स्थानिक प्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे पाथरी विकासापासून वंचित
सुजित भसारकर, पाथरी:--
सावली तालुक्यातील पाथरी नगरी स्थानिक प्रतिनिधी यांच्या दुर्लक्षित पणामुळे आजही विकासापासून कोसो दूर आहे. पाथरी हे परिसरातील मध्यवर्ती ठिकाण असून पाथरी सभोवताल 30 ते 40 गावे आहेत. पाथरी हे परिसरातील मोठी बाजारपेठ असून आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी या गावांचा संपर्क रोज पाथरीशी येतो. या ठिकाणी परिसरातील आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा मध्यवर्ती बँक, जयकिसान ग्रामीण बँक आहे. शिक्षण सुविधेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद हायस्कुल, तथा संत गजाजन कनिष्ठ महाविद्यालय असून परिसरातील विध्यार्थी शिक्षण घेण्यासाठी पाथरी या ठिकाणी येतात. पाथरी हे ब्रिटिश कालीन नगरी असून या ठिकाणी इंग्रज कालीन पोलीस स्टेशन आहे. सिंचनाच्या सोयीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील मोठे जलाशय असलेले आसोला मेंढा तलाव असून पावसाळयाच्या दिवसात तलाव तुडुंब भरत असून निघत असलेला धबधबा व निसर्ग रम्य वातावरणात व्यस्त असलेल्या जीवनात थोडी शांतता मिळून मन प्रसन्न व्हावे या करिता मौज घेण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटकांची गर्दी या ठिकाणी असतें. पाथरी परिसर जवळपास 40 किलोमीटर अंतराने वेढलेला असून सामान्य जनतेच्या शासकीय कामासाठी जनतेला नाहक त्रास होऊ नये या करिता परिसरातील जनतेच्या हितासाठी सावली- सिंदेवाही तालुक्याचे विभाजन करून नवीन तालुका निर्माण करण्यासाठी पाथरी तालुका निर्माण संघर्ष कृती समिती अविरत संघर्ष करीत असून ही मागणी कित्तेकदा शासन दरबारी मांडली आहे. परंतु या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष होत आहे. आरोग्याच्या सुविधेसाठी या ठिकाणी जिल्हा परिषद विभागाचे आरोग्य वर्धिनी केंद्र आहे. परिसरातील जनता आरोग्याच्या सुविधेसाठी मोठ्या प्रमाणात येतात. येथे विद्युत विभागाचे 33 के. व्ही उपकेंद्र आहे. परिसरात या उप केंद्रातून विद्युत पुरवठा केल्या जातो. विद्युत विभागाच्या समस्येसाठी परिसरातील जनतेला सिंदेवाही येथील महावितरण उप कार्यालयात जाऊन आपल्या समस्या सोडवाव्या लागतात. हे कार्यालय परिसरापासून खूप लांब असल्यामुळे परिसरातील जनतेला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे.
या सर्व बाबींचा विचार करून काही दिवसा आधी पाथरी येथील 33 के. व्ही उपकेंद्राच्या इमारतीत या परिसरातील अभियंत्याचे कार्यालय उघडण्यात आले.परंतु कार्यालय उघडल्यापासून अभियंत्याची खुर्ची खालीच बघावयाला मिळत आहे. अजून पर्यंत या कार्यालयात अभियंता यांचे प्रस्थान झाले नसून परिसरातील जनतेला समस्या सोडविण्यासाठी सिंदेवाही येथीलच कार्यालयात जाऊन सोडवाव्या लागत आहेत. त्यामुळे परिसरातील जनतेला आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रश्नाकडे स्थानिक राजकीय पक्षाचे पुढारी सुद्धा दुर्लक्ष करीत असून स्थानिक राजकीय मंडळी तथा पदाधिकारी यांना पाथरी परिसराचा विकास नको आहे का? असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे. कित्तेक वर्षांपासून पाथरी तथा परिसर हे राजकीय कुरघोळीमुळे विकासापासून कोसो दूर असून येथील जनतेमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे.