राष्ट्रीय महामार्गावर उन्हामुळे प्रवाशांची होते लाही लाही
सावली करिता मोठे झाडच नाही
विनोद चौधरी
प्रतिनिधी ब्रम्हपुरी :
नागपूर ब्रम्हपुरी गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावरील ब्रम्हपुरी ते आरमोरी या मार्गात एकही झाड नसल्याने ये जा करणाऱ्या प्रवाशांना उन्हात सावलीकरिता थांबा मिळत नसल्याने प्रवाशांची या रस्त्यावरून वाहतूक करताना लाही लाही होत आहे. तर नागभिड ब्रम्हपुरी या मार्गावर जंगल परिसर लागून असल्याने प्रवासी उन्हाचा तडाका बसल्यास रस्त्यालगत असलेल्या जंगलातील झाडांचा आसरा घेतात.
ब्रम्हपुरी ते आरमोरी या राष्ट्रीय मार्गाचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे . या रस्त्याचे काम सुरू असतांना या मार्गावरील सावली देणाऱ्या मोठ्य-मोठ्या झाडांची कत्तल करण्यात आली. राष्ट्रीय मार्गाचे सिमेंटीकरण्याचे काम पूर्ण झालेले आहे . सध्या उन्हाळ्याचे दिवस असून ब्रम्हपुरी तालुक्याचे तापमान हे जास्त आहे. लग्नाची धामधूम सर्वत्र जोरात सुरू आहे. तसेच शैक्षणिक सत्र सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना विविध कामाकरिता ब्रम्हपुरीला यावे लागते. बाईकने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे . उन्हातानात प्रवास करतांना सावलीकरिता एकही मोठे झाड नसल्याने रहदारी करणाऱ्यांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. झाडाविना हा राष्ट्रीय मार्ग उजाड दिसतो.
वृक्षारोपणातील झाडे जगलीच नाही
ब्रम्हपुरी आरमोरी राष्ट्रीय मार्गाचे काम पूर्णत्वास आल्यानंतर काही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे वृक्षारोपणातील एकही झाड जिवंत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचे दिसून येते.
सुदाम ठाकरे यांनी लावली स्वखर्चातून झाडे
भविष्याचा वेध घेत रुई येथील गुरुदेव भक्त सुदाम ठाकरे यांनी या मार्गावरील रुई गावालगत स्वखर्चातून विविध प्रजातीचे झाडे लावली. झाडांच्या संगोपनाकरिता कुंपण करून नित्याने झाडे जगविण्याकरिता पाणी टाकून झाडे जगवित आहेत. सुदाम ठाकरे यांच्या कार्याबद्दल कौतुक केले जात आहे.
आधुनिक प्रवासी निवारे ठरतायत शोभेची वास्तु
ब्रम्हपुरी आरमोरी या राष्ट्रीय महामार्गावर प्रवासांच्या थांब्याकरिता प्रत्येक थांब्यावर आधुनिक प्रवासी निवाऱ्यांची व्यवस्था केलेली आहे. प्रवासी निवारे हे स्टीलचे व चारी बाजूने मोकळी असल्याने पावसाळ्यात पाऊस तर उन्हाळ्यात गरम येऊन तर थंडीच्या दिवसात थंडीने प्रवाशांना या ठिकाणी बसण्याकरिता सोयीचे नसल्यास ने आधुनिक प्रवासी निवारे शोभेची वास्तु ठरत आहेत
किन्ही येथील वटवृक्ष ठरतो प्रवाशांना आधार
या राष्ट्रीय मार्गावर किन्ही हे गाव मधोमध आहे. या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून असलेले वटवृक्ष हे प्रवाशांना सावलीकरिता आधार ठरत आहे. प्रवासी उन्हाचा तडाका बसल्यास सावलीकरिता या ठिकाणी थांबतात.