मुंबई :
वीज उत्पादन क्षेत्रात कुशल अभियंता म्हणून नावलौकिक असणारे अभय हरणे यांची नुकतेच महानिर्मितीच्या संचालक(प्रकल्प) पदी निवड झाली असून त्यांनी या पदाचा पदभार स्वीकारला आहे.
अभय हरणे यांनी विद्युत अभियांत्रिकी पदविका, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकी पदवी तर एम.बी.ए.(फायनान्स) चे शिक्षण पूर्ण केले आहे.
सन १९९३ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात "कनिष्ठ अभियंता" या पदी रुजू झाल्यानंतर मागील सुमारे तीन दशके त्यांनी परळी,चंद्रपूर(उप मुख्य अभियंता) भुसावळ-कोराडी-मुंबई येथे मुख्य अभियंता त्यानंतर नागपूर विभाग आणि मुख्यालय मुंबई येथे कार्यकारी संचालक तर नुकतेच त्यांच्याकडे संचालक(प्रकल्प) पदाचा अतिरिक्त प्रभार होता. वीज उत्पादन क्षेत्रातील विविध महत्वपूर्ण पदांवर काम करतांना आपल्या गुणवत्तापूर्ण कामांचा ठसा त्यांनी उमटवला आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने संचलन, नवीन संच स्थिरीकरण, देखभाल-दुरुस्ती, चाचणी उपकरण नियंत्रण, कार्यक्षमता वाढ, खनिकर्म, इंधन व्यवस्थापन, कोळसा हाताळणी विभाग, वीज नियामक आयोग विषयक निकष, बाबी आणि जागरूकता इत्यादींचा समावेश आहे. त्यांच्या कार्यकाळात कोराडी वीज केंद्राने १०० टक्के भारांक आणि वीज उत्पादनात सातत्यपूर्ण उच्चांक गाठला. गरेपालमा-२ कोळसा खाण पर्यावरण लोकसूनावणी यशस्वी करण्यात त्यांची मोलाची भूमिका होती. तांत्रिक निपुणता, व्यवस्थापन- प्रशासनिक कौशल्य, दांडगा जनसंपर्क आणि सांघिक कार्यसंस्कृती त्यांची गुणवैशिष्ट्ये आहेत.
नवनवीन कल्पना, सर्वोत्तम कार्य पद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पेपर प्रेझेंटेशन आणि मार्गदर्शनातून महानिर्मितीची प्रतिमा सुधारण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात.
औष्णिक संचाच्या नूतनीकरण आणि आधुनिकीकरणाच्या सर्वोत्तम पद्धतीसाठी जर्मनी येथे त्यांनी महानिर्मितीचे प्रतिनिधित्व केले. सन २०१३ मध्ये तत्कालीन महामहिम राज्यपाल महाराष्ट्र यांच्या हस्ते उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अभय हरणे यांनी रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीचे अध्यक्षपद भूषविले आहे. स्थानिक माध्यमाने "खानदेश रत्न" म्हणून त्यांचा बहुमान केला आहे.
महानिर्मिती कोल पाईप कन्व्हेयर प्रणाली प्रकल्प, सौर-पवन-उदंचन प्रकल्प, भुसावळ आणि प्रस्तावित कोराडी बदली संच प्रकल्प, उरण क्षमता वाढ, एफ.जी.डी.सारख्या महत्वपूर्ण कामांची जबाबदारी त्यांचेकडे राहणार आहे.
स्पर्धेच्या युगात आणि वीज उत्पादनाच्या खडतर परिस्थितीत नवनवीन स्रोत, विकासाचे-उत्पन्नाचे मार्ग शोधणे, हॅप्पी स्ट्रीट सारखे लोक सहभागात्मक उपक्रम राबविणे, मनुष्यबळामध्ये समाधानाचा- आनंदाचा स्तर उंचावत त्यांच्याकडून सहजरित्या काम करून घेण्याची अचूक हातोटी त्यांच्या अंगी आहे. गायन, वाचन, संगीत आणि पर्यटनाचा विलक्षण छंद असून नेतृत्वगुण, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडाक्षेत्राची उत्तम जाण असलेले दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणजे अभय हरणे.