भाजपा प्रदेश कार्यसमिती गुरुवारी
प्रदेश उपाध्यक्ष मा. माधव भांडारी यांची माहिती
भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त प्रदेश कार्यसमितीची पहिली बैठक गुरुवार दि. 8 ऑक्टोबर रोजी प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून बैठकीत राज्याच्या राजकीय परिस्थिती सोबत महिलांवरिल वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत चर्चा करण्यात येईल. शेतकरी व कामगारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या कायद्यातील ऐतिहासीक सुधारणांबाबत बैठकीत ठराव संमत करण्यात येतील अशी माहिती भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी बुधवारी दिली.
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक व माजी खासदार किरीट सोमय्या उपस्थित होते.
मा.माधव भांडारी म्हणाले की, कोरोनामुळे कार्यसमितीची बैठक व्हर्चुयल स्वरुपात होईल व राज्यातून ठिकठिकाणाहून कार्यसमिती सदस्य बैठकीत ऑनलाईन सहभागी होतील. बैठकीचे उद्घाटन मा. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डाजी यांच्या मार्गदर्शनाने होईल. ते दिल्ली येथून ऑनलाईन सहभागी होतील. बैठकीचा समारोप विधानसभेचे विरोधीपक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील. कार्यसमिती बैठकीपूर्वी सकाळी नवनियुक्त प्रदेश पदाधिकारी बैठक होईल. या बैठकीचे उद्घाटनपर भाषण पक्षाचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी.एल.संतोषजी करतील. पदाधिकारी बैठकीचा समारोप राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीषजी यांच्या मार्गदर्शनाने होईल.
मा.माधव भांडारी यांनी सांगितले की प्रदेश कार्यसमिती बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी ठराव मांडण्यात येईल. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या बेपर्वाईमुळे मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करण्यात येईल. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असून त्याबाबत ठराव मांडण्यात येईल. महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे व गोंधळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार राजकीय ठरावात करण्यात येईल.
शेती क्षेत्रात ऐतिहासीक सुधारणा करणारे कायदे मोदी सरकारने नुकतेच केले आहे. तसेच सर्व प्रकारच्या कामगारांच्या हक्कांचे रक्षण करणारी कामगार कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. याविषयी ठराव मांडून मोदी सरकारचे अभिनंदन करण्यात येईल. तसेच जनजागृतीचा कार्यक्रम मा.प्रदेशाध्यक्ष जाहीर करतील अशी माहिती मा.माधव भांडारी यांनी दिली.
प्रदेश कार्यसमिती बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकारी पदी नियुक्त झालेल्या मा.विनोद तावडे, मा.पंकजा मुंडे, मा.विजया रहाटकर व मा.सुनिल देवधर या नेत्यांचा सत्कार करण्यात येईल.