Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मे ३१, २०२०

बेभरवश्याची पत्रकारिता


दिल्लीतील प्रवास एकच वर्षात थांबला. नोकरी गेल्यामुळे आता इथून पुढे रिकामा असूनही खूप कामं असणार आहेत. पण दिल्लीत थांबायचे नाही, हे ठरवले आहे. पत्रकारिता बेभरवश्याची आहे, हे सगळ्यांना माहिती असले तरी आज मी ठामपणे सांगू शकतो की, या क्षेत्रातील नोकरीच्या भरवश्यावर स्वप्न बघणे आणि कुटुंबाला दाखवणे हा स्वतःवर अन्याय आहे. अजून खूप आयुष्य काढायचे आहे, असा सल्लाही मला दिला जाईल. त्याचा आदर आहे. पण ज्याचे त्यालाच सांभाळायचे असते. दहा-वीस-पन्नास हजार रुपये पगार असलेल्यांना नोकरीवरून काढण्याचा सल्ला जे लोक मालकांना देतात, ते लाखो रुपयांच्या पॅकेजवर ठाण मांडून बसले असतात. त्यांच्या "इनोव्हेटीव्ह कन्सेप्टस" शेकडो कुटुंब उध्वस्त करीत असतात. कालपर्यंत खूप कामाची असलेली व्यक्ती कंपनीसाठी अचानक बिनकामाची ठरते. असे बरेच काही आहे. वयाने फार लहान असलो तरीही पत्रकारितेकडे करियर म्हणून बघण्याची चूक नव्या मुलांनी करू नये, असा सल्ला देईन. त्यातही मेहनत करायची तयारी असेल तर अनेक क्षेत्र आहेत, इथे मेहनतीच्या भरवश्यावर नोकऱ्या टिकवता येत नाही, हेच सत्य आहे.
पत्रकारितेतील जेमतेम 17 वर्षांच्या कारकिर्दीत दोन वेळा रिसेशन बघण्याचे "भाग्य" मला लाभले. ते अनेकांना लाभले आहे. एकदा, दोनदा नव्हे अनेकदा. पण या क्षेत्रात केवळ पाचच वर्षे झालेली असल्याने आणि वयाच्या 25 व्या वर्षी पहिला धक्का बसल्यामुळे तो सहज पचवला आणि पत्रकारितेवर विश्वास ठेवला. याच क्षेत्रात राहून नव्याने सुरुवात केली. कुटुंबासह अनेक मित्रांनी, वरिष्ठांनी पुन्हा उठून कामाला लागण्याची उभारी दिली. त्यानंतर 28 मे 2020 पर्यंत म्हणजे 12 वर्षे कधीही खंड पडला नाही. नोकरीत नाहीच नाही आणि कामात तर मुळीच नाही. माझ्या कालपर्यंतच्या पत्रकारितेत एकही संपादक असे नाहीत जे माझ्या कामावर, मेहनतीवर शंका घेतील. कामात चुकलो असेल, एखादी बातमी सुटली असेल, पण हलगर्जीपणा, रात्री उशिरापर्यंत थांबायचा कंटाळा, सकाळी लवकर उठायचा कंटाळा, "याला बातमीच लिहीता येत नाही" अश्या कुठल्याही कारणांसाठी माझी पत्रकारिता बदनाम झाली नाही. नाटक, चित्रपट, कविता, साहित्य हा माझ्या बघण्याचा, वाचनाचा आणि लिखाणाचा आवडीचा विषय आहे. पण माझी पत्रकारिता ग्रामीण डेस्कवर वार्ताहरांच्या बातम्यांचे संपादन करण्यापासून सुरू झाली. पत्रकारितेत येण्यासाठी श्यामभाऊंनी (श्याम पेठकर) आधार दिला. त्यांनी बोट धरून आणले, पण ते सोडून दिले नाही. आम्हा दोघांमध्ये वितुष्ट यावे यासाठी लोक प्रयत्न करीत राहिले तरीही. ग्रामीण डेस्कवरून नंतर मी क्रीडा विभागात काम केले, पुढे सांस्कृतिक आणि क्रीडा असे अफलातून कॉम्बीनेशनही "पुण्यनगरी"त सांभाळले. मुंबईतही क्रीडा विभाग आणि मेन डेस्कवर काम केले. महानगरपालिका, न्यायालय येथील वार्तांकनाचीही जबाबदारी स्वीकारली. आनंदाने काम केले. शिकलो, वेळ लागला. कदाचित यात पूर्णपणे स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेळ मिळाला नसेल, पण तक्रारीची संधी दिली नाही. दरम्यान, नागपूर "सकाळ"मध्ये दोन वर्षे पगारवाढ नव्हती. नंतर व्यवस्थापनाला वाटले की आता पोरं कमी पैश्यात जगायला शिकली असतील त्यामुळे त्यांनी माझ्यासह अनेकांना "भक्कम" पगारवाढ दिली. अनेकांना एक हजाराच्या (काहींना तर पाचशेच्या आत) आत गुंडाळले. त्यात माझ्यावरही 840 रुपयांची "कृपा" झाली.
