मांगली- चंदनखेडा मंडळ अधिकारीच रेती तस्करासोबत
भाकपा तर्फे कारवाईची मागणी
भद्रावती:/शिरीष उगे : तालुक्यातील मांगली तसेच चंदनखेडा मंडळ क्षेत्रातून रेती घाटातील रेती मंडळ अधिकारी यांच्या संगनमताने चोरी होत आहे. यास हे अधिकारीच जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड राजू गैनवार यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
एकीकडे कोराना विषाणू चे सर्वत्र थैमान सुरू आहे. यात संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा व्यस्त आहे. याचाच फायदा घेऊन मांगलीचे मंडळ अधिकारी परचाके आणि चंदनखेडा येथील मंडळ अधिकारी गनफाडे हे आपल्या क्षेत्रातील घाटातील रेती तस्करांना हाताशी घेऊन चोरी करीत आहे. या माध्यमातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. दिनांक 26 मे रोजी मंगळवारला जेना रेती घाटातुन ट्रॅक्टरद्वारे काढलेली रेती नंतर जेसीबी द्वारे 2 ट्रकमध्ये भरून नेत असताना ते ट्रक गावकऱ्यांनी कांसा गावाजवळ थांबवून मंडळ अधिकारी परचाके यांना बोलविले ते आपल्या सोबत चंदनखेळाचे मंडळ अधिकारी गणफाड़े यांना घेऊन आले. या रेती तस्करांशी आधीच हातमिळवणी असल्याने त्यांनी थातूर-मातूर चौकशी करून योग्य असल्याचे सांगून सोडून दिली या घटनेची माहिती तहसीलदार महेश शितोळे यांना सुद्धा दिली. त्यांनी याठिकाणी पथक पाठविले परंतु ते ट्रक निघून गेले होते
वरील दोन्ही अधिकारी यांचे या रेती चोरीत हात आहे. शासनाने एकही रेती घाट लिलाव केला नसताना त्या ट्रकला क्लीनचिट कशी दिली हे एक कोडे आहे. या प्रकरणी त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच संपत्तीची चौकशी सुद्धा करावी अशी मागणी गैनवार यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिली आहे.