आई...तुझी क्षणोक्षणी खूप आठवण येतेय. घरात असलो की तुझ्या गोष्टीत रमतोय आणि कामानिमित्त घराबाहेर पडलोय की, तुझ्या आठवणींचा ओघ सतत वाढतच जातोय. तू अशी, तू तशी...कितीदा तुला नव्या-नव्या रूपात आठवतोय. तरी ओढ कायमच, ही अतूट नात्याची वीण आणखी-आणखी घट्ट होतेय.'आ' म्हणजे 'आत्मा' आणि 'ई' म्हणजे 'ईश्वर'.तुझं अस्तित्व न संपणार आहे. मी तुझ्या संस्कारांचा, बोलण्याच्या शैलीचा खूपच 'दिवाना' झालोय आई...!तुझे शब्द जगावेगळे असतात. त्यात असणारा प्रवाह जणू काही खळखळनारे पाणीच वाटते. पहाटे रोज 5 वाजता तुझ्या कामाला सुरुवात होते. 'भविष्यात काही तरी प्रगती करायची असेल तर हलकाई ठेव'हा कानमंत्र नेहमी तू देत असते. आई... तुझ्या अनंत आठवणी हृदयात कोरल्या आहेत गं... तू नेहमी लहानपणापासून एक गोष्ट माझ्यावर बिंबवली आणि ती म्हणजे मुलांसाठी आई-वडीलच पृथ्वीवरील देव आहेत. तुझ्या गोष्टी, तू नेहमी बोलत असलेली वाक्ये रेकॉर्ड करून अनेकदा तशीच ऐकण्याची इच्छा होतं असते. तुझ्या शब्दांचा लैजा, कामाची तरतरी नेहमी स्फूर्ती देऊन जाते. तू सकाळपासून घरातील किती कामे करीत असते. ऐके दिवशी माझं आणि तुझं बिनसलं. तू म्हणाली, 'माझ्यासारखे पहाटेपासून काम करून दाखव'. मी आव्हान स्वीकारालं, एक दिवस मी सुद्धा तुझ्यासारखे रोज घरात करीत असलेली कामे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा समजले की, तू इतकी कामे कशी काय करतेय. घरातील स्वच्छता, दुधवाला आला की धावत जाणे आणि आणखी बरंच काही...आई तूझी सर नाही करू शकत, ही कबुली देण्याची इच्छा सतत माझ्या मनात घर करीत असते. मी एका दिवसातच कामे करून थकलोय मग तू रोज कशी काय पसारा आवरत असेल ? आई तू वेगळंच रसायन आहे. ती पण न थकता. कधी-कधी भाजी अशीच बनवली तशीच बनवली, अमुकच नाही, तमुकच नाही, अशी ओरड मी तुझ्यावर करायचो... पण तूझ्यापासून आणि घरापासून नौकरीसाठी बाहेर राहू लागलो तेव्हा कळले पंचतारांकित हॉटेलसुद्धा तूझ्या हातच्या जेवणाची चव पुरवू शकत नाहीत. आई तू म्हणजे अफाट शक्ती आणि ज्ञानाचा अथांग सागर आहे. तू माझी मैत्रीण आहे. तू माझ्या जीवनातील अमृतधागा आहे. आई तू अमृताहुन गोड आहेस.
तू आहे म्हणून मी आहे...कधी-कधी तुझी आठवण आल्यावर मन भरून येतेय. तुझ्यासोबत माझे खटके कितीतरी वेळा उडतात तरीपण जिव्हाळा वाढवते. तू नेहमी म्हणते, 'आई-वडिलांचे प्रेम प्रत्येक मुलावर सारखं असते. कुणावर ना कमी ना जास्त कधी-कधी रागात मी तुझ्यावर ओरडतो. राग शांत झाल्यावर मी प्रचंड अश्वस्थ होतोय.माझी घालमेल होते. मी तुला काय-काय बोललोय, हे जेव्हा आठवतोय तेव्हा माझं मन सुन्न होतेय. खूप संताप येतोय आणि पुन्हा तुझ्यासोबत मायेच्या प्रेमळ धाग्यात बांधला जातोय. तू मला बाजारात घेऊन जात असे. तेव्हा तू भाजीच्या दुकानात एक-एक रुपया वाचविण्यासाठी किती जिवाच्या आटापिटा करतीय, हे माझ्या लक्षात येत असे. हे सारं काही फक्त माझ्यासाठी. यातून मला तू काटकसर करण्याचा मंत्र देते. आणि आजचा पै-पै जमविलेला पैसा माझ्या कामात यावा, यासाठीच. तू माझ्याकडे, बहिणीकडे, वडिलांकडे, घराकडे, नातवंडाकडे समान लक्ष देतंय. ही किमया कशी काय साधतेय तू... देव जाणे. तुझे एखादे काम न ऐकल्यास आरडाओरड न करता तू स्वतः ते काम पूर्ण करतेय, तुझ्या कामाची शैली पण वेगळीच. वेळेला तू महत्व देतेय. तू गंभीरही तेवढीच आणि खंबीरही. तुझ्यात धैर्य, संयम, सामर्थ्य आहे. तू मला कितीतरी नवीन-नवीन गोष्टी शिकवते. 'माणसाचं जीवन प्रयोगशील असायला पाहिजे', यावर तुझा खूप भर असतोय.एकदा केलेली चूक पुन्हा होणार नाही, याची पण तू शिकवण देतेय. सोबतच काटकसर, स्वच्छता याकडेही तू लक्ष देते. उन्हाळ्यात घराच्या परिसरात पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी तुझे फेब्रुवारीपासून नियोजन सुरु होऊन जाते. तू प्रपंच, निसर्ग, नातवंड, अर्थकारण, समाजकारण अशा विविध विषयांमध्ये शिरून जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी तू सतत धडपड करीत असते. मी आजही गोंधळलो असलो तरी तुला सांगताच प्रश्नाचा झालेला गुंता तू चुटकीसरशी मिटविते. तू शिकविलेल्या अनेक गोष्टी ना 'गुगल',ना शाळेत शिकता येतात. तुला उदंड आयुष्य लाभो... हीच ईश्वरवरचरणी प्रार्थना. तुझ्यासाठी दोन ओळी, "तुझ्या कष्टाचे चीज होऊ दे अन तू दिलेल्या संस्कारातून उद्याचे आयुष्य समृद्ध होऊ दे...".
- मंगेश दाढे