Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट १९, २०१९

धक्कादायक:चंद्रपुरात 108 रुग्णवाहिकेतून "दवा"नाही तर "दारू" तस्करी

ललित लांजेवार/नागपूर:

आरोग्यदृष्ट्या संकटात सापडलेल्या रुग्णाला तातडीने रुग्णालयात हलवण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्रात सुरू केलेल्या 108 या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून अवैध दारु तस्करी होत असल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात उजेडात आली आहे.

रुग्णांना तत्काळ सोईच्या ठिकाणी भरती करता यावे, यासाठी शासनातर्फे सुरु केलेले रुग्णवाहिकेतून दारुचा पुरवठा होत असल्याची खळबळजनक बाब शनिवारी मध्यरात्री रामनगर पोलिसांनी बायपास रोडवर केलेल्या कारवाईत उघड झाली. शहरातील रामनगर पोलिसांनी बाबुपेठ भागातून 108 रुग्णवाहिकेतून सहा लाख रुपयांची दारू जप्त केली आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

या कारवाईत यवतमाळ येथील रहिवासी असलेल्या राहुल वानखेडे याला अटक करण्यात आली असून वाहनासह १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चंद्रपूर जिल्ह्यात गेली चार वर्षे दारूबंदी लागू करण्यात आली आहे. या दारूबंदीनंतर जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची दारू अवैधरित्या पोहचत असून या प्रकरणात आजवर हजारो आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. 

या प्रकरणातील 2 आरोपी सध्या फरार असून या वाहनांचे केंद्रीकृत संचालन होत असताना रुग्ण वाहनात नसताना हे वाहन चंद्रपुरात पोचले कसे? असा सवाल उपस्थित झाला आहे. चंद्रपुर-गडचिरोली-वर्धा हे 3 लगतचे जिल्हे दारुबंदी असलेले जिल्हे आहेत.

 सध्या या जिल्ह्यात यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यांमधून दारू तस्करीचे प्रमाण वाढले आहे. मात्र, जनसामान्यांना विश्वासाची असणारी 108 रुग्णवाहिकासेवा दारू तस्करीमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडणे, सेवेवर दूरगामी परिणाम करणारी ठरणार आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर व रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हाके यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक दरेकर, एएसआय माऊलीकर, हवालदार गजानन डोईफोडे, रजनीकांत पुठ्ठावार, माजीद पठाण, रुपेश पराते, राकेश निमगडे, शंकर यांच्यासह रामनगर पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी केली.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.