एक वर्ष निघाले आणि एक दिवस दिल्ली लोकमतचे संपादक विकास झाडे सरांचा फोन आला. दिल्लीला काम करण्याची तयारी आहे का विचारले. मी बायको, आई-बाबांशी, सासू-सासऱ्यांशी बोलून निर्णय घेतला. गजानन जानभोर सरांनी दिल्ली गाठण्यासाठी मोठे योगदान दिले. मुलगी लहान असल्यामुळे वर्षभर कुटुंबापासून लांब राहण्याच्या मनःस्थितीत नव्हतो. आम्ही तिघेही गेल्यावर्षी याच महिन्यात दिल्लीत शिफ्ट झालो. इथे "सांस्कृतिक" वार्तांकनाची माझ्याकडून अपेक्षा होती, ती काहीप्रमाणात पार पाडू शकलो. पण न्यायालयातील बातम्या, दिल्लीतील गाजलेला वकील-पोलीस संघर्ष, अयोध्या प्रकरणाचा एेतिहासिक निकाल, निर्भयाच्या मारेकऱ्यांची फाशी, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी दिल्ली विधानसभा निवडणूक या आणि अश्या कितीतरी वेगळ्या विषयांवर, लोकांवर लिहीण्याची संधी मला मिळाली. शिकायला मिळाले. एनएसडी, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, साहित्य-ललित कला आणि संगीत नाटक अकादमी जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. आपल्या छायाचित्रासह स्तंभ प्रकाशित होण्याचे नशीब कमी वयात मला मिळाले, ते झाडे सरांमुळे. गेल्या एक वर्षातील माझ्या दिल्लीतील सहवासातील ठळक गोष्टी आठवायचा प्रयत्न केला तर फक्त कामच आठवतं. दिल्ली फार हॅपनिंग आहे. लोक चाळीस-चाळीस, वीस-वीस वर्षे इथे पत्रकारिता करीत आहेत. मराठी लोक दिल्लीत थांबत नाहीत, असे मला इथे येण्यापूर्वी सांगितले गेले. त्याकडे दुर्लक्ष करून कामात झोकून दिले. दोन किंवा चार वर्षांनंतर आपण कुठे असू याचा विचार न करता फक्त आजचे काम केले. झाडे सर किंवा सुरेश भुसारी सरांनी माझ्या क्षमतेबद्दल कधीच शंका व्यक्त केली नसेल, असा माझा दावा आहे.
