Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी १४, २०२०

फेब्रुवारी महिन्यातही उन्हाळ कांदा लागवड सुरू




येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार

येवला : गत वर्षी पर्यंत कांदा पीक शेतकऱ्यांचा वांदा करत असल्याचे दिसून येत होते. यंदा मात्र कांद्याच्या दराने मात्र पंधरा ते वीस हजार रुपयांपर्यंतचा प्रती क्विंटल चा विक्रमी असा गगनभरारी भाव घेतल्यानंतर येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक , जळगाव नेउर , शिरसगाव लौकी , पिंपळगाव लेप , जऊळके , मुखेड , देशमाने , नेउरगाव आदी भागात मागील अडीच ते तीन महिन्यापासून उन्हाळ कांदा लागवड सूरु असून अद्यापही अनेक ठिकाणी उन्हाळ कांदा लागवड क्षेत्रात भरमसाठ वाढ होत चालली असून फेब्रुवारी महिना सुरू होऊन दहा दिवस उलटले असताना देखील अपेक्षे पोटी शेतकरी वर्गाकडून कांदा लागवड करण्यात भर देत असल्याचे दिसून आले आहे. मागील आठ दिवसापासून वातावरण स्वच्छ असल्याने थंडीची तीव्रता देखील वाढली होती. थंडीने रब्बी हंगामातील पिके बहरली असता सोमवारी ( दि.10 ) ला पहाटे चार वाजेपासून वातावरनात अचानक बदल होऊन काळे ढग दाटून आल्याने पिके पुन्हा रोगांच्या प्रादुर्भावाला बळी पडणार असल्याच्या चिंतेने शेतकरी धास्तावला आहे.

मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात चांगलीच घसरण झाली असून कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. काही महिन्यांपूर्वी वाढलेले कांद्याचे भाव लक्षात घेता यंदा शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात कांदा लागवडीस सुरुवात केली होती. त्यात मध्यंतरी अवकाळी पावसाने तीनदा रोपे टाकून सुध्दा सडून गेल्याने शेतकरी वर्गाने अपेक्षा ठेवत महागड्या दराने मिळेल तेथून कांदा रोप खरेदी करून कांदा लागवड करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला असल्याचे दिसून आले. दर आठ ते पंधरा दिवसाला वातावरण बदल होत गेल्याने अनेकदा पिके धोक्यात आली होती. गव्हावर माव्याचा प्रादुर्भाव , नवीन उन्हाळ कांद्याची लागवड पिवळी पडणे , हरभरा पिकावर अळी चे साम्राज्य वातावरण बदला मुळे पिकावर होत गेल्याने शेतकरी वर्गाला सातत्याने कीटकनाशके , बुरशीनाशकांची फवारणी करण्याची वेळ अद्यापही येत आहे.

यंदा खरीप हंगाम आधीच शेतकऱ्यांना डोकेदुखी आणि खर्चिक ठरला असताना रब्बी हंगाम मात्र काहीसा दिलासादायक देणारा असल्याचे बोलले जात आहे. रब्बी हंगामातील पिकांना पाणी मुबलक असल्याने यंदा गहू आणि हरबरा उत्पादन क्षेत्रात कमालीची वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान वातावरण बदला मूळे यंदा सर्वच पिकावर मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागत आहे.

    द्राक्ष बागायतदारासाठी हे ढगाळ वातावरण नेहमी अत्यंत चिंतेचे ठरत असून द्राक्ष तोडणीस सुरुवात झाली असल्याने ढगाळ वातावरणामुळे चिंतेत भर पडली असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरता धास्तावला आहे. लाखो रुपयांचा खर्च करून द्राक्ष फळांचे उत्पादन हे वर्षातून एकदाच मिळत असल्याने ढगाळ वातावरणातुन द्राक्ष बागे जोपासण्यासाठी शेतकरी वर्ग जीवाचे रान करत आहेत. 

........

मानोरी परिसरात अनेक ठिकाणी लाल कांदा काढणीला सुरुवात झाली असून दुसरीकडे मात्र शेतकरी उन्हाळ कांदा लागवड करण्यात अद्यापही व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. कांदा निर्यात बंद मुळे कांद्याचे भाव कोसळले असून शासनाने कांदा निर्यात खुली करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरू लागली आहे. तीन महिने टिकून असलेल्या कांद्याच्या चांगल्या दरामुळे शेतकरी वर्गाने उन्हाळ कांदा लागवड क्षेत्रात वाढ केली असून त्यात भाव कोसळत असल्याने उन्हाळ कांदा काय भाव घेणार याची शाश्वती नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.


" यंदा कांद्याचे भाव चांगल्या प्रकारे टिकून असल्याने येवला तालुक्यात अद्यापही उन्हाळ कांदा लागवड शेतकरी करत आहेत. त्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाल्याने नवीन कांदा लागवड धोक्यात आली असून सातत्याने औषध फवारणी करावी लागत असून खर्च देखील वाढतच चालला आहे".
- कल्याण कोटकर, कांदा उत्पादक शेतकरी, शिरसगाव.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.