वन्यजीव संरक्षण प्रेमींनी किती कुटुंबीयांची भेट घेतली ?
आनंद चलाख/राजुरा ..जिल्हा चंद्रपूर
राजुरा व विरुर वनपरिक्षेत्र अंतर्गत 10 शेतकऱ्यांना करणार्या ठार करणाऱ्या नरभक्षी वाघ अजूनही मोकाट आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. मागील बावीस महिन्यापासून शेतकरी दहशतीखाली जीवन जगत आहेत. कुटुंबीयांचा आधार हरवलेला आहे. लोकप्रतिनिधी गप्प आहेत. या सर्व प्रकरणात जबाबदार असणारे राजुरा व विरुर स्टेशन वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी परिसरातील शेतकरी व माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केलेली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
मागील 22 महिन्यापासून नरभक्षी वाघाचा राजुरा व विरुर स्टेशन वनपरिक्षेत्रात धुमाकूळ सुरू आहे. नरभक्षी वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत दहा शेतकऱ्यांचा बळी घेतलेला आहे. घरचा कर्ता व्यक्ती गेल्यामुळे कुटुंब उघड्यावर आलेली आहेत. चार लोकांना गंभीर जखमी केलेले आहेत. शिवाय शेतकऱ्यांची जनावरेही फस्त केलेली आहेत. परिसरातील शेतकरी दहशतीखाली जगत आहेत. खरीप हंगाम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती केल्याशिवाय पर्याय नाही. अशा स्थितीत वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभाग अपयशी ठरलेले आहे. वाघाने पहिला बळी 16 जानेवारी 2019 मध्ये खांबाळा येथील शेतकऱ्यांचा घेतला. तेव्हापासून आत्तापर्यंत दहा शेतकऱ्यांचा नाहक जीव गेलेला आहे. या सर्व प्रकरणात स्थानिक भागातील परिस्थितीची माहिती वरिष्ठांना देऊन वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने कठोर पावले उचलणे गरजेचे होते. मात्र स्थानिक राजुरा व विरूर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी स्वतःच्या बचावासाठी प्रयत्न केले व लोकप्रतिनिधींशी जवळीक साधली. स्थानिक भागातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. त्यांच्यावर आलेली आपत्ती समजून घेता आलेली नाही. केवळ शेतकऱ्यांना प्रबोधन करीत राहिले आणि नरभक्षी वाघाला मोकाट ठेवले.
शासनाला व वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्थानिक भागातील शेतकऱ्यांच्या वास्तव परिस्थितीची माहिती दिलेली नाही. 22 महिन्यांमध्ये दहा शेतकऱ्यांचा बळी जातो आणि एकही लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाहीत याचा अर्थ काय? लोकप्रतिनिधी वनपरिक्षेत्राधिकारी यांची पाठराखण करीत आहेत काय? शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लोकप्रतिनिधीचा आवाज गप्प का? असे प्रश्न परिसरातील शेतकरी विचारत आहे.
जानेवारी 2019 पासून वाघाने हल्ला चढवले आहेत. 2019 मध्ये चार लोकांचा बळी गेले तर 2020 मध्ये आतापर्यंत सहा लोक वाघाच्या हल्ल्यात ठार झाले आहेत. ही सर्व भयावह स्थिती असताना वनविभाग स्तब्ध का? यावर नियंत्रण करण्यासाठी स्थानिक भागातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी शासनाकडे कोणती मागणी केलेली आहे? आणि किती महिन्याने केली? याचा खुलासा वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी करावा. या सर्व प्रकरणात वनविभागाची असंवेदनशीलता आहे. शेतकऱ्यांचा मृत्यू इथे स्वस्त झाला आहे काय ?असा सवाल जनता करीत आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारायांना योग्य ती माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेली नाही. त्यामुळे शासनाला स्थानिक भागातील वास्तव परिस्थितीची जाण झालेली नाही. त्यामुळे वाघाला जेरबंद करण्यास वनविभाग अपयशी ठरलेला आहे.नरभक्षी वाघाला पकडण्यासाठी मागील दोन महिन्यापासून मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. मात्र अजूनही वाघ वन विभागाच्या तावडीत सापडलेला नाही.जवळपास 160 सीसीटीव्ही कॅमेरे,200 जणांचा ताफा तैनात करण्यात आलेला आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी मचानी बांधण्यात आलेले आहे. जनावरांना भक्ष म्हणून अनेक जीव बळी दिलेले आहे. वाघाने भक्षाची शिकार केलेली मात्र वनविभागाच्या तावडीत सापडला नाही यावरून वन विभागाचे नियोजन किती तत्पर आहे हे लक्षात येते. राजुरा व विरुर स्टेशन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे स्थानिक भागातील शेतकऱ्यांचा जीव गेलेला आहे.अशा दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केलेला आहे.
आतापर्यंत मृत्युमुखी पडलेले शेतकरी......
वर्षा सत्यपाल तोडासे, खांबाळा
उद्धव मारुती टेकाम, चुनाळा
मंगेश पैकण कोडापे, इंदिरानगर
श्रीहरी विठोबा साळवे, मूर्ती
संतोष गणपत खामनकर ,धानोरा
वासुदेव बापूजी कोडेकर, नवेगाव
गोविंदा भीमा मडावी, नवेगाव
मारुती पेंदोर, खांबाळा,
नंदकिशोर मारुती बोबडे, परसोडी,
दिनकर ढेंगरे,तोहोगाव..
यापैकी मृतक संतोष खामनकर यांच्या कुटुंबियांना अजूनही दहा लाखांची शासकीय मदत मिळालेली नाही.
शेतकरी मेला तरी चालेल परंतु वाघ वाचला पाहिजे म्हणून प्रोटेक्ट करणाऱ्या वन्य प्रेमींनी राजुरा विभागातील किती पीडित कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांची आपत्ती जाणून घेतलेली आहे. जगाचा पोशिंदा आज दहशतीत आहे. या भागातील शेतकऱ्यांनी शेती कशी करावी याचे तंत्रज्ञान वन्यजीव प्रेमींनी शेतकऱ्यांना द्यावे, असे आवाहन माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केले आहे.