चंद्रपूर:
पाण्याचा काटकसरीने विशेषतः कमीत कमी वापर केल्याबद्दल चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राला नुकतेच राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मिशन एनर्जी फाउंडेशन द्वारे "वॉटर ऑप्टिमायझेशन २०२२" पुरस्काराचे आयोजन ८ व ९ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे करण्यात आले, यात हा पुरस्कार देण्यात आला.
२९२० मेगावाट स्थापित क्षमता असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राने मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी वापराचे अनेक अडथळे, आव्हानांवर मात करीत सूक्ष्म नियोजन केले. नैसर्गिक संसाधनांचा जपून वापर करण्याबाबत जागृती निर्माण करून हे यश संपादन केले.
वीज उत्पादनाच्या प्रक्रियेत विविध ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. पाण्याचा पुनर्वापर करणे, शुद्ध पाण्याचा कमीत कमी वापर करणे, पाण्याचा शून्य निसरा ठेवणे इत्यादीबाबत प्रत्यक्ष नियोजनात्मक उत्तम काम चंद्रपूर वीज केंद्राने केले. सदर पुरस्कारासाठी विशिष्ट कच्च्या पाणी वापराबाबत सादरीकरण करण्यात आले. ५०० मेगावाट स्थापित क्षमतेच्या संचामध्ये कमीत कमी पाणी वापर केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
महानिर्मितीचे कार्यकारी संचालक पंकज सपाटे, उप मुख्य अभियंता मदन अहिरकर, विजया बोरकर, राजेश राजगडकर, अनिल पुनसे, अधीक्षक अभियंता पुरुषोत्तम उपासे,सुहास जाधव, फनिंद्र नाखले, प्रभारी कार्यकारी रसायन शास्त्रज्ञ रमेश भेंडेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी विशिष्ट पाणी वापर, पर्यावरण पूरक वीज निर्मिती आणि संचाची उपलब्धता याबाबत "त्री सूत्री" दिली आहे, त्यानुसार कार्यकारी संचालक पंकज सपाटे यांनी ठोस नियोजन करून कमीत कमी पाणी वापराबाबत हा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. त्यांनी महानिर्मिती व्यवस्थापनाचे विशेष आभार मानले तसेच कमीत कमी पाणी वापराच्या प्रक्रियेतील संबंधित सर्व अधिकारी, अभियंता, केमिस्ट, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.