नागपूर/प्रतिनिधी:
परंपरागत पद्धतीच्या कामांना आधुनिकतेची जोड देऊन कृत्रिम बुद्धिमत्ते (Artificial Intelligence) द्वारे कामे अधिक सोपे,स्वयंचलित, वेगवान, अचूक आणि कमी खर्चात करण्यात येत आहेत. स्मार्ट फोन, संगणकाच्या माध्यमातून हि किमया साधली असून या संकल्पनेवर प्रकाश टाकण्यासाठी महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातर्फे उच्चविद्याविभूषित आकाश पाटील यांचे “संधींचे जग” या विषयावर दुहेरी संवादात्मक कार्यक्रमाचे ६६० मेगावाट सभागृह येथे आयोजन करण्यात आले.
मानवाला जिथे विशेष बुद्धीची गरज पडते अशी बरीच कामे आता संगणक प्रणाली करू लागल्या आहेत. कृत्रिम अथवा यांत्रिक बुद्धिमत्ताचा आपल्या जीवनावर थोड्याफार प्रमाणात प्रभाव जरूर पडणार आहे. अगदी उपजीविकेवरसुद्धा. अंक स्वरुपात रूपांतरित सर्वव्यापी इंटरनेटमुळे उपकरणांमध्ये बसवलेल्या सेन्सर्समुळे खूप डेटा उपलब्ध व्हायला लागला आहे. संगणकाला समजेल अशी भाषा, नियोजन, एकत्रीकरण, गणितीय संकल्पना, शक्याशक्यता, आकडेवारी, गणितीय ठोकताळे,प्रश्न सोडविण्याच्या क्षमतेत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होताना दिसून येते.
प्रमुख मार्गदर्शक आकाश पाटील यांनी सांगितले कि कृत्रिम बुद्धिमत्तेचे दोन प्रवाह आहेत यामध्ये यंत्र शिक्षण, सांख्यिकी चिन्ह आधारित तर्काधारित रूढ प्रवाह तर संगणकीय निष्णात प्रणालीद्वारे कार्यकारणभाव वापरून निष्कर्ष काढणे व माहितीचे विश्लेषण करणे इत्यादी. त्यांनी उपस्थितांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली त्यात डीप लर्निंग, सहाय्यकारी कृत्रिम बुद्धीमत्ता आणि यंत्र मानवीय कामांचे स्वरूप यांचा समावेश होता.
राजेश पाटील म्हणाले कि वीज उत्पादनाच्या प्रक्रियेत काम करणाऱ्या अभियंत्यांसाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर भरपूर संधी आहेत. केवळ एका अभियांत्रिकी शाखेचा विचार न करता आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा क्षेत्रात भरपूर संधी आहेत. दैनंदिन कामाला आधुनिकतेची जोड देऊन महानिर्मितीच्या शाश्वत विकासात आपल्याला कश्याप्रकारे अधिक योगदान देता येईल याचा प्रत्येकाने विचार करावा असे त्यांनी आवाहन केले. याप्रसंगी दिलीप धकाते यांनी कृत्रिम बुद्धेमत्तेवर आधारित अनेक उदाहरणांची उत्तम उकल केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्य अभियंता राजेश पाटील यांनी भूषविले तर मंचावर मुख्य अभियंते राजकुमार तासकर, दिलीप धकाते प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी उप मुख्य अभियंते सुनील सोनपेठकर, महाव्यवस्थापक(वित्त व लेखा) तृप्ती मुधोळकर, अधीक्षक अभियंते विलास मोटघरे, अशोक भगत, कन्हैयालाल माटे, जगदीश पवार, विराज चौधरी, शिरीष वाठ, सचिन देगवेकर तसेच विभाग प्रमुख, अभियंते, तंत्रज्ञ कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रांजली कुबडे यांनी तर प्रमुख वक्त्यांचा परिचय श्वेता रामटेके आणि आभार प्रदर्शन अजय बगाडे यांनी केले.
आकाश पाटील अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर असून त्याने पदव्युत्तर शिक्षण फ्रांसमध्ये पूर्ण केले आहे व सध्या तो आचार्य पदवी फ्रांस येथून करीत आहे. कमी वयात विपरीत परिस्थितीत आकाश पाटील यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली शैक्षणिक चुणूक दाखवून दिली आहे. विदर्भाच्या अकोला सारख्या शहरातून नासा(अमेरिका), फ्रांस पर्यंतचा खडतर प्रवास निश्चितच स्पृहणीय आहे.