श्री संजय भोसकर यांचा सत्कार करतांना प्रादेशिक संचालक श्री सुहास रंगारी, सोबत मुख्य अभियंता श्री दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता श्री हरीश गजबे, कार्यकारी अभियंता श्री हेमराज ढोके
नागपूर:
क्रिकेट, सिटीग व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, कबड्डी यासारख्या विविध क्रीडा प्रकारांत शेकडो राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू घडविणा-या आणि सोबतच तीन वेळा पॅरालिम्पिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या श्री संजय भोसकर यांना महाराष्ट्र शासनाचा वर्ष 2019-20 चा दिव्यांग उत्कृष्ट राज्य क्रीडा पुरस्कार नुकताच जाहीर झाला.
श्री संजय रामराव भोसकर यांनी आजवर 400 राज्यस्तरीय, 210 राष्ट्रीयस्तर तर 11 आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू घडवलेले आहे. तीन वेळा पॅरालिम्पिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व त्यांनी केले असून त्यांना 2006 साली नागपूर जिल्हा क्रीडा पुरस्कार, 2013 साली महाराष्ट्र शासनाचा एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार, 2019-20 करिताचा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार आणि क्रिडा क्षेत्रातील नेत्रदिपक कामगिरीसाठी त्यांना 2008 साली शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले आहे. श्री संजय भोसकर हे क्रीडा क्षेत्राशी मागिल 30 वर्षापासून जुळलेले असून ते स्वतः 10 वर्षे खेळले आहेत, आजवर त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील विविध खेळात 10 सुवर्ण, 22 रोप्य व 28 कांस्य पदके मिळविलेली आहे. तब्बल 20 वर्षापासून विविध क्रिडा प्रकारातील खेळाडू घडविण्याचे काम ते निरंतरपणे करीत आहेत.
महावितरणच्या नागपूर परिमंडलांतर्गत कॉग्रेसनगर विभागात उच्चस्तर लिपीक (मानव संसाधन) म्हणून कार्यरत असलेल्या श्री भोसकर यांच्या या निवडीबद्दल प्रादेशिक संचालक श्री सुहास रंगारी आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री दिलीप दोडके यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अधीक्षक अभियंता सर्वश्री हरिश गजबे, मंगेश वैद्य, कार्यकारी अभियंता श्री हेमराज ढोके, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री सचिन लहाने यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.