लॉकडाऊन परिस्थितीत बेरोजगारीमुळे दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था होत नसतांना मोबाईल रिचार्ज, इंटरनेट यावर होणारा खर्च कुठून करायचा?
पालकांचा प्रश्न
नागपूर : अरूण कराळे (खबरबात)
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे द्वारा निर्मित गेल्या २६ दिवसांपासून शाळा बंद पण अभ्यास सुरू अशी अभ्यासमाला व्हाट्सअप्प वर पाठविण्यात येत असून सदर अभ्यासमाला डायट, जिल्हा परिषद ,बीआरसी,सीआरसी या क्रमाने शाळेच्या मुख्याध्यापक/शिक्षकांपर्यंत व्हाट्सअप्प द्वारे पोहचत आहे.
याशिवाय विभागीय आयुक्त स्तरावरून सुद्धा प्रथम संस्थेच्या माध्यमातून कार्यक्रम तयार करून मोबाईल रेडिओ लिंकवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना शिक्षकांपर्यंत पोहचल्या आहेत.
सदर ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याची आभास सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मात्र प्रत्यक्षात शिक्षकांकडून सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात विविध प्रकारच्या अडचणी असल्याने शिक्षण विभागाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले जात आहे.
जिल्हा परिषद, खाजगी अनुदानित शाळांमध्ये गरीब, मध्यमवर्गीय कामगार मजुरांची मुले शिकत असून सध्याच्या लॉक डाऊन परिस्थितीत बेरोजगारीमुळे दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था होत नसतांना मोबाईल रिचार्ज, इंटरनेट यावर होणारा खर्च कुठून करायचा? असा उलट प्रश्न पालक करीत आहेत.
शिक्षकांनी पालकांना केलेले कॉल उचलले जात नाही तर कुठे नेटवर्किंग नसल्याने फोन लागत नाही. काही पालकांच्या मोबाईलवर पीडीएफ किंवा लिंक उघडत नाही अशा नानाविध समस्या येत आहेत.
वरील सर्व तांत्रिक समस्येवर शिक्षण विभागाकडे काही उपाय आहेत काय? असा प्रश्न आता शिक्षण विभागातील पर्यवेक्षकीय यंत्रणा विचारत आहे.
सदर कार्यक्रम फक्त २५ टक्के शहरी पालकांच्या मोबाईल पर्यंत पोहचला तरी पालक आपल्या पाल्यांचा अभ्यास करून घेतात की नाही याबाबत आढावा कसा घ्यावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रशिक्षण परिषद फक्त अँड्रॉइड मोबाईल, साधे मोबाईल व दोन्ही मोबाईल नसलेल्या पालकांची आकडेवारी गोळा करून विश्लेषण करण्याचे काम करीत असून त्यासाठी केंद्रप्रमुखांकडून लिंकवर माहिती मागवीत आहे.
प्रतिक्रिया
कोविड-१९मुळे जगातील कानाकोपऱ्यात लॉकडाऊन असून महाराष्ट्र शासन सुद्धा अपवाद नाही. लॉकडाऊन पुढे किती काळ राहील याबाबत निश्चितपणे कुणीही सांगू शकत नाही त्यामुळे शाळा बंदच्या काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे म्हणून शिक्षण विभागाने झूम अँप, ऑनलाइन अभ्यास, मोबाईल रेडिओ, दीक्षा अँप असे पर्याय समोर आणले आहेत.
मागील सत्रातील पंधरा दिवसांत बुडालेल्या अभ्यासासाठी उन्हाळी सुटीत बालकांना अभ्यासाच्या नावाने वेठीस धरू नये व परीक्षाच नाही तर अभ्यास कशासाठी असा प्रश्नही पालक करायले लागले आहेत त्यामुळे सद्यस्थितीत अभ्यासक्रमाला स्थगित करावी.
शरद भांडारकर
केंद्रप्रमुख वाडी ,
राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेना