या वर्धापन दिनाची शानदार सांगता 
३४५ पिशव्या रक्तदानातून जोपासली सामाजिक बांधिलकी 
टेक फेस्ट,ऊर्जा प्राद्योगिकी अभिनव उपक्रम 
आनंद मेळावा, क्रीडा,सांस्कृतिक व मनोरंजनातून चैतन्यमय वातावरण  
नागपूर/प्रतिनिधी:

अधिकारी-कर्मचारी-कुटुंबियांशी संवाद साधायला मला नेहमीच आवडते, अश्या संवादातून नवनवीन संकल्पना समोर येतात. स्पर्धेच्या युगात आता प्रत्येकाने थोडे-थोडे बदलले पाहिजे याकरिता ठाम निश्चय, एकमेकांना समजून घेण्याची भावना, प्रेम-भाव, चिकित्सक वृत्तीने काम,उत्तम नियोजन आणि एकत्र मिळून काम करण्याची भावना स्वत:मध्ये निर्माण करा असे महानिर्मितीचे संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे यांनी खापरखेडा येथील मनोरंजन केंद्र क्रमांक १ सभागृहात ३० व्या वर्धापन दिन समारोपीय समारंभात प्रतिपादन केले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानिर्मितीचे संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे होते तर मंचावर मुख्य अभियंते प्रकाश खंडारे, धैर्यधर खोब्रागडे, राजकुमार तासकर, राजेश पाटील, दिलीप धकाते, उप मुख्य अभियंते राजेंद्र राऊत, शरद भगत, सुनील सोनपेठकर व जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते प्रामुख्याने उपस्थित होते.

संचालक पाच सूत्री, अरर, थ्री आर, वर्किंग फॉर बेटर टुमॉरो, पोल सारख्या उपक्रमांतून महानिर्मितीमध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहे व त्याचाच परिपाक म्हणजे खापरखेडा वीज केंद्र सातत्याने वीज उत्पाद्नासोबत विविध क्षेत्रात आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचे उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी खापरखेडा वीज केंद्र वर्धापन दिनानिमित्त येथील अधिकारी-अभियंता-कर्मचाऱ्यांना विशेष शुभेच्छा दिल्या आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून वीज उत्पादनाच्या खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने कसोशीने प्रयत्न करावा असे कळविले आहे. मा. उर्जामंत्री लवकरच खापरखेडा वीज केंद्राचा दौरा करणार असल्याचे चंद्रकांत थोटवे यांनी सांगितले. 

प्रारंभी चित्रफितीतून मागील वर्षभरातील विशेष कामगिरीचा धावता आढावा व नववर्षाचा संकल्प अतिशय प्रभावीपणे प्रदर्शित करण्यात आला. याप्रसंगी प्रकाश खंडारे म्हणाले कि, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राने मागील वर्षभरात वीज उत्पाद्नासोबातच विविध क्षेत्रात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर दैदिप्यमान कामगिरी बजावली आहे.  प्रशासन सांभाळत असतांना अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागतात. मात्र मला येथील लोकांनी जे सहकार्य केले त्याबद्दल प्रत्येकाप्रती त्यांनी आभार व्यक्त केले व आता वाणिज्यिक दृष्ट्या आपल्याला अधिक सक्षम होणे गरजेचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. 
राजेश पाटील म्हणाले कि, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र हे नवनवीन उच्चांक गाठण्यात नेहमीच अग्रेसर असते. राजकुमार तासकर म्हणाले कि खापरखेड्याच्या मातीत आणि येथील लोकांमध्ये काहीतरी विशेष गुण असावा ज्यामुळे सातत्याने कार्यक्षमता वाढीस लागत आहे. धैर्यधर खोब्रागडे यांनी सांगितले कि प्रकाश खंडारे यांनी वर्धापन दिनानिमित्त अभिनव स्वरूपाचे उपक्रम राबवून येथील लोकांमध्ये कमालीचा उत्साह वाढविला आहे. यानंतर शरद भगत व राजेंद्र राऊत यांची समयोचित भाषणे झाली. 

याप्रसंगी विलास शेंडे, विशाल बनसोडे, गृहिणी प्रतिनिधी- सौ. पूजा बंग, यांनी वर्धापन दिनानिमित्त प्रशंसापर प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर पुरुषांच्या बरोबरीने वीज उत्पादनाची दोरी आता महिला सांभाळण्यास तयार असल्याचे गौरवोद्गार महिला प्रतिनिधी-पल्लवी शिरसाठ यांनी काढले.   

वर्धापन दिनानिमित्त क्रिकेट, बॅडमिंटन,टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, कॅरम, गंमतीशीर खेळ, रस्सा खेच, मॅरेथॉन, बुद्धिबळ, रांगोळी, चित्रकला, परिसर स्वच्छता, आनंद मेळावा, तांत्रिक प्रदर्शनी, ऊर्जा प्रोद्योगिकी परिसंवाद, महिला मंडळ कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धा घेण्यात आल्या. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. 

समारोपीय समारंभाचे सूत्र संचालन ज्ञानदीप कोकाटे यांनी तर अमरजित गोडबोले यांनी आभार प्रदर्शन केले. समारोपीय समारंभाला अधीक्षक अभियंते परमानंद रंगारी, डॉ.अनिल काठोये, जितेंद्र टेंभरे, संदीप देवगडे, रविद्र झलके तसेच सर्व विभाग प्रमुख, अभियंते-तंत्रज्ञ-कर्मचारी-कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्धापन दिन समारंभाच्या यशस्वितेत आयोजन समिती पदाधिकारी-सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.