जागतिक रक्तदाता दिनानिमित्त राहुल साळवे यांचा पुढाकार
मुंबई : राहुल सिद्धार्थ साळवे. महाराष्ट्राच्या रक्तदान चळवळीतील हे अग्रेसर असलेले नाव आहे. गेली १२ वर्ष Helping Hands For Blood च्या माध्यमातून, राहुल यांनी हजारो अगणित लोकांचे प्राण वाचवले आहे. रक्त आणि रक्तदान या सगळ्यात होणाऱ्या काळाबाजारा विरोधात आवाज उठवत लोकांच्या हक्कांसाठी झटणारा हा तरुण सामाजिक कार्यकर्ता, त्याच्या काम करण्याच्या शैलीने लोकांसाठी हक्काचा ‘रक्ताचा माणूस’ झाला आहे.
कोविडच्या काळात राहुल साळवे यांनी केलेले काम कमालीचे होते. याचसोबत ब्रेस्ट कॅन्सर असो – थायलेसिमिया असो की सरकारी परिचारिका असो. यांच्यासाठी रक्ताच्या अनुषंगाने राहुल यांनी केलेल्या कामाची माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील दाखल घेतली आहे. महाराष्ट्रात पहिले मोफत खाजगी ब्लड ट्रांसफ्युजन पुण्यात सुरू करणारा पहिला माणूस राहुल साळवे आहे.
असं म्हंटले जाते की, रक्ताची कोणतीही गोष्ट असो. ती एकदा राहुल कडे गेली की, ती मार्गी लागणारच. आणि अशी अनेक उदाहरण महाराष्ट्रात आहेत. जे स्वतः त्यांचा अनुभव सांगतात. केवळ महाराष्ट्राच नाही तर राज्या बाहेरही आपल्या कामाने लोकांना जीवनदान देणारा राहुल म्हणजे माणूसपणाच्या पुस्तकातला एक वेगळा धडा आहे. तसाच एक धडा राहुल यांनी, यंदाच्या जागतिक रक्तदाता दिना निमित्त सेवेस आणला आहे.
राहुल यांच्या सोबत बोलताना त्यांनी सांगितले की, “ज्या शेतकऱ्या मुळे आपल्या ताटात भाकर येते. त्या शेतकऱ्या साठी मी काय करू शकतो? हा विचार माझ्या डोक्यात फिरत होता. आणि एका बाजूला शेतकरी दुष्काळ – कर्जबाजारी याने आत्महत्या करत होता. आणि यातूनच ठरले की, आपल्याला भाकर देणारा शेतकरी निराशेने आत्महत्या करत असेल तर, त्याच्या नंतर त्याच्या कुटुंबासाठी मी काय करू शकतो?” आणि या काय चे उत्तर राहुल यांना सापडले. आणि त्यांनी ठरवले की, आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना भविष्यात कधीही त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी रक्ताची गरज लागल्यास, ती राहुल साळवे यांच्या Helping Hands For Blood च्या माध्यमातून मोफत पुरवली जाईल.
राहुल साळवे म्हणतात की, “जो शेतकरी राब राब राबून आपल्याला भाकरी देतो. त्याच्या नंतर त्याच्या कुटुंबीयांना मी जे देऊ शकतो ते देईन. तर मी रक्त देईन.” राहुल साळवे यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्यातल्या वेगळ्या माणसाची आणि सामाजिक कार्यकर्त्याची ओळख करून देणारा आहे.
राहुल साळवे यांच्या कार्याला, त्यांच्या माणूसपणाला सलाम.