भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करत आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मला खात्री आहे, माझे नवनियुक्त सहकारी पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील. या सर्वच सहकाऱ्यांच्या सोबतीने 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत.
भाजपा नव्या भारताच्या उभारणीसाठी कटिबध्द आहे. पक्षाच्या बांधणीत कार्यकर्त्यांचे योगदान सर्वोच्च आहे. पक्षासाठी कार्यकर्ते सर्वस्व असून त्यांच्या अविश्रांत कष्टामुळे पक्षाने आज नवी उंची गाठली आहे. नवनियुक्त सर्व जिल्हाध्यक्षांनी सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचा आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे..
अखेर चंद्रपूर जिल्हा भाजपचे पदाधिकारी बदलले
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जोमाने लढण्याचा दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीने आपले जिल्हा पदाधिकारी बदलले आहेत यात प्रामुख्याने ग्रामीण आणि शहर जिल्हाध्यक्ष बदलण्यात आले असून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे यांनी घोषित केलेल्या यादीनुसार चंद्रपूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी हरीश शर्मा यांची तर महानगर अध्यक्षपदी राहुल पावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी या पदावर ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून देवराव भोंगडे तर महानगर अध्यक्षपदी मंगेश गुलवाडे कार्यरत होते. मध्यंतरी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसशी हात मिळवनी केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. इतकेच नव्हे तर महानगर भाजपमध्ये दोन गट असल्याचे पुढे आले. त्यामुळे जिल्हाध्यक्ष बदलण्यात यावेत, अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर राज्य पदाधिकारी मुरलीधर मोहोळ यांनी दौरा केला आणि नवीन जिल्हाध्यक्ष नियुक्ती संदर्भात अनेक पदाधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली होती. तेव्हापासून नवीन जिल्हाध्यक्ष नियुक्तीसाठी अनेक चेहऱ्यांची यादी आणि चर्चा सुरू झाली.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी ट्विट करून राज्यातील सर्व पदाधिकारी बदलण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार बल्लारपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष हरिश शर्मा यांची भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी तर चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर राहुल पावडे यांचे भाजपच्या महानगर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही चेहरे विद्यमान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निकटवर्तीय आहेत. दुसरीकडे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या गटातील विश्वासू आमदार बंटी भांगडीया जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय होऊन आपला गट मजबूत करू पाहत आहे. ब्रह्मपुरी, राजुरा, आणि वरोरा मतदारसंघांमध्ये भाजपचा उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने मागील काही दिवसांपासून फडणवीस सक्रिय झाले आहेत. याशिवाय लोकसभा निवडणूक भाजपला जिंकणे हा प्रतिष्ठेचा मुद्दा देखील बनलेला आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरून लक्ष ठेवण्यात येत आहे.