Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मे ३०, २०२०

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चाचण्या वाढविण्याचे निर्देश:जिल्ह्यात येणाऱ्या नव्या रुग्णावर एकाच ठिकाणी होणार उपचार

विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी घेतला
 कोविड उपचाराचा आढावा
चंद्रपूर(खबरबात):
आज जी परिस्थिती मुंबई-पुण्याची आहे. ती उद्या चंद्रपूरसह विदर्भातील अन्य जिल्ह्यांची होऊ शकते, हे लक्षात घेऊन पुढील काळाचे नियोजन करा. सर्व गंभीर रुग्णांवर एकाच ठिकाणी अत्याधुनिक उपाययोजनांसह उपचार करता येईल, अशी आरोग्य यंत्रणा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात निर्माण करा, असे निर्देश विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी आज येथे दिले.

विभागीय आयुक्त संजीव कुमार आज गडचिरोली येथून चंद्रपूर येथे कोविड संदर्भात जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी चंद्रपूर येथे आले होते.त्यांच्यासोबत अतिरीक्त आयुक्त अभिजीत बांगर उपस्थित होते. त्यांनी सर्वप्रथम विभागीय नियंत्रण कक्षाला भेट देऊन या ठिकाणी सुरू असलेल्या जिल्ह्याच्या एकत्रित वार रूमची पाहणी केली. सोबतच आपत्ती व्यवस्थापनाबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.

कोरोना संदर्भात रुग्णांवर उपचार करतांना अधिक रुग्ण येण्याच्या नियोजनात अनेक ठिकाणी उपचाराची व्यवस्था केली जाते. तथापि, एकत्रित उपचार पद्धतीला यापुढे प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस. एस. मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे याशिवाय विविध विभागाचे विभाग प्रमुख,आरोग्य यंत्रणेतील सर्व अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी यावेळी कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाभरात सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी या संदर्भात सुरू असलेल्या प्रबोधन, प्रशिक्षण, शिक्षण व कार्यवाहीची माहिती दिली. तर उपजिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी देखील यावेळी सादरीकरण केले. या सादरीकरना दरम्यान, संजीव कुमार यांनी नव्याने चंद्रपूर जिल्ह्यात उभे रहात असलेल्या कोरोना प्रयोगशाळेचा लाभ चंद्रपूर सोबतच गडचिरोलीला देखील व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी यावेळी बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या संदर्भात अहवाल गोळा करण्याची कार्यपद्धत अवलंबण्याचे आग्रही प्रतिपादन केले.

जोखीम असणाऱ्या कुटुंबाकडे अधिक लक्ष ठेवा. ही माहिती पुढील दीर्घकाळासाठी साठवून ठेवा. जेणेकरून मुंबई पुण्यासारखी परिस्थिती पुढच्या काळात उद्भवल्यास आपल्याकडे जोखमीच्या व कमी जोखमीच्या रुग्णाची नोंद असेल, त्यानुसार गतिशील पद्धतीने उपचार करता येईल, यासाठी ही विभागणी करून ठेवण्याबाबत त्यांनी यावेळी बजावले. आपल्याकडची यंत्रणा मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेतानाच रुग्ण एकाच वेळेस वाढल्यानंतर प्रत्येकाकडे योग्य पद्धतीने लक्ष देता येईल अशा पद्धतीची एकत्रित उपचार पद्धत एकाच ठिकाणी होईल, असे नियोजन करण्याचे देखील त्यांनी यावेळी सुचविले.

जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चाचण्या वाढविण्याचे ही त्यांनी निर्देश दिले. महानगरपालिका हद्दीमधील झोपडपट्टीवर अधिक लक्ष ठेवा. अनेक वेळा अपुऱ्या मनुष्यबळ व आरोग्य व्यवस्थेमुळे अशा ठिकाणी उद्रेक होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे सर्व यंत्रणेने केवळ महानगरपालिकेवर दायित्व न ठेवता यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

चंद्रपूर जिल्ह्याने अतिशय जागरूकतेने या काळामध्ये लढा दिल्याबद्दल त्यांनी यावेळी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले. मात्र येणारा काळ आणखी कठीण असणार आहे. कारण जे मुंबई पुण्यामध्ये उद्रेकाचे प्रमाण आहे. तो कालावधी नागपूर विभागातील अनेक जिल्ह्यात पुढील महिन्यात संभवू शकतो.अशा वेळी येणाऱ्या परिस्थितीला सामना देण्यासाठी आपली यंत्रणा योग्य माहितीसह तयार ठेवावी, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.