Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मे १३, २०१९

पिण्याच्या पाण्याचा अत्यल्प साठा

आवश्यक तेवढ्या पाण्याचाच वापर करा!
महापौरांचे नागपूरकरांना आवाहन :  पेंच आणि कन्हान प्रकल्पाचा केला दौरा


नागपूर,ता. १३ : नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पेंच प्रकल्प आणि कन्हान नदी प्रकल्पात अत्यल्प साठा असून केवळ महिनाभर पुरेल इतके पाणी आहे. नागपूर शहराला दररोज पाणी पुरवठा होत असला तरी त्या पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करावा. पाण्याचा थेंबही वाया जाऊ नये, ही काळजी नागपूरकरांनी घ्यावी, असे कळकळीचे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले आहे.

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात दुष्काळ असून नागपूर जिल्ह्यावरही दुष्काळाची छाया आहे. शहराला दररोज पाणी पुरवठा होत असला तरी केवळ १० जूनपर्यंत पुरेल इतकेच पाणी पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पांमध्ये शिल्लक आहे. त्याची तीव्रता जाणून घेण्यासाठी आणि भविष्यातील पाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने काय करता येईल, याची माहिती जाणून घेण्यासाठी महापौर नंदा जिचकार यांनी नवेगाव खैरी येथील पेंच प्रकल्प आणि कामठीनजिकच्या कन्हान नदी प्रकल्पाला भेट दिली. या दोन्ही प्रकल्पातील पाणीसाठ्याचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर त्यांनी नागपूरकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले.

यावेळी त्यांच्यासोबत उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, नगरसेवक भगवान मेंढे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, मनोज गणवीर, उपअभियंता राजेश दुफारे, ओसीडब्ल्यूचे एच.आर. व्यवस्थापक,के.एम.पी.सिंग, श्री. संजय रॉय, व्यवस्थापक (देखभाल व दुरुस्ती) श्री. कालरा, प्रवीण सरण उपस्थित होते.

सर्वप्रथम महापौर नंदा जिचकार व सर्व पदाधिकाऱ्यांनी नवेगाव खैरी येथील प्रकल्पाला भेट दिली.तेथील पाणी पातळीची पाहणी केल्यानंतर तोतलाडोह प्रकल्पाला भेट दिली. यानंतर कामठीनजिक कन्हान नदीवर असलेल्या कन्हान पाणी पुरवठा केंद्राला भेट दिली. या दोन्ही ठिकाणी पाण्याची पातळी अत्यंत खालावली असल्याचे दौऱ्यात निदर्शनास आले. हे दोन्ही प्रकल्प मिळून केवळ ४४.४३९ दलघमी पाणी साठा शिल्लक आहे. त्यापैकी प्रति दिन १.३० दलघमी पाण्याचा वापर सुरू आहे. अर्थात उपलब्ध साठा केवळ १० जून पर्यंत पुरण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तोपर्यंत पाऊस नाही आला तर परिस्थिती अत्यंत गंभीर होणार असल्याची बाबही अधिकाऱ्यांनी महापौरांच्या लक्षात आणून दिली. जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी पाण्याच्या या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन यावर उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलावीत, असे निर्देश दिले. भविष्यात अशी परिस्थिती उद्‌भवू नये यासाठी आतापासूनच काही ठोस निर्णय घेण्याची विनंती महापौरांना केली. यासाठी काही नियोजनही सभापती पिंटू झलके यांनी सांगितले. त्यांनी सांगितलेल्या नियोजनानुसार प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले.




तातडीच्या बैठकीत महापौरांचे निर्देश

पाणीसाठ्याचे गांभीर्य लक्षात घेताच महापौर नंदा जिचकार यांनी दौरा आटोपल्यानंतर महापौर कक्षात तातडीची बैठक घेतली. सदर बैठकीला उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजीत बांगर, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी,कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, नगरसेवक भगवान मेंढे यांच्यासह ओसीडब्ल्यूचे अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत पाणी पुरवठ्याच्या नियोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली. १० जूनपर्यंत पुरेल इतका साठा असला तरी तो ३० जूनपर्यंत पुरेल असे नियोजन करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी दिले. त्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात यावी. पाण्याच्या चोरीवर निर्बंध घालण्यात यावा आणि नगरसेवकांच्या माध्यमातून पाणी बचतीसंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. भविष्यात पाण्याची टंचाई भासू नये यासंदर्भातही चर्चा करण्यात आली व ठोस निर्णय घेण्यात आले. त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.