निधीअभावी तालुक्यात सामाजिक सभागृहाचे बांधकाम रखडले
विनोद चौधरी
प्रतिनिधि ब्रम्हपुरी : तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेले विविध ठिकाणी सामाजिक सभागृहाचे बांधकाम तीन वर्षापासून रखडले असून बांधकाम पूर्णत्वास न आल्यामुळे नागरिक मिळणाऱ्या सुविधेपासून वंचित आहेत.
ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे निधी अंतर्गत सन २०१९ -२० या वर्षात सार्वजनिक बांधकाम विभाग नागभिड तर्फे ब्रम्हपुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये सामाजिक सभागृहाचे बांधकाम मंजूर करण्यात आले. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते सामाजिक सभागृह बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजनानंतर या सभागृहांच्या बांधकामाला गतीही प्राप्त झाली, मात्र राज्यात सत्ता बदलानंतर या विकास कामांना खीळ बसली आहे. निधी अभावी सामाजिक सभागृहाचे बांधकाम मंजूर असलेल्या ठिकाणी रखडले आहे. नागरिकांना लग्न व विविध समारंभाकरिता उपयोगात येणारे सामाजिक सभागृह पूर्णत्वास न आल्याने वंचित राहावे लागत आहे. सामाजिक सभागृहाचे बांधकाम रखडल्याने परिणामी बांधकामाची दुरावस्था होत आहे. अनेक गावात मंजूर असलेला विविध विकास कामांचा निधी मिळाला नसल्याने विकास कामे ठप्प पडली आहे.
तालुक्यातील निलज, गांगलवाडी चौगान, जुगनाळा, मालडोंगरी, मुडझा, भुज, हळदा, या ठिकाणी सामाजिक सभागृहाचे बांधकाम मंजूर असून बांधकाम अर्धवट करण्यात आलेले आहे. बांधकामाचा निधी रखडल्याने व झालेल्या बांधकामात कंत्राटदारांचे पैसे गुंतले असल्याने काम करण्यास ठेकेदारांची उदासीनता दिसून येत आहे. तीन वर्षाचा कालावधी लोटूनही सामाजिक सभागृहाचे बांधकाम अद्याप पूर्णत्वास आलेले नाही. बांधकाम पूर्ण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.