Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मे १७, २०२१

कोव्हिडमधून बरे झाल्यानंतरही घ्या सुरक्षेची काळजी ‘कोव्हिड संवाद’मध्ये तज्ज्ञांचा सल्ला

 कोव्हिडमधून बरे झाल्यानंतरही घ्या सुरक्षेची काळजी

‘कोव्हिड संवाद’मध्ये तज्ज्ञांचा सल्ला

 

नागपूर, ता. १७ : कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये नागरिकांमध्ये खूप भीती आहे तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढत असतानाच रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी प्रत्येक आरोग्य कर्मचा-याची धडपड सुरू आहे. अशा स्थितीमध्ये प्रत्येक जण आता सुरक्षेबाबत सजग झालेला आहे. आता कोरोना पाठोपाठ इतर आजारांचा शिरकाव होत आहे. याला कोरोनामधून बरे झालेले रुग्ण जास्त प्रमाणात बळी पडत आहेत. त्यामुळे संकटाला थोपवून लावण्यासाठी अधिक सजग राहण्याची गरज आहे. कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णाने मास्क लावणे बंधनकारक आहे. घराबाहेर वा जिथे गर्दी होत असेल अशा ठिकाणी किमान काही महिने जाणे टाळणे आवश्यक आहे. एकूणच कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर प्रत्येक रुग्णाने सुरक्षेची सर्व काळजी घेणे अत्यावश्यक आहे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

  नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने व महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेने सुरू करण्यात आलेल्या ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात सोमवारी (ता.१७) व्हॅस्कूलर अँड इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीस्ट डॉ.अतुल रेवतकर आणि कन्सल्टंट रेडिओलॉजीस्ट डॉ.वर्षा सारडा यांचे 'कोव्हिड नंतरची गुंतागुंत फायब्रोसिस व थ्रोम्बोसिस निदान व उपचार' या विषयावर मार्गदर्शन केले व यावेळी नागरिकांमार्फत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देउन त्यांनी शंकांचे निराकरण केले.

  कोरोनामध्ये रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागल्यानंतर त्यामध्ये त्याच्यावर अनेक औषधांचा उपचार केला जातो. जीव वाचविण्यासाठी अनेक ‘हेवी डोज’ सुद्धा द्यावे लागतात. त्याचा प्रभाव प्रतिकारशक्तीवर पडतो. परिणामी रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याला कमजोरी जाणवते. अशा वेळी रुग्णाला फायब्रोसिस व थ्रोम्बोसिसचा धोका संभावतो. फायब्रोसिस म्हणजे फुफ्फुसामध्ये होणारे बदल व त्यातून पुढे संभावणारा धोका. ते टाळण्यासाठी त्याचे योग्य निदान होणे आवश्यक आहे. यासाठी रुग्णाचे एचआरसीटी स्कॅन करणे आवश्यक ठरते. कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये बहुतांशी लोक एचआरसीटी स्कॅन काढत आहेत. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते काढले जावे. एचआरसीटी स्कॅन मुळे रुग्णाच्या संसर्गाचे प्रमाण लक्षात येते. रुग्ण बरा झाल्यानंतर एचआरसीटी स्कॅन केल्यास त्याला होउ शकणारा संभाव्य धोका लक्षात येतो व तसे उपचार करता येतात. कोरोनामधून बरे झाल्यानंतर अनेक रुग्ण डॉक्टरांनी दिलेले औषध बंद करतात ही धोकादायक बाब आहे. कोणत्याही रुग्णाने स्वत:च्या मनाने औषधे बंद करू नये. बरे झाल्यानंतर सकस आहार, हलका व्यायाम सुरू ठेवावा, असा सल्ला डॉ.वर्षा सारडा यांनी यावेळी दिला.

  फायब्रोसिस प्रमाणेच थ्रोम्बोसिसला अनेक रुग्ण बळी पडत असल्याचे दिसून येत आहे.  थ्रोम्बोसिस  म्हणजे रक्तात गाठ झाल्याने उद्भवणारा धोका. कोरोनाचा व्हायरस फुफ्फुसावर आघात करतो तसाच तो रक्तवाहिन्यांमध्य सुद्धा आघात करतो. शरीरातील ज्या रक्तवाहिन्यांवर आघात झाला त्याचे परिणाम दिसून येतात. डोक्यातील रक्तवाहिनीमध्ये गाठ निर्माण झाल्यास अर्धांगवायूचा धोका असतो. छातीमध्ये झाल्यास हृदयविकार व असे वेगवेगळ्या अवयवांबाबत विविध धोके संभावतात. थ्रोम्बोसिसचे निदान होण्यासाठी सुद्धा एचआरसीटी स्कॅन महत्वाचे ठरते. रक्त वाहिन्यांमध्ये गाठ होणे हे कोव्हिडपूर्वी पण होतेच मात्र कोव्हिडमध्ये त्याची तीव्रता जास्त दिसून येते. त्यामुळे कोव्हिड नंतर किंवा कोव्हिडमध्ये कुठल्याही सौम्य लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधून सल्ला घ्यावा. कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे सुरू ठेवा. सोशल मीडियावरून मिळालेल्या माहितीद्वारे उपचार करू नका. आहार, व्यायाम याकडे नियमित लक्ष द्या, असा सल्ला डॉ.अतुल रेवतकर यांनी दिला.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.