24 तास भरारी पथकाची नियुक्ती
कठोर कारवाईचे संकेत
संजीव बडोले/नवेगावबांध.
दिनांक 31 मे 2020.
नवेगावबांध:-
शिवालया कन्ट्रक्शन कंपनी लाखनी यांच्यावर अवैध मुरमाची वाहतूक व अवैध उत्खनन प्रकरणी कोट्यावधी रुपयाचा दंड 27 मेला ठोठावण्यात आल्यानंतर, आज दिनांक 31 मे ला अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुक्यातील पाच महसूल मंडळातील 28 तलाठी साझ्या मध्ये अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी कठोर उपाययोजना म्हणून अर्जुनी मोरगाव चे तहसीलदार विनोद मेश्राम यांनी आज दिनांक 31 मे ला एका आदेशाद्वारे तलाठ्यांवर भरारी पथकाची जबाबदारी दिली आहे .
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता लिलाव झालेल्या रेती घाटाची मुदत दिनांक 30 सप्टेंबर 2019 रोजी संपुष्टात आलेली आहे. अपर जिल्हाधिकारी गोंदिया यांचे दिनांक 5 नोव्हेंबर 2019 च्या पत्रान्वये आदेश प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे रेती घाटातून अवैधरित्या रेतीचे उत्खनन व वाहतूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गौण खनिज माल माती, रेती, मुरूम, गिट्टी,बोल्डर इत्यादींची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आळा घालण्याकरीता आज दिनांक 31 मे 2020 पासून दर दिवशी सकाळी 6.00 वाजे ते सायंकाळी 6.00 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6.00 वाजेपर्यंत अवैध गौण खनिज तपासणी करण्याकरता तलाठी व मंडळ अधिकारी यांची नियुक्ती केली आहे .भरारी पथकामध्ये 28 तलाठी साझ्यात तलाठी असून, मंडळ अधिकारी हे नियंत्रण अधिकारी असतील. असे आदेशात म्हटले आहे. तलाठ्यांची नियुक्ती त्यांच्यात साझ्यात करण्यात आलेली आहे. नियमितपणे आपल्या साझ्यातील सर्व गौण खनिज वाहतूक व उत्खननाची तपासणी करावी व नियमाप्रमाणे कार्यवाही करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेशात म्हटले आहे. मंडळ अधिकारी अर्जुनी मोरगाव, नवेगावबांध, केशोरी, महागाव, बोंडगाव देवी यांनी केलेल्या कारवाईचा अहवाल प्रपत्रात दर सोमवारी सकाळी 11:00 वाजता नायब तहसीलदार मुनेश्वर गेडाम यांच्याकडे सादर करण्याचेही आदेशात म्हटले आहे. नायब तहसीलदार मुनेश्वर गेडाम अर्जुनी मोरगाव यांना तालुक्यातील सर्व खनिज वाहतूक उत्खनन बाबतचे कारवाईचे अधिकार देण्यात आले आहे. असेही आदेशात पुढे म्हटले आहे. तालुक्यातील सर्व प्रकारच्या अवेध गौण खनिजाच्या तस्करीला या मुळे नक्कीच आळा बसेल यात शंका नाही. अवैध गौण खनिज चोरीला आळा घालण्यासाठी तालुका महसूल प्रशासन कठोर पावले उचलत आहे. हे या आदेशावरून दिसून येत आहे.
-संजीव बडोले, नवेगावबांध.