नागपूर : स्पेशलायझेशनच्या युगात नवनवीन संशोधने आणि सुधारणांना नेहमीच वाव असतो. वीज उत्पादनाच्या खडतर आणि अतिशय गुंतागुंतीच्या तांत्रिक स्वरूपाच्या कामात दैनंदिन समस्यांवर मात करण्यासाठी महानिर्मितीच्या २१९० मेगावाट क्षमतेच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्र आणि १३४० मेगावाट क्षमतेच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राने नुकतेच मध्य भारतातील सुप्रसिद्ध अश्या विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान (व्ही.एन.आय.टी.) नागपूर येथे पदव्युत्तर आणि पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना “संशोधन सहाय्यक” म्हणून सहभागी करून घेण्याबद्दल आज सामंजस्य करारावर(एम.ओ.यु.) स्वाक्षऱ्या केल्या.
सामंजस्य करारावर व्ही.एन.आय.टी.तर्फे संचालक प्रमोद पडोळे, डीन संशोधन व सल्लागार माधुरी चौधरी, मेकॅनिकल विभाग प्रमुख ठोंबरे, इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख विजय बोरघाटे तर महानिर्मितीच्या कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे, खापरखेडा वीज केंद्र मुख्य अभियंता राजू घुगे, उप महाव्यवस्थापक(मासं) डॉ.प्रकाश प्रभावत, कार्यकारी अभियंता विजय अढाव, जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते, उप कार्यकारी अभियंता प्रवीण बुटे, धनंजय दाणी प्रामुख्याने उपस्थित होते.
औष्णिक वीज उत्पादनाच्या दैनंदिन कार्यात मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल, इंस्ट्रमेंटेशन, थर्मल इंजिनियरिंग, पॉवर इंजिनियरिंग, कम्प्युटर इंजिनियरिंग, सिव्हील इंजिनियरिंग सारख्या विविध अभियांत्रिकी संवर्गातील तांत्रिक कामांचा परस्पर संबंध असल्याने हे काम अतिशय जिकीरीचे आणि गुंतागुंतीचे आणि स्पेशलायझेशन स्वरूपाचे असते. दैनंदिन कामकाजाची तांत्रिक पद्धत जरी निश्चित असली तरी अनेकदा समस्या निर्माण होतात किंवा त्यामध्ये कालानुरूप सुधारणांची गरज असते. अत्याधुनिक तंत्रज्ञानात तरुण पिढी अग्रेसर असल्याने अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्ण संधी आहे. यामध्ये, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्ष प्रतिमाह २५ हजार रुपये प्रशिक्षण भत्ता तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन महिने प्रतिमाह २० हजार रुपये प्रशिक्षण भत्ता देण्यात येणार आहे.
महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी महानिर्मितीच्या औष्णिक, वायू, सौर, जल विद्युत केंद्र तसेच मुख्यालय मुंबईसाठी तरुण अभियंत्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढीस लागावी व सोबत अर्थार्जन व्हावे म्हणून “संशोधन सहाय्यक” या अभिनव योजनेला मान्यता दिली आहे. महानिर्मितीचे संचालक चंद्रकांत थोटवे, पुरुषोत्तम जाधव, बाळासाहेब थिटे, डॉ. मानवेंद्र रामटेके, संजय मारुडकर, कार्यकारी संचालक भीमाशंकर मंता यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातील नागपूर, पुणे, औरंगाबाद, मुंबई, रायगड, चंद्रपूर, कराड, अमरावती आणि जळगाव अश्या ९ अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुमारे ६० विद्यार्थ्यांना “संशोधन सहाय्यक” म्हणून सहभागी करून ही योजना राबवली जाणार आहे. प्रशिक्षण कालावधी यशस्वी पूर्ण केल्यानंतर ह्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
संशोधन सहाय्यकाला वीज उत्पादनाच्या क्षेत्रातील उत्तम तांत्रिक कौशल्य, कमीत कमी संयंत्र वापर, प्रभावी मनुष्यबळ वापर, जल, वाफ, इंधन, वीज वापरात बचत, गुणवत्तापूर्ण अंकेक्षण, विश्लेषण, समस्येचे मूळ कारण शोधणे, जुन्या संचाचे नूतनीकरण व आधुनुकीकरण, राख आणि कोळसा दर्जा व्यवस्थापन, विश्लेषण, वीज उत्पादनात कार्यक्षमता वाढ, खर्चात काटकसर, पर्यावरण रक्षण, वातावरण बदल, अद्ययावत तंत्रज्ञान, अपारंपारिक उर्जा नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन, विकासात्मक अभ्यास आणि शिफारशी इत्यादींचा प्रकल्प अहवाल सादर करावा लागणार आहे.