जगभरातील अनेक देशांनी सध्या कोरोना व्हायरसचा चांगलाच धसका घेतला आहे.हाच धसका आता महावितरण कंपनीने देखील घेतला आहे ,महावितरण कार्यालयाने कोरोनावर खबरदारी घेत राज्यातील कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी पुढील कालावधीकरिता बंद केली आहे.
५ मार्च नंतर राज्यातील सर्व महावितरण व संलग्नित कार्यालयातील बायोमेट्रिक मशीन बंद करण्याचे आदेशाचे परिपत्रक मुंबई कार्यालयातून संपूर्ण कार्यालयात धडकले आहे.त्यामुळे चंद्रपुरातील बाबुपेठ येथील चंद्रपूर परिमंडळातील मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांना आता जुन्या पद्धतीप्रमाणे हजेरी पुस्तकात स्वाक्षरी करण्याच्या सूचना केल्या आहेत.
बायोमेट्रिक हजेरी पद्धतीमुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे कार्यलयात वेळेवर येणे सुरू झाले. या इलेक्ट्रॉनिक पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांची हजेरी संगणीकृत करणेही सोयीचे झाले आहे.
राज्यातील सर्वत्र कार्यालयांमध्ये, बायोमेट्रिक उपकरणावर कर्मचारी आपल्या बोटाचा ठसा उमटून हजर असल्याची नोंद करतात.मात्र आता कोरोना व्हायरसचा धसका महावितरणने घेतला असून मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना आता जुन्या पद्धतीप्रमाणे हजेरी पुस्तकात स्वाक्षरी करण्याच्या सूचना केल्या आहेत.