Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जानेवारी १७, २०२१

जीवनव्रती डॉ. यशवंत मनोहर परिवर्तनाचा नांद.....




पुरस्कारानं माणूस मोठा होत नाही.कर्तृत्वानं माणूसं मोठी होतात. हे सत्य आहे. डॉ. यशवंत मनोहर त्यापैकी एक. भरपूर साहित्य लेखन केलं. साहित्य क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठेच . हे कोणी नाकारू शकत नाही. जीवनव्रती पुरस्कारासाठी ते योग्य . त्यांची निवड अचूक झाली. त्याबाबत शंका नाही. त्यांच्या निवडीचा मोह विदर्भ साहित्य संघाला आवरता आलं नाही. यात मनोहरांची साहित्यिक उंची स्पष्ट दिसते. हे कोणी नाकारू शकत नाही. एक काळ होता. शिक्षणावर व साहित्यावर विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती.या मक्तेदारीत त्या वर्गातील महिलांनाही वाटा नव्हता. त्यांना खड्या सारखं बाजूला ठेवल्या गेलं होतं. काळ बदलला.

परिवर्तनाचं वादळ उठलं. त्यात अनेक दगडधोंडे घसरले. काही पडले. काही जनिनदोस्त झाले. त्या जागी नव्या उमेदीची नवी माणसं आली. नवतरुण आले. त्या जागा त्यांनी बळकावल्या. अनेक वर्ष हा संघर्ष चालला. शाळा-कॉलेजात हे संघर्ष चालत. हळूहळू संघर्ष मावळला. त्यांनी साहित्य क्षेत्र सोडलं. ते जास्त पैसा, प्रतिष्ठा असलेल्या टेक्नालॉजीकडे वळले. त्यांनी बदलत्या काळाचा अंदाज घेतला. त्या संघर्षातून पुढे आलेली साहित्यिकांची पहिली पिढी. त्या पिढीतील यशवंत मनोहर. त्यांची श्रध्दास्थानं तथागत, फुले ,आंबेडकर आहेत. त्यांनी दैववाद नाकारला. अंधश्रध्दा नाकारली. खोटी, कल्पक, धर्माची प्रतिकं नाकारली. ही प्रतिकं त्यांनी तारुण्यातच नाकारली. त्यांच्या साहित्यात ती प्रकर्षाने दिसतात. ते त्यांनी विविध मंचावर बोलून दाखविली. मात्र विदर्भ साहित्य संघाचा मंच त्यांना व्यक्त होण्यास मिळाला नाही. तसे हे एकटे मनोहर नाहीत.असे अनेक मनोहर निघतील. काहींनी नमतं घेतलं. जुळवून घेतलं. त्यापैकी काही जण विसा संघात दिसतात. ही संख्या बोटावर मोजण्या पुरती. अधिक स्पष्ट बोलावयाचे झाल्यास ही संख्या तोंडी लावण्या पुरती. काही मठाधीश झाले. त्यांच्या मर्जीशिवाय विसा संघाचे पान हालत नाही. किती दिवस त्यांना वाहायचं. नव्या रक्ताना संधीच नाही.अलिकडे ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. त्यापैकी राळेगाव सिध्दी, हिवराबाजार व पाटोळा ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या. आतापर्यंत इथं अण्णा हजारे, पोपटराव पवार, पेरे यांचा शब्द चालत आला. नवीन पिढीनं नाकारलं. तिथं निवडणुका पार पडल्या. यापासून बोध घ्यावा. पदाचा मोह सोडण्याची वेळ आली आहे.काळ बदलत आहे. नागडा माणूस कपडं घालावयास लागला.जलदेवता माणून समुद्र प्रवास टाळला जात होता.आता असा माणूस शोधूनही सापडत नाही. सतीप्रथा बंद केली. शिवाशिव सोडली.विधवा विवाह सुरू झाली. तर्काला न पटणाऱ्या.विद्नाच्या कसोटीला न उतरणाऱ्या गोष्ठी त्यागने यात मोठपण असतं.अगोदर गावात सेंदूर येत होतं.आता सेंदराची झाडं आली. दिवानखान्यातील साहित्य खेड्यात गेलं.झोपडीत गेलं. व्याकरण गेलं. बोली भाषा आली.नायकांचा पेहराव बदलला. धोतर,बंडी गेली.पायजामा,कुडतं आलं. ती जागा आता सुटा,बुटानं घेतली. तरी प्रतिकं तिचं तर्काला न पटणारी.