अश्यात कोरोनामुळे सर्व वृत्तपत्रांच्या मालकांवर फार मोठे संकट कोसळले. जाहिराती थांबल्या. आता पुढील दोन वर्षे माध्यमांचे काही खरे नाही, असा प्रचार सुरू झाला आणि सर्वांत पहिले कर्मचाऱ्यांच्या लेकरा-बाळांवर, वृद्ध आई-वडिलांवर हे संकट ढकलण्यात आले. "लोकमत"मध्ये याची सुरुवात दिल्ली आवृत्तीपासून झाली. आमच्या नोकऱ्या धोक्यात असल्याचे वातावरण व्यवस्थापनाने तयार केले आणि आज (28 मे 2020) त्यावर कागदोपत्री शिक्कामोर्तब करण्यात आले. पत्रकारितेत काही खरे नाही असे म्हणणे, नोकरी धोक्यात येऊ शकते असे वाटणे आणि प्रत्यक्ष आपली नोकरी जाणे, यात किती फरक आहे हे कुणालाही सांगण्याची गरज नाही. पावणे बारा वर्षांच्या वैवाहिक जीवनात दोन वेळा जिच्या वाट्याला "अकारण" रिसेशन आले ती माझी बायको ठामपणे उभी आहे. सत्तरीतील आई-वडिलांना, निवृत्तीला आलेल्या सासऱ्यांना "आजपासून माझ्याकडे नोकरी नाही" हे सांगणे, कुठल्याही अन्यायापेक्षा अधिक वेदनादायी आहे. आपण पुन्हा उठून उभे होऊ, चिंता करू नको असा धीर मला कुटुंबाने दिला. "जो होगा देखा जाएगा", असे मित्रांनी म्हणणे आणि कुटुंबाने म्हणणे यात खूप फरक आहे. सध्याच्या घडीला हे दोन्ही घटक माझ्या सोबत आहेत. आपल्या मेहनतीचा आणि व्यवस्थापनाच्या धोरणांचा काहीही संबंध नसतो, ही भावना अधिक खोलवर रुजविण्यासाठी हातभार लागला. उमेश जाधव सारखा वयाने लहान असला तरीही जीवाभावाचा मित्र दिल्लीने दिला. इथे अनेक मराठी-अमराठी लोकांशी संपर्क आला. दिल्लीत शिकण्यासाठी बारा महिने पुरेसे नाहीत. पण संकटात प्रयोग करायचे नसतात, असे परवा जानभोर सर म्हणाले, ते खरे आहे. नागपुरात जाऊन काय करणार, हा प्रश्न मला दिल्लीतील सहकाऱ्यांनी विचारला आणि मी इथे थांबावे यासाठीही प्रयत्न केले. पण इथे थांबण्याचे औचित्य नाही. दिल्लीत संघर्ष करण्यासाठी माझ्याकडे कारणही नाही. कारण आत्ता या क्षणी जगण्याचा संघर्ष जास्त महत्त्वाचा आहे. "काय झालं रे, नोकरी गेली का? जाऊ दे. फाल्तू टेंशनची गरज नाही. तू लाथ मारशील तिथे पाणी काढशील", हे माझ्या आईचे शब्द आहेत. “नागपूरला ये, सगळं ठीक होईल,” हे माझ्या बाबांचे शब्द आहेत. आणि "मी तीन दिवसांनी निवृत्त होतोय, आता दोघेही रिकामे आहोत. मिळून काही तरी करू, चिंता करू नका", हे माझ्या सासऱ्यांचे शब्द आहेत. लोक आपापल्या संघर्षांचे दाखले देतात. पण प्रत्येकाच्या संघर्षाचे संदर्भ वेगळे असतात, हे अनेकांना कळत नाही. ते कळावे असा आग्रहदेखील नाही. नोकरी गेल्याचे कळल्यावर पत्रकारितेतील आणि बाहेरच्याही अनेक लोकांचे मला धीर देणारे फोन आले, मेसेजेस आले. अपेक्षितच होते. पण अपयश आले की मी अधिक आक्रमकपणे कामाला लागत असतो, असा विश्वास पत्रकारितेतील माझ्या मित्रांना माझ्यावर आहे. तो पुन्हा सार्थ ठरवेन.
आकाशपाळण्यात बसल्यावर वरून खाली येताना जसे वाटत असते तसेच आज दिवसभर वाटत होते. कदाचित आणखी काही दिवस वाटेल. आता बातमीच लिहायची नाही, त्यामुळे चुकचुकल्यासारखे वाटायला लागले आहे. वयाने लहान असलो तरीही पत्रकारितेत खूप काही शिकलो आणि या क्षेत्राला शिव्या देणाऱ्यांशी भांडलोही. आता पुढील संधी कधी येईल, येईल की नाही याबद्दल माहिती नाही. पण आता या क्षेत्राच्या भरवशावर आयुष्य काढण्याची कल्पना अत्यंत फाल्तू ठरणार आहे. इथून पुढे आयुष्य वेगळे असणार आहे. पण रडगाणे गाऊन, सहानुभुती मिळवून चार पैसे कमवायचे नाहीत, एवढेच ठरवले आहे. आता खूप कामं आहेत...

- नितीन नायगांवकर

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.