शताब्दी वाटचालीत वाद

विदर्भ साहित्य संघाची स्थापना 1923 मध्ये झाली. यास 98 वर्ष झाले. शताब्दीकडे वाटचाल. त्या तोंडावर हा वाद शोभणारा नाही. साहित्य हे माणसं तोडणारं नाही. जोडणारं असावं असं आपण म्हणतो. तसेच साहित्यिकांनी वागावं. जुनी दैवतं अनेकांनी सोडली. काहीनी बदलली. समाजवाद्यांनी जाानवं तो़डो आंदोलनं केली. जानवं काही अजरामर करीत नाही. जानवं घालणाऱ्याच्या हाताने पुरस्कार घेणार नाही.असं अद्याप कोणी बोलल्यांचे एेकिवात नाही. कोण काय घालतो. हे कळत नाही. शोषणाची प्रतिकं अनेक आहेत. काळासोबत अनेकांनी ती नाकारली. नवी दैवतं अंगिकारली. त्यांना विरोध नाही. शोषण व्यवस्थेचे समर्थन योग्य नाहीच. त्या भावनेतून मनोहर यांनी भूमिका घेतली. तर तिचे समर्थन केलं पाहिजे. जाहीर केलेला पुरस्कार दिला जावा. त्यात विसासंघातील माणसाचं मोठेपण आहे. पुरस्कार न देता ते झाकून ठेवणं हा खूजेपणा होय. तेरा जानेवारीला त्यांचा पुरस्काराबाबत सत्कार झाला.आशुतोष शेवाळकर यांनी सत्कार केला. आपल्या घरी बोलावून सत्कार केला. तो त्यांनी स्विकारला. याचा अर्थ मनोहरांचा पुरस्काराला विरोध नाही. पुरस्कार देण्याच्या पध्दतीला विरोध आहे. तिथं ठेवल्या जाणाऱ्या प्रतिकांना विरोध केला. त्यांनी पुरस्कार देणाऱ्या व्यक्तीचा धर्म बघितला नाही. त्यांनी विदर्भ साहित्य संघात कोरलेली प्रतिकं बदला. त्यात लावलेली छायाचित्र बदला असंही म्हणाले नाही.केवळ ते म्हणाले. सरस्वती नको. साहित्याचं, साहित्यिकांचे प्रतिक ठेवा. यात काही चुकलं नाही.त्यासाठी त्यांना फोनही नाही करावयाचं. समजूतही नाही घालावयाची. ही कोणती वागणूक. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र आहे.मत स्वातंत्र्य आहे. तसं धर्म स्वातंत्र्यही आहे. हे आपण मान्य केलंच आहे. हा वाद मिटला असता. तो नाहक ताणला गेला. दुकान विसासंचं आहे. त्यातून कोणी काय घ्यावे. काय घेवू नये.हे ठरविण्याचा अधिकारही इतरांना आहे. त्याचे चटके वि.सा. संघाला बसतील. कदाचित भविष्यात जास्त बसतील. हे धोके लक्षात घ्यावे. काळासोबत बदलावे.यातच मोठेपण आहे. मराठी साहित्य शिकणारे आज कोण आहेत. याकडे लक्ष द्यावे.ते शिकणारे उद्या साहित्यिक म्हणून येतील. भविष्यात ते साहित्य संस्था चालवतील. तेव्हा तर्काला न पटणारी प्रतिकं बदलतील. त्यांची सुरवात आतापासून व्हावी.

काळ बदलतोय....!

काळ बदलला. बरीच माणसंही बदलली.तरी विसा संघाची सूत्र ठराविकांकडेच. ती तरुणांकडे असती तर आज ही वेळ आली नसती. नव्या पिढीत न पटणाऱ्या किंवा इतिहासाच्या कसोटीवर न टिकणाऱ्या कसोट्यांचा आग्रह नाही. जुन्या पिढीच्या श्रध्देची दैवतं, प्रतिकं कुलुपबंद होत आहेत. काही हौशीगवसी माणसं त्यांचा बाजार मांडतात. हा भाग वेगळा. हे भांडण आहे.शिक्षणाची देवी सावित्री फुले की सरस्वती. मला आठवते. नागपूर महानगर पालिकेत हा वाद खूप रंगला. तेव्हा मनपाच्या शाळेत दर शुक्रवारी सरस्वती नाही. सावित्री पुजन व्हावे. हा विषय बहुजन नगरसेवक प्रफुल्ल गुडदे यांनी लावून धरला. त्याला बहुजन नगरसेवकांनी पाठिंबा दिला. त्याला नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी जोरदार विरोध केला.महापौर प्रा. अनिल सोले शिकलेले. त्यांना सर्व कळत होतं. त्यांनी मधला मार्ग काढला. त्यांना माहित होतं.पक्षाचं बहुमत चालणार नाही.भावनेचं बहुमतही समजून घ्यावं लागेल. त्यांनी सरस्वती सोबत सावित्रीबाई फुले यांचेही छायाचित्र (फोटो )लावावे असा निर्णय दिला.दोघंही फिप्टी, फिप्टी. गुडधे-तिवारी दोन्ही टोकं शांत झाली. ते दयाशंकर तिवारी आता महापौर झाले. मनपाच्या निर्णयाचे पालन होते का ! हे कोणी बघावयास जात नाही.
डॉ.यशवंत मनोहर यांनी ज्या तांत्रिक कारणासाठी पुरस्कार नाकारला. ते योग्यच केलं. जे बदल घडवावयाचे त्यांची सुरवात साहित्य क्षेत्रातून झाली पाहिजे. विसासंने छायाचित्र न ठेवता पुरस्कार दिला असता. तर त्यांची विद्यादेवी कोपली नसती. किंवा पदाधिकारी क्षणात आतापर्यंत शिकलेले विसरले नसते. जग कुठे चाललं आहे. ज्या ग्रहांची भीती दाखविली जात होती. त्या ग्रहांची माणूस स्वारी करीत आहे. अन् नागपुरातील साहित्यिक बिनाअर्थी तर्कवितर्क करीत बसले. त्यात डॉ.श्रीपाद जोशी कुठे आहेत. हा प्रश्न आम्हाला पडतो. कधी असं वाटतं काही माणसं विरोधातचं चांगली असतात. सत्ता अन् खुर्चीत गेली की माणसं बदलतात . आवाज दबतो. किमान जोशींच्या बाबतीत असं न घडो. त्यांचे अनेक किस्से आहेत.यात त्यांचा काही किस्सा कळला नाही. डॉ.रूपा कुळकर्णी ह्या डॉ.रूपा बोधी झाल्या. हे परिवर्तन सर्वांनी मान्य केलं. मोठेपण रूपाताईचं वाढलं. साहित्य आणि साहित्यिकांनी कोंदणात राहु नये.त्यातून बाहेर पडावं.

-भूपेंद्र गणवीर
..............BG..................

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.